मुंबईतील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांचे आता १०० वर्षांहून अधिक आयुर्मान झाले आहे. त्यामुळे भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था सामावून घेणार्या आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करत आहे. मागील लेखात आपण मुंबईच्या दादर, भायखळा, रे रोड आणि घाटकोपर येथील रेल्वेमार्गावरून जाणार्या पूल प्रकल्पांचा आढावा घेतला. याच लेखमालिकेच्या दुसर्या भागात आज आपण ‘एल्फिन्स्टन रोड आरओबी प्रकल्पा’चा आढावा घेऊया.
'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ म्हणजेच ‘स्व. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू’वरून समुद्राच्या कुशीतून प्रवासाचा अनुभव तुम्हीही घेतला असेलच. जागतिक दर्जाच्या या पायाभूत सुविधेमुळे मुंबई आणि महाराष्ट्राचे नाव जगभरात नावाजले जात आहे. मुंबईतून नवी मुंबई पार करून तिसर्या मुंबईच्या निर्मितीत हा सेतू महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा वेळी ही वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी आता या पुलाला जोडणार्या इतर मार्गिकांच्या कामांनाही गती आहे. त्यांपैकीच एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे ‘शिवडी-वरळी जोडरस्ता प्रकल्प.’ या प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा हा एल्फिन्स्टन रोड म्हणजेच प्रभादेवी येथील १२५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून जातो. हा जुना ब्रिटिशकालीन मार्ग आजच्या वाढत्या वाहतुकीला सामावून घेण्यासाठी अपुरा ठरत असल्याने आता या पुलाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’(एमएमआरडीए)ने ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (महारेल)ला एल्फिन्स्टन रोड, प्रभादेवी येथे डबल-डेकर रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बांधण्याची जबाबदारी सोपवली आहे. जुन्या ‘एल्फिन्स्टन आरओबी’चा पुनर्विकास हा मुंबईतील सर्वांत वर्दळीच्या कॉरिडोरपैकी एक असलेल्या कॉरिडोरमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. नवीन डबल-डेकर आरओबी केवळ वाहतुककोंडी कमी करेल आणि वाहनांची सुलभ वाहतूक सुलभ करेलच असे नाही, तर शहरी परिसराच्या विकासातही योगदान देईल.
एल्फिन्स्टन रोड पुलाचे ऐतिहासिक महत्त्व
मुंबईतील प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन रोड पूल ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता. आज १२५ वर्षांहून अधिक आयुर्मानासह हा पूल शहराच्या वाहतूक नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवरून वाहतूक सुलभ करण्यासाठी बांधण्यात आलेला हा पूल दीर्घकाळ पूर्व-पश्चिम कनेक्टर म्हणून काम करत आहे, ज्यावरुन दररोज हजारो वाहने आणि पादचारी प्रवास करतात.
प्रभादेवी रेल्वे स्थानकाला जोडणार्या एल्फिन्स्टन पुलाचे उद्घाटन १८६७ साली झाले. या पुलाचे नाव १८५३ ते १८६० पर्यंत मुंबईचे राज्यपाल असणार्या जॉन एल्फिन्स्टन यांच्या नावे ठेवण्यात आले. हा रोड ओव्हर ब्रिज १९१३ मध्ये बांधण्यात आला. मूळतः खूपच कमी लोकसंख्येच्या दृष्टीने आरेखित केलेला हा पूल आजच्या मुंबईच्या वाढत्या गर्दीला आणि वाहतुकीशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करत आहे. यामुळेच या भागात प्रचंड वाहतुककोंडी आणि सुरक्षिततेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पुलाचे ऐतिहासिक महत्त्व आणि आधुनिकीकरणाची तीव्र गरज ओळखूनच, या जुन्या रचनेची जागा नवीन डबल-डेकर आरओबीने घेण्याची योजना आखण्यात आली. या पुनर्विकासामुळे नव्याने उभारण्यात येणारा पूल हा भविष्यातील वाहतुकीच्या आव्हानांना तोंड देण्यास सज्ज असेल.
विद्यमान पुलाचे पाडकाम आव्हानात्मक
या प्रकल्पात दोन ८०० मेट्रिक टन क्रेन वापरून विद्यमान पुलाचे पाडकाम करणे समाविष्ट आहे, जे बांधकामातील सर्वांत आव्हानात्मक पैलूंपैकी एक आहे. हे काम पश्चिम रेल्वे (डब्ल्यूआर) आणि मध्य रेल्वे (सीआर) या दोन्ही उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये व्यत्यय न आणता पार पाडले जाईल. कारण, हे काम धावत्या रेल्वे ट्रॅकवरून केले जाईल. प्रवाशांची सुरक्षितता आणि रहदारीवर किमान परिणाम लक्षात घेता, या पुलाच्या उभारणीत योग्य नियोजन आणि अंमलबजावणी आवश्यक आहे.
पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये
डबल-डेकर डिझाईन
हा आरओबी एकाचवेळी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरून जाईल. त्यामुळे उपनगरीय लोकल सेवेत कोणताही व्यत्यय न आणता प्रवाशांच्या सुरक्षिततेसह या पुलाचे पाडकाम आणि नवीन उभारणी करण्यात येईल. हा एक दुर्मीळ आणि गुंतागुंतीचा अभियांत्रिकी अविष्कार आहे.
- एकूण लांबी (रेल्वे स्पॅन) : १३२ मीटर, रेल्वे ट्रॅकवरून अखंड हालचाल सुनिश्चित करेल.
- खालचा डेक : फूटपाथसह २+२ लेन, स्थानिक वाहतुकीसाठी पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी राखेल.
- वरचा डेक : शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी २+२ लेन फूटपाथशिवाय असेल, जो थेट अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवेश देईल.
- सुपरस्ट्रक्चर प्रकार : ओपन वेब गर्डर, रेल्वे पूल बांधकामासाठी योग्य एक मजबूत आणि टिकाऊ डिझाईन.
- अंदाजे किंमत : १६७.३५ कोटी.
- कालावधी : सर्व आवश्यक मंजुरीनंतर, हा आरओबी अंदाजे एका वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. (पुलाचा रेल्वे भाग)