
'एका माळेचे मणी, ओवायला नाही कुणी’ अशी काँग्रेसची गत. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे मातब्बर पराभूत झाल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस दु:खी होईल, अशी अपेक्षा होती. कसले काय? दुसर्या फळीतील नेत्यांनी जणू दिवाळीच साजरी केली. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आजही कमी झालेला नाही. सर्वांत आनंदी झाले ते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार. पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पद भूषवले असले, तरी सरंजामी नेते त्यांना कायम दुय्यम वागणूक द्यायचे, हे ते खासगीत कबूल करतील. त्यामुळेच बहुदा सरंजाम्यांच्या पराभवाची सर्वाधिक खुशी त्यांना झाली. पण, नियतीला त्यांची खुशी मानवली नाही. त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद हिसकावून घेण्यात आले. ते वडेट्टीवार यांना मिळेल, अशी सर्वाधिक चर्चा असताना, राहुल गांधींनी त्यांच्या तोंडाला पाने पुसली. हर्षवर्धन सपकाळ या अनोळखी चेहर्याला संधी देण्यात आली. बरे, वडेट्टीवारांना तरी विधानसभेचे गटनेते पद मिळाले. नानाभाऊंचे काय? ना सत्ता, ना पद, ना पक्षात महत्त्वाचे स्थान, अशी गत झाल्यामुळे ते पेचात अडकले. आता वडेट्टीवार आपल्यावर कुरघोडी करतील, असे मनोमन वाटू लागल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा थेट वडेट्टीवारांकडे वळवला आणि पायात पाय घालण्यास सुरुवात केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची प्रचिती पावलोपावली येते.
पट्टीचा वैदर्भी आवाज असलेले वडेट्टीवार संसदीय आयुधांचा वापर करीत सरकारला धारेवर धरण्याचा विनाभ्यासून प्रयत्न करतात. त्याने सत्ताधारी बाकावरच्या आमदारांचे मनोरंजन होण्याखेरीज दुसरे काहीच होत नसले, तरी नाना पटोलेंना ते खटकते. वडेट्टीवार मोठ्या आवाजात बोलतात, म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी चांगले करतात, असा त्यांचा समज होतो. मग, नानांचा स्वाभिमान दुखावला जातो आणि वडेट्टीवारांपेक्षा आपण किती ‘सिनिअर’ आणि अभ्यासू आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतात. नियमावलीत नसलेल्या नियमांचे दाखले देऊन सत्ताधार्यांची कोंडी करण्याचा ते प्रयत्न करतात. पण, मुख्यमंत्रिपदावर आणि विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले दोघेही निष्णात कायदेपंडित असल्याचा विसर त्यांना पडतो आणि ते तोंडावर आपटतात. माजी विधानसभा अध्यक्ष राहिलेल्या पटोलेंचा आणि नियमावलीचा तसा फारसा संबंध नाहीच म्हणा. पण, या काळू-बाळूच्या लढाईत सत्ताधारी आणि विरोधकांचाही ‘टाईमपास’ होतो, हे निश्चित!
गुडबुक-बॅडबुक
हिंदुत्वाची कास धरल्याशिवाय यापुढे राजकारणात टिकता येणार नाही, हे एव्हाना ’उबाठा’च काय, शरद पवार आणि काँग्रेसच्या आमदारांनाही पुरते कळून चुकलेले. म्हणूनच त्यांच्या वर्तनात बदल झाल्याचे दिसते. मतदारसंघातील हिंदू मंदिरांना वारंवार भेटी देणे, हिंदू सणांना देणग्या, यात्रा-उत्सवात दीर्घ सहभाग, सप्ताहांचे आयोजन, असे धार्मिक कार्यक्रम वाढल्यावरून हा निष्कर्ष काढता येईल. काहीजण तर पक्षाचा विचार डावलून थेट महाकुंभात अमृतस्नान करून आले. सोबत मतदारसंघातील लोकांनाही घेऊन गेले. अशाप्रकारे भूमिका परिवर्तन करून ते मतदारांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना, काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांनी मात्र पक्ष बुडवण्याची सुपारीच घेतली असावी, असे दिसते. म्हणजे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना, त्यांनी कधी हिंदूंच्या वगैरे भावना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. पण, हर्षवर्धन सपकाळ स्वतःला ‘वेगळे’ सिद्ध करण्याच्या नादात, पावलोपावली हिंदूंना दुखावतात. हिंदू आपल्याबाजूने उभा राहिला नाही तरी चालेल, पण पुरोगामी, ’हिरवी’ मते नाराज होऊन चालणार नाहीत, हीच राहुल गांधींची भूमिका ते रेटताना दिसतात. यामुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये मात्र भलती नाराजी पसरली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, हाताखालील कार्यकर्त्यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आमदार जीवापाड मेहनत घेताहेत. पण, प्रदेशाध्यक्षांना त्याची चिंताच नाही. राहुल गांधींच्या ’गुडबुक’मध्ये राहण्यासाठी ते चमकोगिरी करीत सुटलेत. अशाने उरलासुरला कार्यकर्ताही निघून जाईल, या विवंचनेत आमदार आहेत. बरे, मतदारसंघात निधी आणण्यासाठी दररोज सत्ताधार्यांच्या केबिनबाहेर खेटा माराव्या लागत असताना, या महाशयांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच दुखावले. फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली. त्यामुळे काँग्रेस आमदारांना मतदारसंघातील विकासकामे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायचे आहे, तेव्हा काय प्रतिक्रिया उमटेल? याची भीती सतावू लागली आहे. बरे, प्रदेशाध्यक्षांची जाहीर तक्रार करावी, तर राहुल गांधी डोळे वटारतील. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर, अशी स्थिती. यातून स्वतःचा बचाव करायचा तर पक्षांतराशिवाय गत्यंतर नाही, अशी भावना बळावत चालली आहे. या भावनेला कधी मोकळी वाट मिळते, याचीच आता प्रतीक्षा!