दि. 20 मार्च 2025 रोजीचा मानवी अंतराळयात्रेच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस! भारतवंशीय अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनंतर यशस्वीरित्या पृथ्वीवर परतल्या. ‘बोईंग’ कंपनीच्या ‘स्टारलाईनर सीएफटी’ या चाचणी मोहिमेद्वारे त्यांनी अंतराळात गेल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जात, एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. हे केवळ एका अंतराळवीराचे पुनरागमन नव्हते, तर अनेक तांत्रिक अडथळ्यांना पार करून मानवी जिद्द आणि विज्ञानाच्या सहकार्याने घडवलेले एक अद्वितीय यश आहे.
सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर यांनी 2024 सालच्या जून महिन्यात ‘बोईंग’च्या ‘सीएफटी’ (क्रू फ्लाईट टेस्ट) या चाचणी मोहिमेअंतर्गत ‘स्टारलाईनर’ यानातून अंतराळ गाठले. ही मोहीम खासकरून ‘नासा’साठी आणि ‘बोईंग’ कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाची होती. कारण, यामार्फत ‘स्टारलाईनर’ ही यानप्रणाली भविष्यातील मानववाहू उड्डाणांसाठी पात्र ठरू शकते का? हे सिद्ध करायचे होते. सध्या ‘स्पेसएक्स’च्या ‘क्रू ड्रॅगन’ या यानाचा वापर नियमितपणे केला जात असला, तरी ‘स्टारलाईनर’ हे त्याचे पर्यायी आणि सुरक्षित पर्याय ठरू शकते, अशी ‘नासा’ची अपेक्षा होती.
अंतराळवीरांना सुरक्षितपणे अंतराळ स्थानकावर नेणे आणि परत आणणे, यानातील लाईफ सपोर्ट, डॉकिंग, कम्युनिकेशन, मॅन्युव्हरिंग अशा विविध प्रणालींची चाचणी घेणे आणि भविष्यातील वापरासाठी त्यातील त्रुटी शोधणे, ही या मोहिमेची उद्दिष्टे होती. दि. 5 जून 2024 रोजी ‘नासा’च्या केनेडी स्पेस सेंटरवरून ‘स्टारलाईनर’ यानाने उड्डाण केले. काही तांत्रिक त्रुटींमुळे ही मोहीम काहीवेळा पुढे ढकलण्यात आली होती. पण, अखेरीस यानाने यशस्वीपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आपले ‘डॉकिंग’ पूर्ण केले.
परंतु, हे ‘डॉकिंग’ आणि त्यानंतरचा कालखंड नुसता प्रयोगात्मक नव्हता; तो एका कठीण परीक्षेचा काळ होता. या मोहिमेसाठी केवळ काही आठवड्यांचा मुक्काम अपेक्षित होता. मात्र, यानाच्या प्रणालींमध्ये अडचणी निर्माण झाल्याने, विशेषतः ‘थ्रस्टर’ (प्रणोदन यंत्रणा) आणि ‘प्रोपल्शन सिस्टम’मध्ये बिघाड झाल्याने विल्यम्स आणि विल्मोर यांना स्थानकातच थांबावे लागले. यानाच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा नीट कार्यरत नसल्याने ‘नासा’ आणि ‘बोईंग’ने दोघांना स्थानकात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुनीता विल्यम्स यांना 270 दिवसांहून अधिक काळ अंतराळ स्थानकात राहावे लागले.
हा काळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून अतिशय मौल्यवान ठरला. कारण, नियोजित कालावधीपेक्षा अंतराळात खूप अधिक काळ राहिल्यामुळे मानव शरीरावर दीर्घकालीन भारहीनतेचा किंवा सूक्ष्म गुरुत्वीय परिस्थितीचा काय परिणाम होतो, हे पाहण्याची संधी संशोधकांना मिळाली. त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील नोंदी, वैद्यकीय तपासण्या, आणि शारीरिक-मानसिक प्रतिक्रियांचा सखोल अभ्यास केला गेला. अंतराळात इतका काळ राहिलेल्या अल्पसंख्य अंतराळवीरांमध्ये सुनीता विल्यम्स यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले.
या दीर्घ मुक्कामामुळे केवळ शारीरिकच नाही, तर तांत्रिक पातळीवरही अनेक समस्या नव्याने समजल्या. ‘स्टारलाईनर’च्या प्रवासातील सात ‘थ्रस्टर’ अपयशी ठरले होते. ‘थ्रस्टर’ म्हणजे यानाच्या हालचाली नियंत्रित करणारी प्रणोदन प्रणाली. शिवाय काही तापमान नियंत्रण यंत्रणाही कार्यरत नव्हत्या. अंतराळात अशा यंत्रणा निकामी झाल्यास परतीचा प्रवास अत्यंत धोकादायक होतो. त्यामुळे ‘नासा’ने परतीचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला. प्रत्येक भागाची चाचणी, दूरस्थ दुरुस्ती आणि पर्यायी प्रणालींची खात्री करून घेतली गेली. या सगळ्या प्रक्रियेस अनेक महिने लागले. अखेरीस मार्च 2025 साली परतीसाठी परवानगी देण्यात आली.
दि. 20 मार्च 2025 रोजी सकाळी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी ‘स्पेसएक्स’च्या ‘ड्रॅगन कॅप्सूल’मधून पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर, कॅप्सूलची गती मंदावण्यासाठी थरांमध्ये बसवलेले उष्णता प्रतिरोधक कवच सक्रिय झाले. नंतर मोठ्या पॅराशूट्सच्या मदतीने न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सॅण्ड्स परिसरात सकाळी 10.52 वाजता ते सुरक्षितपणे उतरले. त्यावेळी त्यांचा हृदयस्पर्शी प्रतिसाद होता, “ही पृथ्वी सुंदर आहे. परत येताना जिवंत असण्याची जाणीव होते.”
अर्थात, अशा मोहिमांचे यश हे सहज शक्य होत नाही. त्यामागे अनेक दशके चाललेले संशोधन, अयशस्वी प्रयोग आणि अनेकदा माणसाच्या जीवावर बेतलेली संकटे असतात. अंतराळ प्रवास जितका रोमांचक वाटतो, तितकाच तो धोकादायकही असतो. यशाच्या प्रत्येक टप्प्यांआधी अपयशाच्या अनेक छाया उमटलेल्या असतात.
1986 साली स्पेसशटल ‘चॅलेंजर’ हे यान उड्डाणाच्या अवघ्या 73 सेकंदांनी फुटले आणि त्यातील सातही अंतराळवीर मृत्युमुखी पडले. क्रिस्टा मॅकऑलिफ यांचा त्या दुर्घटनेत समावेश होता. ही घटना संपूर्ण जगासाठी हादरवून टाकणारी होती. त्यानंतर 2003 साली ‘कोलंबिया’ हे यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना विघटित झाले. त्यात भारताच्या कल्पना चावला यांच्यासह सातही अंतराळवीरांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचे परतीचे स्वप्न अधुरेच राहिले.
हे अपघात केवळ तांत्रिक दोषांचे परिणाम नव्हते, तर संपूर्ण अंतराळ कार्यक्रमावर पुनर्विचार करण्याची गरज दर्शवणारे क्षण होते. ‘नासा’ने त्यानंतर सर्व मोहिमांमध्ये ‘सुरक्षा प्रथम’ हे तत्त्वज्ञान अधिक ठामपणे अंगीकारले. त्याच धर्तीवर ‘स्टारलाईनर’ मोहिमेतील विलंब आणि सतर्कता हेदेखील त्या धड्यांचे प्रत्यक्ष उदाहरण होते. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी तब्बल नऊ महिने परत येऊ शकले नाहीत. कारण, ‘नासा’ आणि ‘बोईंग’ या दोघांनीही धाडसापेक्षा ‘सुरक्षिततेला प्राधान्य’ हे धोरण बळकट केले.
आज आपण ज्या आत्मविश्वासाने त्यांच्या यशाचा गौरव करतो, त्यामागे अशा अपघातांची, चुका टाळण्यासाठी घालण्यात आलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांची आणि हजारो अभियंत्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची साखळी आहे. कोणतीही चाचणी मोहीम जशी की, ही ‘स्टारलाईनर सीएफटी’ मोहीम केवळ प्रयोग नसते, तर ती भविष्याच्या सुरक्षा कवचाची उभारणी असते.
सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील हा तिसरा प्रवास होता. 2006 आणि 2012 साली त्यांनी अनुक्रमे ‘एसटीएस-116’ आणि ‘एक्सपिडिशन 32’ मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. एकूण अंतराळात त्यांनी आता 550हून अधिक दिवस घालवले असून, महिला अंतराळवीरांमध्ये ही एक अत्युच्च नोंद मानली जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक स्पेसवॉकही केले आहेत. तसेच, अंतराळात धावणार्या पहिल्या अंतराळवीरांपैकी एक होण्याचा मानही त्यांना आहे.
अंतराळात राहणे, म्हणजे केवळ अवकाशात तरंगणे नव्हे. तिथे दररोजच्या साध्या गोष्टींसाठीही अत्यंत नियोजन लागते.खाणे-पिणे, झोप, व्यायाम, शौच सगळे काही नियंत्रित वातावरणात घडते. त्यात अंतराळ स्थानकातील बिघाड, यानातील तांत्रिक दोष आणि पृथ्वीपासून हजारो किमी दूर असल्यामुळे निर्माण होणारा मानसिक ताण यांच्याशी सामना करावा लागतो. दीर्घ मुक्कामामुळे हाडांची घनता कमी होते, स्नायू कमकुवत होतात आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. विल्यम्स यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितले की, “तिथे प्रत्येक क्षण ही जबाबदारी असते. विज्ञानाच्या सेवेत असणे, म्हणजे त्यासाठी स्वतःला सतत तयार ठेवणे.”
भविष्यात सुनीता विल्यम्स ‘नासा’च्या ‘आर्टेमिस’ उपक्रमात सामील होण्याची शक्यता आहे. हा उपक्रम मंगळ व चंद्र मोहिमांच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. विशेषतः चंद्रावर मानवाला पुन्हा पाठवण्याच्या ‘नासा’च्या योजनांमध्ये महिला अंतराळवीर म्हणून त्यांचा अनुभव फार उपयुक्त ठरू शकतो. शिवाय भारतीय वंशाच्या अंतराळवीरांनी अमेरिकन अवकाश कार्यक्रमात दिलेले योगदान अधिक ठळकपणे पुढे आणण्याच्या दृष्टीनेही हा टप्पा महत्त्वाचा ठरेल.
सुनीता विल्यम्स यांचा हा प्रवास अनेक अर्थांनी प्रेरणादायी आहे. विज्ञानाची, संयमाची आणि धैर्याची परिपूर्ण कहाणी त्यात आहे. अंतराळात नऊ महिने अडकूनही तिथे त्यांनी केलेले प्रयोग, जपलेले मानसिक संतुलन आणि अखेरच्या क्षणी दाखवलेला आत्मविश्वास या सर्व गोष्टी विज्ञानाच्या आणि माणुसकीच्या प्रगतीचे प्रतीक ठरतात.
आज जेव्हा आपण त्यांचे पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन साजरे करतो, तेव्हा आपल्या मनात एक नवा विश्वास निर्माण होतो की, संकट कितीही मोठे असो, संयम आणि विज्ञानाच्या साह्याने आपण मार्ग काढू शकतो आणि त्या मार्गावर सुनीता विल्यम्ससारख्या अंतराळवीरांच्या अनुभवाचा प्रकाश आपल्याला दिशादर्शक ठरतो.
sumiba_r@yahoo.com
सुजाता बाबर