कोणत्याही कलाकृतीचा महत्त्वाचा भाग कोणता असेल तर, त्या कलाकृतीचा चाहतावर्ग, नाटकामध्ये असतात ते मायबाप रसिक! या रसिकांमुळे नवनवीन नाटकांच्या माध्यमातून कलाकार नटराजाची आणि रंगदेवतेची सेवा करतो. मात्र, रसिक प्रेक्षकांमध्येही काही फरक असतात. बालनाट्याला येणारे रसिक तर ना ना वयोगटाचे आणि तर्हे तर्हेचे उद्दिष्ट सोबत घेऊन आलेले असतात. त्यामुळे साहजिकच नाटकामधून होणारी त्यांची उद्दिष्टपूर्तीही अशीच निरनिराळी असती. तरीही कलाकार आणि रसिक यांचे नाते कायमचे जोडले गेलेले असते. कलाकार आणि रसिक प्रेक्षकांच्या नात्यावर या लेखातून टाकलेला हा प्रकाश...
नमस्कार, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत, दोन अंकी नाटक...’ अशी सुरुवात आपण नेहमीच ऐकतो. नाटक सुरू होण्यापूर्वी सर्वात आधी रंगदेवता आणि मग प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. कारण, नाटक ही सादर करण्याची कला आहे. स्वानंदातून परमानंद मिळवण्याचे सामर्थ्य नाट्यकलेत आहे. कवी कालिदास यांच्या ‘वाल्मिकी अग्निमित्रम’ नाटकात एक श्लोक आहे, त्यातली शेवटची ओळ अशी आहे, “नाट्यम भिन्नरूचेरजनस्य बहुधाप्येकं समाराधनम.” भिन्न आवड असलेल्या लोकांचे मनोरंजन आणि समाधान नाट्यकला करते. नृत्य, संगीत, वाङ्मय, नेपथ्य या सगळ्यांचा समावेश असल्यामुळे, ती एक संपूर्ण कला आहे. दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे ती जिवंत कला आहे आणि ती चिरंतर चालत आलेली आहे. नाट्यकलेत समाविष्ट असलेल्या इतर सगळ्या कला स्वतःपुरत्या सादर केलेल्या चालतात पण, नाटकात हवे असतात प्रेक्षक. रसिक मायबाप प्रेक्षक असतील, तर कृष्णलीला करणारे प्रौढ आणि बालकलाकारही ब्रह्मानंद मिळवतात. साहजिकच आहे कारण सजग, सुज्ञ आणि संस्कृती जपणारा प्रेक्षक भाग्यवान कलावंतांना लाभला आहे. मराठी प्रेक्षक कलेवर, कलाकारांवर भरभरून प्रेम करतो. त्यामुळेच तर नाट्यकला टिकून आहे. तो आपले मत स्पष्ट मांडतो, हळूच कान पिळतो, वेळोवेळी दाद देतो आणि प्रशंसा हातचे राखून करीत नाही.
आज आपण लेखात बालनाट्याला येणार्या प्रेक्षकांबद्दल बोलणार आहोत. जसा बालनाट्याचा विषय, मांडणी, हाताळणी, सादरीकरण हे वेगळे असतात, तसाच त्याचा प्रेक्षकही. मला वाटते, नाटक आपण दोनदा जगतो. प्रेक्षकांसमोर सादर करताना, म्हणजे नाटकाचा भाग होऊन दिलेल्या भूमिकेत शिरून, मग बालकलाकारावर त्याचा सारासार परिणाम सकारात्मक व्हायला हवा. विचार करायला लावणारा असला, तर त्याला त्याच्यापुरते उत्तर सापडायला मदत करणारा प्रवास हवा. हे करत असताना बालकलाकारांचा सर्वांगीण विकास होण्याकडे लक्ष ठेवायला हवे. शिवाय प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होते आहे ना, हे बघणेही महत्त्वाचे.
नाटक कसे असावे, कसे होते याबद्दल आपण अनेकदा बोलतो. पण, रसिक मायबाप प्रेक्षकहो, तुम्ही कसे असावे? तुम्ही म्हणाल प्रेक्षक प्रेक्षक असतो. त्यात ‘रंगभूमी’ आणि ‘बालरंगभूमी’ अशी विभागणी कशाला? तर गरज आहे. प्रौढ रंगभूमीचा प्रेक्षक खाऊचा डबा, पाण्याची बाटली आणि बालमन घेऊन येत नाही. तसेच बालरंगभूमीचा प्रेक्षक हा एकटा नसतो तर त्याच्याबरोबर प्रौढ प्रेक्षकही येतो. त्यातले काही शिक्षक असतात तर काही पालक. त्यांचे ही मनोरंजन बालनाट्याला कळत नकळत करायचे असते. काही चिकित्सक असतात, तर काही ताईदादा म्हणून, आईवडिलांनी जबरदस्ती सोबत पाठवलेले असतात. असे नानाविध मानसिकतेचे, वयोगटातले प्रेक्षक बालनाट्याला मिळतात. भोकाड पसरून, डायपर घालून आलेले प्रेक्षकही आम्हाला मिळतात. काही पालकवर्ग फक्त आपल्या पिलांना बघायला येतात. त्यांच्या मुलांचे झाले की, टाळ्यांचा वेग कमी होतो. कधी कधी नको तिथे शिट्ट्या आणि टाळ्याही वाजतात. पण, हा गोंधळ असला तरी त्यात प्रेम असते आणि ते मुलांना जाणवते.
आजचा प्रेक्षक झपाट्याने बदलतो आहे. आयुष्याचा वेग वाढतो आहे, तसाच वेग त्याला नाटकात हवा. एकाग्रतेने बघणे फार काळ जमत नाही. नाटकाची तांत्रिक बाजू त्याला तगडी हवी आणि भाषेचा बट्ट्याबोळ होत असल्याने, अवघड मराठी शब्द त्याच्या पचनी पडत नाही. मग अचानक, “मम्मा, व्हॉट डिड शी जस्ट से?,” असे ऐकायला येते. आजच्या चिमुकल्या प्रेक्षकांना विचारांचे नाटक हवे; पण मनोरंजन जास्त आणि प्रवचन, प्रबोधन फारसे नको. हे सगळे लक्षात घेऊनच एक दिग्दर्शक नाटक बसवतो. हुशार दिग्दर्शक प्रेक्षकांना हवे तेवढेच न देता, समाजासाठी योग्य असे पण देतो. नाटकाचा दर्जा उंचावेल, प्रेक्षक नाटक घरी घेऊन जातील, हा त्याचा प्रांजळ प्रयत्न असतो. हे करत असताना लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या पण काही अलिखित अपेक्षा प्रेक्षकांकडून असतातच. त्या म्हणजे, त्यांनी नाटक शांतपणे पाहावे, पूर्ण पाहावे, संपल्यानंतर अभिप्राय द्यावा, हवी तिथे दाद द्यावी, नाटकाला वेळेवर यावे. हे बालनाट्य आहे आणि मुलं ही मुलं आहेत, त्यांना नाटकात चुका करण्याचा अधिकार आहे. अर्थात कलाकारांनी नेहमीच तालमींवर अधिक भर द्यावा. पण, काही चूक झालीच, तर ती पोटात घ्यावी. मुलांना प्रोत्साहन कसे देता येईल, याकडे अधिक लक्ष असावे. आजच्या बालकलाकारांमध्ये सभाधीटपणा जास्त आढळून येतो. पण, सगळ्याच कलाकारांना एकाच तराजूत मोजू नये. तुमची एक चुकीची टाळी आणि तू असा कसा चुकलास? म्हणून रागावण्यानेही, त्यांचे मनोधैर्य खचवू शकते. पालक-प्रेक्षकहो हे नाटक आहे, सांघिक नृत्य नाही. त्यामुळे सगळ्यांनाच प्रमुख भूमिका कशी मिळेल? सगळेच एकाच रांगेत उभे राहून कसे वाक्य बोलतील? “तुला पाच आणि त्याला दहा वाक्य! तू जास्त छान करत होतास, तुलाच जास्त वाक्य हवी होती,” असे म्हणणे घातक ठरू शकते. दिग्दर्शक, आईवडील यामध्ये योग्य कोण? मीच कमी तर पडलो नाही ना? अशा संभ्रमात कलाकार पडू शकतो. बालनाट्य मुलांनी मुलांसाठी सादर केलेले असते, त्याचे आणखी प्रकार असतात. जसे मोठ्यांनी लहानांसाठी, लहानांनी मोठ्यांसाठी केलेले नाटक! पण, लहानांनी लहानांसाठी केलेल्या नाटकात, लहान प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून नाटक बसवलेले असते. त्यामुळे त्यातले विनोद पाचकळ वाटू शकतात पण, ते मुलांना आवडतात. त्यांच्या भावविश्वातले असल्यामुळे ते घेणे आवश्यक असते. मोठ्यांना ते कंटाळवाणे वाटू शकतात. विचारांना चालना देणारे नाटकच नव्हते, असा शेरा मारत ते घरी जातात. पण, असे म्हणण्याअगोदर एकदा तुमच्याबरोबर आलेल्या बाल प्रेक्षकाला “काय रे, कसे वाटले तुला नाटक?” हे विचारा. काय म्हणायचे होते कलाकारांना नाटकात? असे विचारले, तर ते तुम्हाला नाटकातला संदेश पटदिशी सांगतील. स्वतःला थोडे लहान आणि मनाला थोडे मोठे करण्याची गरज आहे. प्रौढ प्रेक्षकसुद्धा बालनाट्याचे प्रेक्षकच, त्यांनी तर यायलाच हवे. आपली मुलं काय बघत आहेत, त्यांना काय आवडते, जाणून घेण्यासाठी त्यांनी यायला पाहिजे. पण, त्यांची जबाबदारी इथंवर संपत नाही. किमान शेजारच्या एका मुलाला सोबत घेऊन येणे गरजेचे आहे. नाटक म्हणजे काय हे कळण्यासाठी, उद्याचा कलाकार घडवण्यासाठी, मुलांना नाटक दाखवणे आवश्यक आहे. त्याला घरातून बाहेर नेऊन, त्याच्या मनोरंजनासाठी उत्तम आणि श्रीमंत कलाप्रकार नाटक दाखवणे अत्यावश्यक आहे. उद्याचा प्रेक्षक तयार झाला की, नाट्यकलेला दिवस चांगले येतील. एवढे सगळे वाचून तुम्हाला प्रेक्षक कसा असावा, याचे उत्तर मिळाले असेलच.
रसिक वाचकहो, बालनाट्य पाहणार्या मुलांवर होणारे विलक्षण सकारात्मक परिणाम मी पाहिले आहेत. मुलं घरी जाऊन नाटकातले गाणे गुणगुणतात, वाक्य म्हणून पाहतात, याव्यतिरिक्त त्यांना प्रश्न पडतात. त्यांच्याच वयाची मुलं सादर करत असल्यामुळे, बालकलाकार म्हणजे आपणच आहोत हे जाणवते आणि मग ते कलाकारांच्या भावनांशी एकरूप होतात.
नाट्यकला जिवंत कला आहे. त्यातले प्रवेश आपल्या डोळ्यादेखत घडत असतात. त्याची मजा काही औरच असते. वाचकहो, तुम्ही बालनाट्य बघता की नाही? नक्की बघा. पुस्तक वाचून सिनेमाची मजा येत नाही, तसेच लेख वाचून बालनाट्य बघण्याची मजा येणार नाही. मी प्रेम करणारे, रुसणारे, रागावणारे प्रेक्षक पाहिले आहेत. प्रेक्षकांना मायबाप म्हटल्यावर तसे ते असणारच! कलाकार लहान असो वा मोठा, जसे कलेचे भुकेले, तसेच प्रेक्षकांचेही. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. त्यामुळे लेखात काही वावगे लिहिले असेल, फार अपेक्षा ठेवत असेन, तर तुम्ही मोठ्या मनाने चुका पोटात घ्याल, अशी खात्री आहे. मी तुमचे डोळे पाणावलेले पाहिले आहेत, वाह! आहा! ऐकून धन्य झाले आहे, टाळ्यांच्या कडकडाटाने पाठीवरून वात्सल्याचा हात फिरल्याचाही भास झाला आहे आणि जेव्हा तुम्ही उठून दाद देता, तेव्हा माझ्याही डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले आहेत. रंगदेवता आणि मायबाप प्रेक्षकहो, तुम्हाला हात जोडून आम्ही नाटकाची सुरुवात करतो. त्याच्या शेवटी तुमचेही कर जोडले जावे आणि टाळ्यांच्या गर्जनेने नाटकाचा पडदा पडावा.
रानी राधिका देशपांडे