कोल्हापूरपासून साधारण 60 किमी, कृष्णवेणी आणि कुवेणी या नद्यांच्या संगमावर वसलेल्या कोप्पम गावातल्या
कोप्पेश्वर मंदिराविषयी...
भारतीय कला आणि या कलेचा झालेला विकास याला खूप मोठी परंपरा लाभली आहे. अश्मकालीन मानवाने पहिल्यांदा हत्यार तयार करण्यासाठी एका दगडाने दुसर्या दगडावर प्रहार केला आणि एक कलाकार जन्माला आला. लाखो वर्षांपूर्वीची सुंदर हत्यारे आपल्याला अनेक संग्रहालयात बघायला मिळतात. मध्य प्रदेशमध्ये भोपाळ शहराजवळ ‘भीमबेटका’ या गुहा आहेत. आठ-नऊ हजार वर्षांपूर्वी गुहांमध्ये काढलेली चित्रे तिथे बघायला मिळतात. त्यांनी केलेली शिकार, त्यांच्या रोजच्या आयुष्यातील गोष्टी, त्यांची पूजापद्धती अशा अनेक गोष्टी चित्ररूपात साठवून ठेवलेल्या आहेत. इथून सुरू झालेल्या कलेचा प्रवास हा अनेक रूपांनी विकसित होत गेला. सिंधू-संस्कृतीसारखी परिपूर्ण संस्कृती आपल्याकडे विकसित झाली. हडप्पासारखी शहरे तयार केली गेली आणि याच काळात संस्कृती म्हणून आपली एक ओळख विकसित होत गेली.
भारतीय साहित्याचा विचार करताना, सर्वांत प्राचीन असे चार वेद आणि मग नंतर त्यावरच्या टीका अनेक ऋषींनी रचल्या. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ अशी दोन महाकाव्ये लिहिली गेली, उपनिषदे रचली गेली, पुराणांच्या रूपाने धर्माचा नवीन परिचय घडवीला गेला, हजारो ऋचा आणि श्लोक रचले गेले, भौतिकशास्त्र, गणित, इ. अनेक शास्त्रांवर प्रचंड अभ्यास करून ग्रंथ लिहिले गेले आणि हे सर्व ज्ञान साठवून ठेवण्याची गरज भासू लागली. दृश्य रूपाने सांगितलेले ज्ञान हे चिरकाळ टिकणारे असते; हाच विचार करून मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र यांचा पाया रचला गेला.
मंडप आणि गर्भगृह अशी सामान्य रचना असणार्या मंदिरांपासून सुरुवात करून प्रचंड अशी मोठी मंदिरे बांधण्यात भारतीय कलाकारांना यश आले. जे मंदिरांच्या बाबतीत तेच मूर्तींच्या बाबतीत घडले. संकल्पांच्या स्वरूपात असलेले भारतीय तत्त्वज्ञान दृश्य स्वरूपात दाखवण्याचे आव्हान भारतीय कलाकारांनी लीलया पूर्ण करून दाखवले. याच परंपरेतल्या एका भन्नाट अशा कलाकृतीची माहिती आपण इथे करून घेणार आहोत.
कोल्हापूरपासून साधारण 60 किमी, कृष्णवेणी आणि कुवेणी या नद्यांच्या संगमावर वसलेल्या कोप्पम गावातले जे आता ‘खिद्रापूर’ म्हणून ओळखले जाते, ते कोप्पेश्वर मंदिर. डॉ. गो. बं. देगलूरकर (मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि वरील विषयांवरील अनेक पुस्तकांचे लेखक) यांच्या मते, “महाराष्ट्रातील शिलाहार घराण्यातील गंडरादित्य राजाला या मंदिर निर्मितीचे श्रेय जाते.”
गर्भगृह : मूळ स्थान किंवा मंदिरातला सर्वात पवित्र भाग जिथे शंकराच्या पिंडीची प्रतिष्ठापना केली गेली आहे. या मंदिराच्या गर्भगृहातसुद्धा स्त्रीप्रतिमा कोरल्या गेल्या आहेत, हे या मंदिराच्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट आहे.
अंतराळ : मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारी रचना. गर्भगृहात प्रवेश करताना इतर सर्व गोष्टी मागे सोडून समर्पण भावनेने तिथे प्रवेश करावा, ही त्यामागची कल्पना.
मंडप : 32 खाबांनी तोलून धरलेला अशा प्रकारचा भव्य मंडप अभावानेच महाराष्ट्रातील इतर कुठल्या मंदिरांमध्ये दिसून येतो. या मंडपाच्या मध्यभागी रंगशीला कोरली आहे, ज्यावर कलाकार आपली कला देवाला अर्पण करीत असावेत. या मंडपातील काही खांबांवर माकड आणि सुसर, हंस आणि कासव यांच्या पंचतंत्रातील कथा कोरलेल्या दिसतात. मंडपातून अंतराळाकडे जाताना डावीकडे अंधारात एक शिल्प-पट आहे. तो नीट बघितल्याशिवाय दिसत नाही. हा पट आहे सप्तमातृकांचा. याची मूळ जागा आता आहे, तिथे नक्कीच नव्हती, तो नंतर इथे आणून ठेवला असावा.
सप्तमातृका : मातृकांची पूजा ही खूप प्राचीन काळापासून प्रचलित होती. ऋग्वेद, स्कंदपुराण, देवी भागवत, लिंग पुराण अशा अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला मातृकांचे दाखले मिळतात. मातृका म्हणजे देवांच्या शक्ती किंवा प्राप्त केलेल्या शक्ती होय. शिल्प-पटात सुरुवातीला असतो, वीरभद्र आणि त्यानंतर ब्रह्माणी (ब्रह्म), माहेश्वरी (महेश), कौमारी (कुमार किंवा कार्तिकेय), वैष्णवी (विष्णू), वाराही (वराह अवतार), इंद्राणी (इंद्र), चामुंडा आणि नंतर गणपती अशी ही रचना असते.
स्वर्गमंडप : कोप्पेश्वर मंदिरातील हा सर्वात विशिष्ट असा भाग आहे. चारही बाजूंनी प्रवेश असलेल्या या स्वर्गमंडपात रंगशीलेवर उभे राहिल्यास वरील अवकाश दिसते. या रंगशिलेभोवती एकूण 12 खांब आहेत आणि त्यावर अष्टदिक्पाल (आठ दिशांचे देव किंवा रक्षक - चार मूळ दिशा आणि चार उपदिशा) आणि विष्णु, शिव, ब्रह्मा आणि कार्तिकेय यांच्या प्रतिमा बघायला मिळतात. इथे एक महत्त्वाची घटना घडते, ती म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री चंद्र बरोबर मंडपाच्या केंद्रस्थानी येतो. तेवढाच प्रकाश त्यावेळी खालच्या रंगशिलेवर पडतो. याच दिवशी गावकर्यांकडून तिथे मोठ्या प्रमाणात दीपोत्सवदेखील साजरा होतो.
दिक्पाल : या मूर्ती मंदिराच्या बाह्यांगावर पण बघायला मिळतात. म्हणून त्याच्या दिशा आणि वाहने याठिकाणी देत आहे.
पूर्व - इंद्र - हत्ती
आग्नेय - अग्नी - मेंढा
दक्षिण - यम - रेडा
नैऋत्य - निर्रुती - प्रेत
पश्चिम - वरुण - मगर
वायव्य - वायू - हरीण
उत्तर - कुबेर - नर
ईशान्य - ईशान - नंदी
अशाप्रकारची मंदिराची अंतर्गत रचना आहे. जेवढा सुंदर या मंदिराचा अंतर्भाग आहे; तेवढाच सुंदर या मंदिराचा बाहेरचा भागदेखील आहे.
बाहेरून बघितल्यावर आपल्याला मंदिराच्या खालच्या भागात हत्तींची एक रांग दिसते याला म्हणतात ‘गजथर.’ दुर्दैवाने, या गजथरातील दोन-तीन हत्तींचीच सोंड आणि पाय शिल्लक आहेत. बाकी मूर्तींची मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेली आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या भिंतीवर आपल्याला शिल्प बघायला मिळतात. शिल्प असलेल्या या मंदिराच्या भागाला मंदिर स्थापत्यात ‘जंघा’ असे म्हणतात. इथे आपल्याला मूर्तीच्या दोन रांगा एका खाली एक बघायला मिळतात म्हणून याला ‘द्विजंघा’ असे म्हणायचे आणि हेच या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य आहे. या मंदिराचे आजचे असलेले शिखर हे मूळ शिखर नाही, तर ते नंतरच्या काळात बांधले गेले आहे.
या मंदिरातील बाह्यांगावरील काही प्रातिनिधिक शिल्पांचा आढावा घेऊयात :
गणपती : एक पाय दुमडून बसलेल्या गणपतीच्या हातात क्रमाने भग्नदंत, परशू, पाश आणि बीजापूरक आहेत. गणपतीच्या डोक्यावर असलेल्या मुकुटात केलेले बारीक नक्षीकाम लक्ष वेधून घेते. पायात मूषकदेखील कोरलेला आहे.
मृदंग-मर्दला : मृदंग वाजवण्यात मग्न असलेल्या एका स्त्रीचे शिल्प आपल्याला बघायला मिळते. कोणते वाद्य हातात आहे, यावरून या शिल्पांना ओळखले जाते. हे शिल्प निरखून बघितल्यावर यातला बारकावा लक्षात येऊ लागतो. मृदंग वाजवताना त्यावरील कातड्याचा ताण कमी जास्त करण्यासाठी त्याला बांधलेल्या दोरीच्या आत असलेला तिचा हात कलाकाराने कोरलेला आहे. तिची केसांची रचना, कानातले आणि गळ्यातले दागिने, कमरेचा दिलेला बाक आणि चेहर्यावरची एकाग्रता हे सगळेच मोहित करून टाकणारे आहे.
वामन : प्रदक्षिणा पथावर ही प्रतिमा बघायला मिळते. बटू अवतारातला, थोडेसे पोट बाहेर आलेला, यज्ञोपवित धारण केलेला आणि त्याच्यासमोर हात जोडून उभा असलेला बळीराजा असे हे शिल्पांकन आहे. या शिल्पामध्ये वामनाचा उजवा हात तुटलेला आहे. पण, डाव्या हातामध्ये धरलेले छत्र दिसते.
याचबरोबर शंकर आणि विष्णु यांची अनेक रूपे, सुरसुंदरी, अनेक देवी-देवतांचे विविध अवतार इथे कोरलेले आहेत. पण, या सर्वांचा आस्वाद हा तिथेच जाऊन घेणे बरोबर आहे. या गोष्टींचे महत्त्व आणि सौंदर्य शब्दात पकडायचा केलेला प्रयत्न हे फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी.
या आणि अशा असंख्य कलाकृती अनेक अज्ञात कलाकारांनी आपल्यासाठी करून ठेवल्या आणि ते अजरामर झाले. एवढ्या महान कलाकृती करूनसुद्धा कुणालाही त्यावर आपले नाव टाकावसे वाटले नाही. कारण, कला ही देवासाठी अर्पण करायची, तो देवच आपल्याकडून हे करून घेतो, ही भावना त्या पाठीमागे होती.
जात, धर्म, पंथ यांच्या साखळ्या तोडून एक कला म्हणून या गोष्टींकडे बघणे गरजेचे आहे. आज त्या तुटलेल्या, मोकळ्यावर पडलेल्या मूर्ती आपण बघतो, अशा वास्तूंच्या भिंतींवर आपल्याच लोकांनी केलेली घाण आपण बघतो, हे थांबायला हवे. या मूर्ती, वास्तू, चित्र आपण आता तयार नाही करू शकत. पण, सांभाळू तर नक्कीच शकतो आणि ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे.
इंद्रनील बंकापुरे
7841934774
heritagevirasat@gmail.com