आग्रा येथील शिवस्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे
तज्ज्ञांची समिती स्थापन होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेची अंमलबजावणी
22-Mar-2025
Total Views | 7
मुंबई: ( The responsibility of constructing the Shiv Smarak in Agra falls to the Tourism Department Devendra Fadanvis ) आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीदिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वित आणि निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.
स्मारक उभारणीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ज्ञांसह जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण आणि अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागांतर्गत ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ’ कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका, महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
निर्णय काय?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांना मावळ्यांसह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते. परंतु, आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभुराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली. या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबात मराठीच नव्हे, तर इतिहासप्रेमी पर्यटकांत औत्सुक्य असते.
आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत राहिले, त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात. मात्र, या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहोचत नाही. अशा स्थळासाठी आणि त्या देदीप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम राहावा, त्या स्थळांची, त्या वारशांची जतन, संवर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळेसुद्धा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.