नवी दिल्ली: ( Organizational Change in Aap party ) आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या (पीएसी) बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत अनेक मोठ्या नेत्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पक्षाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. तर, गोपाळ राय यांना गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पक्षाने पंकज गुप्ता यांना गोव्याचे प्रभारी बनवले आहे. संदीप पाठक यांची छत्तीसगडचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने सौरभ भारद्वाज यांना दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी महराज मलिक यांच्याकडे देण्यात आली आहे.
दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असताना 'आप'ने हे बदल केले आहेत. राजकीय तज्ज्ञांचे मत आहे की आता पक्षासमोर पंजाब वाचवण्याचे आव्हान आहे. यामुळेच अरविंद केजरीवाल यांनी पंजाबची जबाबदारी मनीष सिसोदिया यांच्याकडे सोपवली आहे. विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून मनीष सिसोदिया पंजाबमध्ये सक्रिय झाले आहेत.