सोन्यातील भाववाढ की भविष्य सुकर करणारी गुंतवणुक?

    24-Mar-2025
Total Views | 6

सोने

 
सोने आणि दागिने तज्ज्ञांच्या मते येत्या काळात कदाचीत हा भाव लाखाच्या आसपास जाऊ शकतो. या सर्व बातम्यांमुळे आपल्या सामान्य लोकांच्या मनात धडकीच भरली असेल. परंतु हेच सोन्याचे वाढते भाव भविष्यातील आपल्या समृध्दीचे उत्पन्नाचे सुरक्षित साधन होऊ शकतात याचा विचार आपण केलाय का?
 
 
सध्या लग्नसराईचे दिवस चालू आहेत. या काळात सर्वच गोष्टींच्या खरेदीला उधाण आलेले असते. यात सर्वात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे सोन्याचा. आपल्याकडे सोने हे आपल्या समृध्दीचे प्रतिक मानले गेल्याने, जास्त सोनं असणं हे प्रतिष्ठेचे मानलं जातं. परंतु सध्या या सोन्याने सर्वांनाच घाम फोडला आहे. सध्या हा लेख लिहिला जात असताना, मुंबई शहरात सोन्याचा प्रति तोळा भाव हा ८९ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातही काहीच दिवसांपूर्वी हाच भाव ९१ हजारांपेक्षा पुढे गेला होता. तज्ज्ञांच्या मते येत्या काळात कदाचीत हा भाव लाखाच्या आसपास जाऊ शकतो. या सर्व बातम्यांमुळे आपल्या सामान्य लोकांच्या मनात धडकीच भरली असेल. परंतु हेच सोन्याचे वाढते भाव भविष्यातील आपल्या समृध्दीचे उत्पन्नाचे सुरक्षित साधन होऊ शकतात याचा विचार आपण केलाय का? आज याच विषयाची, सोन्यातील गुंतवणुकीच्या फायद्यांची माहिती करुन घेऊया.
 
 
सर्वात पहिले आपण बघुया की सोन्याचे भाव का वाढत आहेत. सध्या जगात अशा काही घडामोडी घडत आहेत की त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहेत. जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त काळ रेगांळलेले रशिया – युक्रेन युध्द, हमास- इस्त्राइल संघर्ष, यांच्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, खनिज तेलाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे जगातील जवळपास सर्वच देशांत कमी अधिक प्रमाणात महागाई वाढत आहे. यामहागाईला आळा घालण्यासाठी जगातील प्रमुख देशांच्या बँकांनी व्याजदरांत वाढ करायला सुरुवात केली. यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा देखील समावेश होता. यामुळे डॉलरच्या किंमती वाढायला सुरुवात झाली. परिणाम आपल्या रुपयाच्या किंमतीतही घसरण व्हायला लागली. यासर्व अस्थिरतेच्या काळात एकच पर्याय उरला जो स्थिर परतावा देत होता तो म्हणजे सोने. जगात सगळीकडेच अशा जागतिक अस्थिरतेच्या काळात सोन्याकडे एक सुरक्षित पर्याय म्हणून बघितलं जातं. सर्व देशांच्या प्रमुख बँकादेखील सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला सुरुवात करतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे सोन्याच्या किंमतीत वाढ होते आणि मागणी वाढते. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती येत्या काही काळात बऱ्यापैकी निवळेल आणि सोन्याचे दर खाली उतरतील. परंतु अजून काही काळ तरी हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
 
ही झाली सोन्याच्या किंमती वाढण्यामागची महत्वाची कारणे. आता बघूया हीच वाढती किंमत आपल्याला कशापध्दतीने गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय ठरु शकते ते. आणि कुठले महत्वाचे गुंतवणुक पर्याय सध्या उपलब्ध आहेत ते. पूर्वीपासूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये सोने हे दागिन्यांच्या रुपात फक्त भूषण म्हणून मिरवणे एववढाच उपयोगासाठी घेतलं जात नव्हतं तर त्याचा एक गुंतवणुकीचे साधन म्हणून पण उपयोग होत असे. सोने गहाण ठेवून काम करुन घेतलं अशी कित्येक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतील. आताच्या काळात आपल्याला सोन्यात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातून चांगला परतावाही लोकांना मिळतो आहे.
 
यात सर्वात पहिले सरकारकडून पुढाकार घेऊन सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणली गेली होती. हे रोखे आपल्याला एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांसारख्या महत्वाच्या खासगी आणि सरकारी बँकांमध्ये उपलब्ध होते. या रोख्यांवर सरकारकडून अडीच टक्के व्याजदर दिला जाई. फेब्रुवारी २०२४ पासून सरकारने ही योजना बंद केली आहे. तरी जुन्या रोख्यांमध्ये आपण पैसे गुंतवू शकता. यातून आपल्याला सोन्याच्या त्या त्या वेळच्या प्रतितोळा किंमतीनुसार पैसे परत मिळायचे.
 
दुसरी योजना आहे, डिजीटल गोल्ड. या योजनेत आपण प्रत्यक्ष सोने खरेदी करत नाही तर आपल्यावतीने बँक किंवा आपली गुंतवणुक कंपनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म द्वारे सोन्यात गुंतवणुक करते. हा एक ब्लॉकचेनसारखा प्रकार असल्यामुळे आपली सोने हाताळणीची जोखीम कमी होते, त्याच बरोबर आपली माहिती, आपली गुंतवणुक सुरक्षित देखील राखता येते. अनेक गुंतवणुक कंपन्यांकडून हा पर्याय सांगितला जातो, तरीही गुंतवणुक करण्यापूर्वी सर्व माहिती घेण्याची, सर्व खबरदारी घेण्याची गरज नक्कीच आहे.
 
यानंतरचा पर्याय म्हणजे, सुवर्ण मुद्रीकरण योजना, गोल्ड मॉनेटाझेशन स्कीम. केंद्र सरकार कडून २०१५ साली ही योजना आणण्यात आली होती. या योजनेच्या मार्फत जसे आपण आपले पैसे बँकेत ठेवींच्या रुपाने ठेवून व्याज घेतो, त्याच प्रमाणे आपल्या घरातील सोने बँकेत ठेवून व्याज मिळवता येते. यामध्ये परत अडीच टक्क्यांपर्यंत व्याज मिळवता येते. यात लघु मुदतीचे तसेच दीर्घ मुदतीचे असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातून मॅच्युरिटीच्या वेळी सोन्याच्या त्या त्या वेळच्या किंमतीनुसार व्याज मिळतं. ही सुध्दा अनेक गुंतवणुक कंपन्या तसेच बँकांकडून दिली जाणारी सुविधा आहे. याशिवाय मोठ्या मोठ्या ज्वेलर्सकडून सुवर्ण भिशी योजना राबवली जाते, ज्यामुळे गरजेच्या वेळी किंवा दर वर्षाकाठी आपल्याला त्यातून खरेदी करता येते. ही योजनासुध्दा लोकप्रिय आहे. याशिवाय म्युच्युअल फंड्स सारखीच गोल्ड इटीफ योजना यांसारख्या योजना सुरुच आहेत.
 
आता सोन्यात गुंतवणुकीचे फायदे बघितले तर ही गुंतवणुक महागाई पासून संरक्षण देते, कारण साधारणत: सोन्याच्या किंमती महागाईच्या दरांनुसार वाढतात. गरजेच्या वेळी, अडचणीच्या वेळी आपल्याला सोने गहाण ठेवून किंवा विकून गरज भागू शकते. सगळेच उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले तर, सोने मात्र आपल्याला उपयोगी पडूच शकते. म्हणून आजकाल आपल्याला आपल्या एकूण गुंतवणुकीच्या १५-२० टक्के गुंतवणुक ही सोन्यात करण्याचा सल्ला दिला जातो.
 
हे सगळं बघता आता सोन्यात गुंतवणुक आपल्याला नक्कीच मालामाल करु शकते. परंतु त्यासाठी योग्य माहिती, गुंतवणुकीचे सर्व दस्तावेज नीट पडताळून बघण्याची खबरदारी मात्र घ्यायला हवी.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121