दिशा सालीयान प्रकरणात खा. नारायण राणे यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, "उद्धव ठाकरेंचे दोन फोन..."
22-Mar-2025
Total Views | 56
मुंबई : राज्यभरात सध्या दिशा सालीयान मृत्यू प्रकरणाची चर्चा असून शनिवार, २२ मार्च रोजी खा. नारायण राणे यांनी याप्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार नारायण राणे म्हणाले की, "घटना घडली त्यादरम्यान मी माझ्या घरी जात असताना मला मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला आणि साहेबांना बोलायचे आहे असे ते म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन घेतला आणि मला म्हणाले, तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. त्यामुळे याप्रकरणात तुम्ही आदित्यचे नाव घेऊ नये अशी माझी विनंती आहे. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मी कुणाचे नाव घेतले नाही, पण एका निरपराध मुलीची हत्या झाली असून तिला न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भावना आहे. मी तुमच्या मुलाचे नाव घेतले नाही. पण त्यावेळी एक मंत्री होता हे मी म्हटले. तो मंत्री आता पुढे आला आहे. तुमचा मुलगा संध्याकाळी जिथे जातो त्याला जरा आवरा असेही मी त्यांना सांगितले. त्यानंतर कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंचा दुसरा फोन आला. राज्य सरकारची एक परवानगी घेण्यासाठी मी त्यांना फोन केला होता. त्यावर ते म्हणाले की, परवानगी तर मिळेलच. पण साहेब तुम्ही पत्रकार परिषद घेताना तो उल्लेख टाळलात तर बरे होईल. यावरही घटनेच्या वेळी एक मंत्री होता आणि ते कॅमेऱ्यामध्ये आले आहे, असे मी त्यांना सांगितले."
या प्रकरणात आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतात? त्यांच्याच गाडीचे नाव आणि नंबर का समोर येतो? याबाबतचे सत्य आमच्यासोबत आहे. पोलिसांनी अद्याप संबंधित गुन्हेगारांना अटक केली नाही. त्यामुळे दिशाच्या वडिलांना हायकोर्टात जावे लागले. त्यावेळी सतीश सालीयान यांच्यावर दबाव होता. किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी जात होत्या. त्यावेळी त्यांना पोलीस, आरोग्य विभाग कुणीही मदत करत नव्हते. रुग्णवाहिका बदलली गेली. हे प्रकरण दाबण्यासाठी हे सगळे सुरू होते. आता त्यांना आपल्यावरील दबाव कमी झाला असे वाटत असल्याने ते पुन्हा न्यायालयात गेले. परंतू, अजूनही ते कुटुंब पूर्णपणे दबावाच्या बाहेर गेलेले नाही," असे त्यांनी सांगितले. तसेच सुशांत सिंगची हत्या त्याचा नोकर सावंत याच्यासमोर झाली. त्याची चौकशी का करत नाही?" असा सवालही त्यांनी केला.
सचिन वाझेच करता-करविता
"एखाद्या महिलेवर अत्याचार होऊन तिची हत्या झाली असेल तर पोलिसांनी त्वरित एफआयआर दाखल करून अटक करून चौकशी करावी, असा कायदा आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई का केली नाही? सचिन वाझे आता ताब्यात आहे. तोच या सगळ्याचा करता करविता आहे. आता कोर्ट देईल तेव्हा निर्णय देईल. पण सरकारने आतापर्यंत आलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करून अटक करावी," अशी मागणीही त्यांनी केली.
चित्रा वाघ यांच्यामागे पूर्ण भाजप
"अनिल परब आणि आक्रमकता हे समीकरण जमतं का? वकील असल्यामुळे ते भाषण करू शकतात. पण त्यांना काही जमणार नाही. एक पाहू शकत नाही ५६ काय पाहणार. आधी चित्रा वाघला एकटीला पाहा. ती एकटी नसून तिच्यामागे पूर्ण भाजप आणि मी स्वतः आहे. त्यामुळे अनिल परब यांनी आपले तोंड बंद ठेवावे" अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
संजय राऊत मनोरुग्ण
"संजय राऊत मनोरुग्ण झाले आहेत. त्यांना मेडिकल चेकअप करावे लागेल. ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना पत्रकार समजू नका. आपल्याला कुठे चान्स मिळतो का याची वाट ते पाहत आहेत. उबठाचे दुकान बंद होण्याची वेळ आली आहे. आता २० आमदार आहेत. काही दिवसांत १० वर येतील. पुढच्या निवडणूकीपर्यंत फक्त नामधारी १-२ आमदार असतील," असेही ते म्हणाले.