टेक्सासमधील पशुपालन, शेती आणि कापूस उत्पादन यांसारख्या पारंपारिक उद्योगांबरोबरच ऊर्जाक्षेत्रांनेही भरारी घेतली आहे. यासोबतच विमान कंपन्या, प्रवास, मनोरंजन आणि तंत्रज्ञान (संगणक, अंतराळ आणि दूरसंचार) यांसारख्या अन्य उद्योगांना आज लक्षणीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काही प्रमाणात या उद्योगांना देशातील सरकारकडून विशेषतः ‘एरोस्पेस’ उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि निधीही मिळाला. उदाहरणार्थ, ‘टेक्सास ए अॅण्ड एम विद्यापीठा’चे २०० दशलक्ष डॉलर्सचे नवीन अंतराळकेंद्र ह्यूस्टनमधील ‘नासा’च्या ‘जॉन्सन स्पेस सेंटर’च्या शेजारी उभारण्यात येईल, जे अमेरिकेतील सर्वांत मोठ्या बांधकाम प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. ही नवीन सुविधा अंतराळवीरांना प्रशिक्षण, वैमानिकी संशोधन, प्रगत रोबोटिक्स आणि चंद्र आणि मंगळ ग्रहावर अभ्यास व संशोधन मोहिमेवर काम करण्यास मदत करेल. चंद्रावरील प्रकाशाचे अनुकरण करू शकणारे ‘इनडोअर रॉक यार्ड’ आणि कमी गुरुत्वाकर्षण निर्माण करणारे मशीनदेखील असेल. २० मैलांपेक्षा थोडे दूर, ह्यूस्टनच्या मध्यभागी एक मोठे प्राणीसंग्रहालयाचे अद्ययावतीकरण केले जात आहे. या १५० दशलक्ष डॉलर्सच्या प्रकल्पासह ‘गॅलापागोस बेटे’ नावाची अत्याधुनिक प्रदर्शनी पर्यटकांना बेटावरील अद्वितीय लॅण्डस्केप्स आणि सागरी अधिवासांना उजाळा देणार्या वातावरणाची निर्मिती करते.
राज्यातील काही मोठ्या कंपन्या ज्या किरकोळ विक्री आणि उत्पादन उद्योगांमध्ये (उदा. फार्मसी, ऑफिस डेपो, सेफवे, कोकाकोला आणि इंटरनॅशनल पेपर) कार्यरत आहेत. त्यांचे मुख्यालय सामान्यतः टेक्सासमध्ये नसले, तरीही या कंपन्यांनी टेक्सासमध्ये रोजगार आणि उत्पादनाच्या वाढीचे प्रतिनिधित्व केले आहे. टेक्सासमधील या राज्याबाहेरील कॉर्पोरेशन्सचे महत्त्व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या वाढते स्वरूप प्रतिबिंबित करतात. ‘आंतरराज्य महामार्ग प्रणाली’ने कॉर्पोरेट रेस्टॉरंट साखळ्यांच्या विकासाला लक्षणीय चालना दिली. अलीकडच्या वर्षांत राज्याच्या असंख्य कॉर्पोरेट साखळी रेस्टॉरंट कंपन्यांचे (चर्च, पोपेय, चिली, रेड लॉबस्टर आणि लुबी आणि इतरांसह) महत्त्व ‘राष्ट्रीय महामार्ग प्रणाली’शी निगडित आहे. या कॉर्पोरेट रेस्टॉरंट साखळ्यांचा आकार राज्यभरातील उपनगरे आणि उपनगरीय क्षेत्रांच्या वाढीचे प्रतिबिंबदेखील दर्शवितो, ज्याला विस्तृत महामार्गांमुळे सुलभता मिळाली.
दि. १३ मार्च २०२४ रोजी युकेने अमेरिकेतील दुसर्या क्रमांकाचे सर्वांत मोठे राज्य टेक्साससोबत परस्पर सहकार्याच्या निवेदनावर (एसएमसी) स्वाक्षरी केली, ज्याचा उद्देश दोन्ही प्रदेशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि वाणिज्य वाढवणे आहे. हे ‘एसएमसी’ अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते, जिथे युके आणि टेक्सास दोघेही कौशल्य सामायिक करतात, ज्यात नावीन्यपूर्ण ऊर्जा उपाय (जसे की, हायड्रोजन आणि कार्बन कॅप्चर, वापर आणि साठवणूक), जीवन विज्ञान आणि व्यावसायिक व्यवसाय सेवा यांचा समावेश आहे.
युके आणि टेक्सास राज्यादरम्यान आर्थिक विकास आणि व्यापारावरील ‘एसएमसी’वर स्वाक्षरी झाल्याच्या दिवशी, टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट आणि टेक्सासशी व्यावसायिक संबंध असलेल्या युके उद्योगाचे प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांपैकी बरेचजण अभियांत्रिकी क्षेत्रात काम करतात. या कराराच्या आधीही, युके कंपन्यांनी टेक्सासशी जवळचे संबंध प्रस्थापित केले होते. टेक्सास राज्यात ३० युके विज्ञान कंपन्यांना विस्तारण्यास मदत करणारा ‘बायोब्रिज प्रकल्प’ आधीच अस्तित्वात आहे. हा करार आर्थिक संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी दिसतो. या भागीदारीमुळे व्यावसायिक पात्रता ओळखण्यासदेखील मदत होईल.
उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रात वैयक्तिक संगणक निर्माता ‘डेल संगणक कॉर्पोरेशन’, दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज एटी अॅण्ड टी आणि चिपनिर्माता ‘टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स’ (डॅलस) अशा प्रतिष्ठित नावांचा समावेश आहे. या तिन्ही कंपन्या टेक्सासमधील टॉप १०० नियोक्त्यांमध्ये आहेत. टेक्सासमधील कंपन्या इतर आर्थिक क्षेत्रांमध्ये इतक्या प्रभावी नसल्या, तरी त्या त्यांच्या उद्योगांमधील काही आघाडीच्या व्यवसायांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, विमान उद्योग आणि पर्यटन क्षेत्रांसंबंधित उद्योगांच्या वाटा विस्तारल्या. विमान आणि हवाई प्रवास उद्योगाला टेक्सासच्या वाढत्या शहरीकरणामुळे विशेष फायदा झाला आहे.