स्टार्टअपच्या यशस्वीतेत सर्वांत महत्त्वाचे असते, ते अशा स्टार्टअपचे आर्थिक आरोग्य. परंतु, स्टार्टअपने आर्थिक आरोग्य सांभाळायचे म्हणजे नेमके काय करायचे? पैसा मिळवायचा, पण तो टिकवायचा कसा? मी आधी की माझा व्यवसाय? या सर्वच प्रश्नांच्या गलबल्यात अडकून बरेचसे स्टार्टअप अल्पावधीत बंद पडतात. हे नेमके कशामुळे होते आणि ही कोंडी फोडायची तरी कशी? याविषयी ‘फायनान्शियल फिटनेस’चे सुधीर खोत यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
सर्वप्रथम जाणून घ्यायला आवडेल की, ‘फायनान्शियल फिटनेस’ म्हणजे नेमके काय? याचा आपल्या आयुष्याशी संबंध कसा येतो?
‘फायनान्शियल फिटनेस’ म्हणजे एकूणच पैशाची मानसिकता. लहानपणापासूनच आपल्यावर पैशांच्या बाबतीत काही संस्कार होत जातात. या संस्कारांनुसारच मोठे झाल्यावर आपण वागायला लागतो. मग आपण उद्योजक बनलो तरी, किंवा कुठे नोकरी करत असलो तरी, आपल्यावर पैशांबद्दलचे जे संस्कार लहानपणापासून झालेले असतात, त्यांनुसारच आपण वागायला लागतो. इथेच आपल्या पैशांबाबतच्या यशस्वी किंवा अयशस्वी होण्याची पाळेमुळे रुजलेली असतात. याच मानसिकतेला सुधारणे म्हणजे ‘फायनान्शियल फिटनेस.’
असे म्हणतात की, आपल्याला उद्योजक व्हायचे असेल, तर आधी मनातून उद्योजक होणे गरजेचे आहे. तसेच एखाद्या उद्योजकाला ‘फायनान्शियली फिट’ व्हायचे असेल, तर ही मानसिकता त्यांनी कशी अंगीकारावी?
कुठल्याही स्टार्टअपला यशस्वी होण्यासाठी एक मानसिकता गरजेची असते. तसेच कुठल्याही स्टार्टअपला काहीतरी करून दाखवायचे असते किंवा समाजासाठी काहीतरी करून दाखवायचे असते, परंतु आपल्याला सर्वांनाच लहानपणापासूनच एका मानसिकतेत अडकवले जाते. सोपे उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी आपल्याला ऐकवले जाते की, ‘तू पैसे सांभाळू शकणार नाहीस, तू ते हरवशील, असे सतत ऐकवले जाते. त्यामुळे आपली मानसिकताही तशीच घडायला लागते. त्यामुळे आपण मोठे होतो, तेव्हाही आपण तीच मानसिकता घेऊन जगायला लागतो. त्यामुळे जेव्हा आपण खरेच पैसे कमवायला लागतो, तेव्हा तो उद्योजक त्याच मानसिकतेतून वागायला लागतो आणि तेच कारण आहे स्टार्टअप अयशस्वी होण्याचे!
कुठल्याही उद्योजकाने स्टार्टअप सुरू करताना, आर्थिक समीकरणांबद्दल नेमकी काय मानसिकता ठेवली पाहिजे? आणि एकूणच वित्तीय नियोजन कसे केले पाहिजे?
कुठल्याही व्यावसायिकाने स्टार्टअप सुरू केल्यानंतर सर्वप्रथम आपले ‘फायनान्शियल स्टेटमेंट’ नीट करणे गरजेचे आहे. आपल्या व्यवसायात जेव्हा पैसे येतात, तेव्हा आपल्याला वाटते की, ते आपल्याला प्राप्त झाले आहेत. परंतु, ते आपल्याला प्राप्त झालेले नसतात, तर ते आपल्या व्यवसायाला मिळालेले असतात. म्हणूनच मग ‘पे युवरसेल्फ फर्स्ट’ या तत्वाचा अवलंब केला पाहिजे. तसेच त्यातून काही रक्कम ही कायम गुंतवणूक म्हणून बाजूला काढता आली पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे त्या गुंतवणुकीतून पुढे व्यवसायवृद्धीसाठी पैसे शिल्लक राहतील. परंतु, बरेचसे स्टार्टअप्स काय करतात की, आलेले सर्वच पैसे खर्च करून टाकतात. त्यामुळे खरेच जेव्हा त्या स्टार्टअपला आणखीन काहीकरायची वेळ येते, तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ शिल्लक राहात नाही.
वित्तीय मानसिकतेबरोबरच उद्योजकाची म्हणूनही एक मानसिकता असते, विचार करण्याची पद्धत असते. मग नेमकी ती कशी असावी?
आपल्याकडे उद्योजक कायमच पैसा कमावण्यावर भर देतात. परंतु, ते हे मात्र विसरतात की, पैसे कमावणे एकवेळ सोपे आहे. पण, मी कमावलेले पैसे खर्च करण्यालाच जर शिस्त लावली नाही, तर माझे पाकीट महिन्याच्या शेवटी रिकामेच राहणार आहे. बरेचदा, आपल्याला काही पैसे हे नंतर प्राप्त होणार असतात. पण, आपण त्यानंतर अपेक्षित पैशांच्या जीवावर आताच उसने पैसे घेऊन खर्च करून टाकतो. त्यामुळे जेव्हा खरंच वेळ येते, तेव्हा हातात पैसेच शिल्लक राहात नाहीत. हीच मानसिकता बरेच स्टार्टअप बंद पडण्याला कारणीभूत आहे.
बरेचसे स्टार्टअप्स आणि उद्योजक अपयश दिसू लागले की, नोकरीकडे, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित पर्यायांकडे वळतात. असे का होते?
बरेचदा स्टार्टअप्स असे समजून चालतात की, मला वाटते, तेच योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला जे लोक असतात, त्यांच्यावर त्यांचा विश्वास असणे खूप गरजेचे आहे. व्यवसाय करणे हे एकट्याचे काम नाही. त्यासाठी आपल्या उत्पादनाला लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी तशी टीम असणे देखील तितकेच गरजेचे आहे, तरच आपला व्यवसाय यशस्वी होतो. थोडक्यात, आपल्या व्यवसायात आपल्या टीममध्ये सर्वांत ‘ढ’ आपण असलो पाहिजे, तरच आपल्याला आपला व्यवसाय वाढवता येतो. कारण, जर तो व्यावसायिक स्वतःच सर्व गोष्टी करत बसला, तर तो कुठलेच काम पूर्ण करू शकत नाही.
शेवटी स्टार्टअप्सना विजयाचा कोणता कानमंत्र तुम्ही द्याल?
आपल्याकडे सर्व स्टार्टअप्सनी एक गोष्ट कायम केली पाहिजे की, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर काम केले पाहिजे. नुसते पैसा कमावला, चांगले उत्पादन तयार केले, त्यासाठी खूप कष्टही घेतले, पण या सगळ्यात मी माझ्या व्यक्तिमत्त्वावरच काम करणे विसरलो, तर माझ्या त्या प्रगतीला काहीच अर्थ राहणार नाही. आपली ताकद आता आहोत तिथून पुढे जाण्यात आहे. तिथेच अडकून पडलो, तर मी पुढेच जाऊ शकणार नाही. यामुळे स्वतःचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करत राहणे आणि आपल्या पैशांबद्दलच्या चुकीच्या समजुती सोडून देऊन आपली चांगली समज निर्माण करणे, हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, जी स्टार्टअप्सनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.