उत्तर प्रदेशच्या धर्तीवर ‘कुंभमेळा प्राधिकरण कायदा’ आणणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; त्र्यंबकच्या विकासासाठी १,१०० कोटींच्या योजनांची घोषणा
24-Mar-2025
Total Views | 11
नाशिक: ( Kumbh Mela Authority Act will be introduced like Uttar Pradesh Devendra Fadanvis) “उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच अमलात आणला जाईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, “त्र्यंबकराजाच्या अंगणातील सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणाला चालना देण्यासाठी विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरुवात करा. यासोबतच ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील याचीही दक्षता घ्या. यासाठी आवश्यक असलेल्या निधी राज्य शासनाकडून दिला जाईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
रविवार, दि. २३ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे सिंहस्थ कुंभमेळा-२०२७च्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी १ हजार, १०० कोटींच्या योजनांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बैठकीला जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ‘नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.
विकास आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. तसेच, त्र्यंबकेश्वर परिसराची नैसर्गिक रचना सुंदर आहे. त्यात अजून भर घालत विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी देण्यात येईल. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामे केली जातील.
या बाबी करण्यावर भर
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे कालबद्ध रितीने पूर्ण करत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक उपयोग आणि विद्युत वाहनेही उपयोगात आणण्याचे नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. हे करत असताना स्थानिकांना अधिक त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतागृहाची उत्तम व्यवस्था करण्यावर भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण
“उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच अमलात आणला जाईल,” असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “यामुळे कुंभामेळ्यासंबंधी कामांना कायदेशीर चौकट प्राप्त तर होईलच, पण गर्दीचे योग्य व्यवस्थापनही करता येईल. कुंभमेळ्याच्या आयोजनादरम्यान विविध सुविधांचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी ‘कुंभमेळा प्राधिकरण कायदा’ गरजेचा आहे. तसेच, गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करून त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच, दीर्घकालावधी लागणार्या कामांना त्वरित सुरुवात करावी,” असेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
1 हजार, 100 कोटींचा आराखडा
त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ पार पाडण्यासाठी निर्माण करण्यात येणार्या कामांसाठी तयार करण्यात आलेल्या सिंहस्थ विकास आराखड्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा १ हजार, १०० कोटी रुपयांचा असून त्याअंतर्गत त्र्यंबकराजाचे आध्यात्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेऊन विकासकामे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली.