मुंबई : औरंगजेब हे आता उबाठा गटाचे नवे आराध्य दैवत बनले असल्याची टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. रविवार, २३ मार्च रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय निरूपम म्हणाले की, "नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची पाठराखण करणाऱ्या उबाठाचे औरंगजेब आता नवीन आराध्य दैवत बनले आहे. लवकरच मातोश्रीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढून औरंगजेबाचा फोटो लावला जाईल. संजय राऊत यांना महाराष्ट्रातील दंगलखोरांची खूप काळजी वाटते. मुस्लिम मतांसाठी मुल्ला संजय राऊत हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे. त्यांची मालमत्ता विकून शासनाने नुकसान भरपाई वसूल करावी. नागपूर शहरातील संशयित दंगेखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला जावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "नागपूर हिंसाचारात आतापर्यंत १०४ संशयतांना अटक झाली आहे. काल अटक झालेला सोशल मिडिया इन्फ्लुअर्स हा इंडियन मुजाहिद्दीन संघटनेशी संबधित आहेत. यापूर्वी मोमीनपुरात काही सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरने आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. मुस्लिम मतांसाठी उबाठा गट या संशयित लोकांची पाठराखण करत आहेत, यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे मुस्लिमधार्जिणी भूमिका घेऊन हिंदु लोकांची बदनामी करत आहेत," अशी टीका संजय निरुपम यांनी केली.
हिंदुत्वापासून उबाठाचा युटर्न
"उबाठाने हिंदुत्वापासून युटर्न घेतला आहे. केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला उबाठाने विरोध केला आहे. यासाठी देशातील मौलानांबरोबर उबाठाने बैठक केली. या बैठकीसाठी मुल्ला संजय राऊत यांनी प्रयत्न केले. मुस्लिम मतांसाठी उबाठाने विचारांशी तडजोड करुन प्रो मुस्लिम भूमिका घेतली. ज्याप्रमाणे मुलायम सिंग यांनी मुस्लिमांची बाजू घेतली होती. त्यावरुन त्यांना मुल्ला मुलायम असे बोलले जात होते. तशाच प्रकारे आता उबाठाचे खासदार संजय राऊत हे मुल्ला संजय राऊत झाले आहेत," असा हल्लाबोल संजय निरुपम यांनी केला आहे.