सायबर गुन्ह्यांनी बुडवले सर्वसामान्यांचे ४ हजार कोटी
अवघ्या दहा महिन्यांत २० लाखांहून अधिक गुन्हे
21-Mar-2025
Total Views | 5
नवी दिल्ली : देशात वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता भयानक पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत देशात तब्बल २४ लाख सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमधून सर्वसामान्यांना तब्बल ४२४५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. भारतीय अर्थमंत्रालयाकडून राज्यसभेत ही माहिती सादर केली गेली. या संपूर्ण आकडेवारीवरुन सायबर गुन्ह्यांचे प्रकरण किती गंभीर होत चालले आहे हे दिसून येते.
राज्यसभेत सादर झालेल्या आकडेवारीनुसार गुन्ह्यांच्या संख्या कमी झालेली असली तरी त्यातून नुकसान होणाऱ्या रकमेत मात्र वाढच झाली आहे. २०२२- २३ मध्ये २० लाख गुन्ह्यांची नोंद झाली होती आणि नुकसानीची रक्कम २,५३७ कोटी इतकी होती. २०२३-२४ मध्ये याच गुन्ह्यांची संख्या २८ लाखांवर गेली होती आणि नुकसानीची रक्कम मात्र ४,४०३ कोटी इतकी होती. यातुलनेत २०२४-२५ मध्ये आता पर्यंत गुन्ह्यांची संख्या कमी झाली असली तरी नुकसानीच्या रकमेत मात्र मोठीच वाढ झाली आहे. यामध्ये ऑनलाईन फसवणुक, बँकिंग फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश होतो.
या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उकल झालेल्या गुन्ह्यांचीही संख्या वाढत आहे. सरकारने राज्यसभेत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता पर्यंत १३ गुन्ह्यांची उकल झाली असून त्यातून ४३८६ कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार यांच्याकडून हे गुन्हे रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून नागरिकांना आवाहन करणे याचाही समावेश यात होतो.
महाराष्ट्र सरकार हे गुन्हे रोखण्यासाठी करत असलेले प्रयत्न
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने राज्यातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सुरक्षा महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय या गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर व्हावी यासाठी कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठीही सरकार प्रयत्न करणार आहे. या सर्वांतून सरकारचे या प्रश्नाविषयीचे गांभीर्य दिसून येते.