मुंबई : ( Sushant Singh Rajput death was due to suicide CBI ) “दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूमागे कोणीही जबाबदार नसून त्याने आत्महत्याच केली आहे,” असा निष्कर्ष ‘सीबीआय’च्या रिपोर्टमध्ये काढण्यात आला आहे. शनिवार, दि. २२ मार्च रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात ‘सीबीआय’ने या प्रकरणाचा ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केले आहेत. सुशांत सिंगचे वडील केके सिंग यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत एक याचिका दाखल केली होती. तर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने राजपूत कुटुंबीयांविरुद्ध खटला दाखल केला होता. ‘सीबीआय’ने या दोन्ही खटल्यांचा अहवाल सादर केला आहे.
सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या प्रकरणात ‘सीबीआय’ने पटणा येथील विशेष न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला. तर दुसर्या प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर करण्यात आला. ‘सीबीआय’च्या रिपोर्टमध्ये “सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही, कुणीही त्याचा गळा आवळला नाही. तसेच, त्याच्यावर कुणी विषप्रयोगही केलेला नाही. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली,” असे या ‘क्लोजर रिपोर्ट’मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.