खरेच ऋतूंची फुले होतात की फुलांचे ऋतू असतात? प्रश्न पडलाय का की ठराविक महिन्यामध्येच फुले का फुलतात? या सगळ्याचे कुतूहल शमवणारा हा लेख...
धानगरीच्या जंगल घाटात डिसेंबर चालू झाला की रान फुलांचे उमलणे सुरू होते आणि सृष्टीतल्या वृक्ष-लता-झुडपांना प्रसव चालू होतात. तेही काही ठराविक महिन्यांतच. शिशिर मावळायला चालू होतो, तसे नाजूक फुले वनस्पती अंगावर धारण करतात. सजीवसृष्टीत बॅटरीचे काम करतो, तो सूर्य आणि या सूर्याला ओळखणारे वनस्पतींच्या आत बसलेले काही प्रथिने आणि जनुके. झाडे प्रकाश ओळखतात. त्याचे वर्गीकरण करतात. तसेच झाडे प्रकाशाचा कालावधीही ओळखतात. म्हणजे आज अमूक तास प्रकाश मिळाला, अशी आकडेमोड झाडामध्ये होते. इतकेच की ती आपल्याला दिसत नाही.
काही झाडे पावसाळ्यात उगवतात व पावसाळा संपला की परत नष्ट होतात. काही झाडे वर्षभर जगतात. फुले देतात, फळे देतात आणि नष्ट होतात. काही झाडे दोन वर्षे जगतात. फुले दोन वर्षांतून एकदाच येतात आणि आली की फळे देऊन नष्ट होतात. काही झाडे वर्षानुवर्षे दरवर्षी फुलतात आणि फळतात. परंतु, नष्ट न होता बहुवर्षायु असतात. हे सांगण्याचे कारण की, झाडांच्या मुळांकडे मला आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. मूळ हा झाडांचा अविभाज्य भाग आहे. झाडांच्या आधार आणि आहार या दोन्हीचे काम मूळ करतात. झाड जितके जास्त काळ फुल देणारे तेवढी त्याची मूळसंस्था (Root System) ताकदीची आणि जमिनीत घट्ट पसरलेली. झाड जितके कमी काळ जगणारे तेवढी मुळे वरवर. उदा - आंबा, वडाची मुळे खोलवर विस्तारलेली असतात, तर खडकावर वाढणारे बिगोनिया किंवा झाडावरचे रुकाळू हे पावसाळ्यापुरतेच असतात. कारण त्यांची मुळे फार वरवर असतात. फुले येण्याचा कालावधी जेवढा लांबचा तेवढी झाडांची मुळे घट्ट.
झाडे ठराविक कालखंडात फुलण्यात उत्क्रांतीचा आणि अनुकूलनाचा वाटा आहे. परागीभवन करणारे सदस्य जितके कार्यान्वित त्या वेळात फुले आली, तर झाडांचा त्यात स्वार्थ. झाडांचा हा स्वार्थ नसून आपल्यावर केलेली कृपा आहे, हे नंतर आपल्याला कळते. यासोबत काही झाडांची गणितेच वेगळी. ती म्हणतात, इतर झाडे फुलतात ती वेळ सोडून आम्ही फुलतो. म्हणजे आम्हाला जास्त परागीभवन करणारे सदस्य मिळतील. उदा. काटेसावर, पळस, पांगारा ही झाडे काही झाडांचा मोठा बहर उलटून गेला की फेब्रवारी-मार्चला उमलतात.
जगदीशचंद्र बोसांनी झाडांना भावना असतात, असे सिद्ध केले आहे. उदाहरण द्यायचे म्हणजे झाडावर घाव घातला, तर थोड्या वेळाने तिथे चिकट डिंक तयार होतो. जखम भरावी आणि जंतूसंसर्ग होऊ नये, हा त्याचा उद्देश. तसेच झाडे प्रकाशकाळ मोजतात. आपण भूगोलात शिकलो की, दि. २१ डिसेंबरपासून दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. संक्रांतीनंतर उष्ण काळ वाढू लागतो. हेच झाडांना समजते. सूर्याचा कालावधी वाढला म्हणजे झाडांना अधिक ऊर्जा मिळते आणि अधिक ऊर्जा म्हणजे फुले येण्याचा कालावधी. जितके ऊन कडक, जितका वैशाख वणवा तितकी ही झाडे फुलायच्या अत्युच्च शिखरावर पोहोचतात.
देवरायांमध्ये आत घनदाट सावलीत असलेल्या झाडापेक्षा बाहेरील बाजूला उन्हात असलेल्या झाडांना आधी बहर आलेला दिसून येतो, तो याच ऊनप्रकाशाच्या प्रेमापोटी. आता या लेखाचा शेवटचा व महत्त्वाचा टप्पा. आपण मुळाचे जाळे पाहिले, प्रकाशकाळ समजून घेतला, ऊर्जेची गुंतवणूक समजली, मात्र हे सगळे झाडामध्ये घडते ते कसे? झाडात पेशी असतात. आपल्यात कसे क्रोमोझोम असतात, तसेच तिथेही जनुके असतात. या साखळीत फुले फुलण्यासाठी काही ठराविक जनुके निर्माण झालेली असतात. ही जनुके प्रकाश कमी असतो, तोवर शांत, सोज्वळ मुलासारखी हाताची घडी तोंडावर बोट घेऊन बसून असतात. एखाद्या प्रथिनाकडून एका क्षणाचा सिग्नल मिळतो. प्रकाशकालावधी वाढला आहे की, ही जनुके खोडकर मुले बनतात आणि पळापळ चालू करतात. याला जनुकीय प्रगटीकरण (Gene Expression) म्हणतात. झाडाच्या प्रत्येक कामाला असे विविध जनुके नेमून दिलेली असतात. सोप्या भाषेत प्रथिने फुले फुलवण्याच्या जनुकांना गदगदून जागे करतात.
PI,G, ढऋङ१, TFL१, FT, FLC मालिकेतील AP१, AP२, AP३, यांसारखी नावे दिलेली जनुके फुलाच्या पुष्पविभाजी ऊतींना संदेश देतात की, कळी तयार करायची आहे. मग काही जनुके पाकळ्या बनवायचे काम करतात, काही त्यातले आतील भाग-स्त्रीकेसर पुंकेसर, बीजकोष वगैरे. अशी सगळी घाम काढणारी प्रक्रिया झाली की, फूल उमलते, तेही सूर्य कुठे आहे ते पाहून. यामुळे मॉर्निंग ग्लोरी सकाळी उमलते, तर बलासारखी फुले दुपारनंतर उमलतात, तर काही सकाळी. ही सगळी प्रक्रिया झाडांची चांगली दमछाक करते. झाडे बोलू शकत नसल्याने ती कळत नसते इतकेच. मात्र आता आपल्याला कदाचित फळधारणेचे महत्त्व लक्षात येईल. त्यानंतर त्या त्या झाडाची लाडकी परागीकरण करणारी टीम येते. पुढे फळे धरतात. हा सगळा झाडांचा प्रजनन कारभार. यामुळे सुरुवातीला म्हणालो की, ऋतूंची झाली फुले. या ऋतूत सूर्यप्रकाश किती वेळ व कुठून येतो, याला महत्त्व. जानेवारी ते जूनची वेळ सोडून इतर काही झाडांना फुले येतात. तीही अशी प्रकाश कालावधी आणि परागीकरण करणारे घटक बघूनच. मात्र, शिशिर, वसंत आणि वैशाखाचे दिवस हे सर्वांत मोठ्या फुलोर्याचे पर्यायाने रानमेव्याचे स्रोत ठरतात.
रोहन पाटील
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत. संपर्क - ७३८७६४१२०१)