नवी दिल्ली: ( AMIT SHAH On Separatism in Jammu and Kashmir is a historical fact ) जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला मोठा धक्का बसला आहे. जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटने हुर्रियत कॉन्फरन्सशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून ही संघटना खोऱ्यात निष्क्रिय झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा विजय म्हटले आहे.
डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटचे नेते मोहम्मद शफी रेशी यांनी घोषणा केली की त्यांच्या पक्षाने हुर्रियत कॉन्फरन्सच्या कट्टर गिलानी गटाशी असलेले संबंध पूर्णपणे तोडले आहेत. याशिवाय, जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंटनेही फुटीरतावादाशी संबंध जाहीर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खोऱ्यातील या मोठ्या घडामोडींचे स्वागत केले आहे.
गृहमंत्री शाह यांनी एक्सवर लिहिले आहे की काश्मीरमधील फुटीरतावाद इतिहासजमा झाला आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे जम्मू आणि काश्मीरमधून फुटीरतावाद संपला आहे. भारताची एकता मजबूत करण्याच्या दिशेने हे एक चांगले पाऊल आहे. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील इतर गटांनाही फुटीरतावाद सोडण्याचे आवाहन केले आहे.
दोन्ही फुटीरतावादी संघटनांनी हुर्रियतची साथ सोडणे ही अतिशय महत्त्वाची घडामोड आहे. कलम ३७० हटवल्यानंतर, केंद्र सरकारने खोऱ्यातील दहशतवाद रोखण्यासाठी फुटीरतावादी गटांवर कठोर कारवाई केली. दहशतवादाविरुद्ध लष्कराची कारवाईही सुरूच होती. नुकतीच केंद्रीय गृह मंत्रालयाने मिरवाईज उमर फारूखच्या नेतृत्वाखालील अवामी एक्शन कमिटी आणि मौलवी मसरूर अब्बास अन्सारी यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीनवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.