नवी दिल्ली: ( Sambhal court notice to Rahul Gandhi ) उत्तर प्रदेशातील संभल येथील खासदार-आमदार न्यायालयाने काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या एका वाजग्रस्त विधानावर नोटीस बजावली आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांनी ४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहावे किंवा त्यांचे उत्तर दाखल करावे असे निर्देश दिले आहेत.
हिंदू शक्ती दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सिमरन गुप्ता यांच्या याचिकेवर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश निर्भय नारायण सिंह यांनी हा आदेश दिला. याचिकाकर्त्याचा आरोप आहे की, राहुल गांधी यांनी १५ जानेवारी रोजी दिल्ली काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान म्हटले होते की, आमची लढाई केवळ भाजप आणि आरएसएसशी नाही तर भारतीय स्टेटशीही आहे. या विधानामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
सिमरन गुप्ता यांनी यापूर्वी संभल जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी २३ जानेवारी रोजी चंदौसी येथील संभल जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात माहिती देताना वकील सचिन गोयल म्हणाले की, न्यायालयाने त्यांची तक्रार स्वीकारली आहे आणि त्याची दखल घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी नियोजित वेळी होईल ज्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पुढे नेली जाईल.