भारताचा जीडीपी दहा वर्षात दुप्पट, आयएमएफ कडून शिक्कामोर्तब
अनेक अर्थव्यवस्थांना टाकले मागे
लवकरच बनणार पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
22-Mar-2025
Total Views | 8
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या दहा वर्षात अनेक विकसित राष्ट्रांनाही मागे टाकत आपली घौडदौड चालूच ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आयएमएफच्या अहवालानुसार भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन २.१ ट्रिलियन डॉलर्स वरुन झेप घेत ४.३ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. आयएफच्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था या दहा वर्षात तब्बल १०५ टक्क्यांनी वाढली. भारताने या जीडीपी वाढीत अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे. या दमदार कामगिरीसह भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे.
आयएमएफच्या या अहवालात म्हटल्याप्रमाणे भारत लवकरच जीडीपीमध्ये जपानला मागे टाकेल. जपानची अर्थव्यवस्था आता ४.४ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. इतर कुठल्याही अगदी विकसित राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा वृध्दीदर भारतीय अर्थव्यवस्थेच्या जवळपास देखील नाही. अमेरिकी अर्थव्यवस्था या दहा वर्षात फक्त २८ टक्क्यांनी वाढली. तर फ्रान्सची अर्थव्यवस्था फक्त ३८ टक्क्यांनी वाढली. यामुळे भारत हीच सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून लवकरच विकसित राष्ट्रांच्या पंगतीत जाऊन बसेल असा अंदाज हा अहवाल व्यक्त करतो.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचा जितका विकास झाला तितका याआधी कुठल्याही सरकारच्या नेतृत्वात झाला नाही असे प्रतिपादन भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती होण्यासाठी मोदी सरकारच्या काळात अतिशय महत्वाची पावले उचलली गेली. इझ ऑफ डूइंग बिझनेस, पायाभूत सुविधा या क्षेत्रांत जबरदस्त कामगिरी केली आहे. यासाठी लागणारे सर्व धोरणात्मक बदलही मोदी सरकारच्याच काळात झाले आहेत. यासर्वांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगाच्या विकसाचे शक्तीकेंद्र बनण्याकडे दिमाखात वाटचाल करत आहे असे मालवीय यांनी म्हटले आहे.