पत्रकारिता हे लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं माध्यम आहे!
साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांचे प्रतिपादन
24-Mar-2025
Total Views | 12
मुंबई : "पत्रकारिता हा व्यवसाय म्हणजे केवळ रोजी रोटीचे साधन नसून, ते लोकशिक्षणाचं आणि प्रबोधनाचं माध्यम आहे याचं भान पत्रकारांनी बाळगायला हवं" असे प्रतिपादन विवेक साप्ताहिकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी केले. गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था, मुंबई विद्यापीठ मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम वर्ग आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ पत्रकार सुरेशचंद्र वैद्य, कवी दुर्गेश सोनार, अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांतचे अध्यक्ष प्रविण देशमुख, मराठी पत्रकारिता वर्गाच्या समनव्यक नम्रता कडू उपस्थित होत्या. या वेळी 'विद्यार्थ्यांसाठी कानमंत्र - स्वतःला पत्रकार म्हणून घडवताना' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अश्विनी मयेकर म्हणाल्या की " आपल्याला पत्रकार नेमकं कशासाठी व्हायचं आहे याचा आधी आपण सखोल विचार करायाला हवा. आपल्या जीवनाची उद्धिष्टं आपण ठरवायाला हवी. पत्रकारितेचं क्षेत्र हे खऱ्या अर्थाने मनाला समाधन देणारं क्षेत्र आहे."
मराठीमध्ये युद्धपत्रकारिता रूजवणारे दिवंगत पत्रकार दि. वि. गोखले यांच्या १०२व्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने रविवार दि. २३ मार्च रोजी पत्रकारिता वर्गाचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरवारे दर्पण या अंकाचं प्रकाशन सुद्धा करण्यात आलं. मराठी पत्रकारिता वर्गाची माजी विद्यार्थीनी वनश्री राडये यांना दि वी गोखले पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पत्रकारिता वर्गातील माजी विद्यार्थी तसेच वरिष्ठ वार्ताहार सुशांत सावंत यांना विद्याधर गोखले पुरस्कार तसेच वरिष्ठ पत्रकार प्रविण मरगळे यांना डॉ. अरुण टिकेकर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी दिवंगत पत्रकार नीला उपाध्याय यांच्या ह्रद्य आठवणींना उजाळा दिला.