अभिजात पाली भाषेच्या पालखीसह प्रथमच बौद्ध भिक्खु होणार यात्रेत सहभागी
21-Mar-2025
Total Views | 6
1
ठाणे: ( Mahakumbh culture in the Hindu New Year welcome in thane ) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या विश्वातील सर्वात पुरातन पाली भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला. याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यासाठी गुढीपाडव्यादिनी ठाण्यात निघणार्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत शांती व समतेची पाली भाषेची पालखी काढून बौद्ध बांधव व भिक्खु संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’चे कार्याध्यक्ष संजीव ब्रम्हे यांनी दिली.
ठाणे मनपा मुख्यालयात गुरुवार, दि. २० मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत नववर्ष स्वागतयात्रेची माहिती आयोजकांनी दिली. ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’तर्फे गुढीपाडव्यादिनी रविवार, दि. ३० मार्च रोजी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार असून यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने स्वागतयात्रेमध्ये संस्कृतीचा महाकुंभ अनुभवता येणार आहे. ‘टीजेएसबी’ बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यंदाचे स्वागताध्यक्ष आहेत. रविवार, दि. २३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्री कौपिनेश्वर महाराजांच्या पालखीचे पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होणार असून त्यानंतर श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन स्वागतयात्रा मार्गस्थ होईल.
यंदा स्वागतयात्रेत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, प्लास्टिकबंदी, अवयवदान जागृती, मतदान जागृती असे ६० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत. ठाणे महापालिकेचा विशेष सहभाग असेल. राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्ताने चित्ररथ, ‘आम्ही लूलश्रश प्रेमी फाऊंडेशन’चे शेकडो सायकलस्वार आणि मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिके, ड्रम-झेंबे वादन, एरियल कसरती असणार आहेत, अशी माहिती न्यासाच्या कार्यवाह डॉ. अश्विनी बापट यांनी दिली.
यंदा स्वागतयात्रेत ‘अभिजात’ पाली भाषेच्या पालखीसह प्रथमच बौद्ध भिक्खु सहभागी होणार आहेत. जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध हवा आहे. पाली भाषेचे बुद्ध धर्मासोबत घट्ट नाते आहे. येत्या काळात तरुण पिढीला पाली भाषेविषयी ज्ञान मिळावे, यासाठी ‘बबन कांबळे फाऊंडेशन’च्यावतीने ही पालखी स्वागतयात्रेत सामील होणार आहे. या पत्रकार परिषदेला न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, विश्वस्त विद्याधर वालावलकर, अरविंद जोशी, महेंद्र कोथळे, निमंत्रक तनय दांडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.