“छत्रपती संभाजी महाराजांना ‘बाई-बाटली’चा खोटा ठपका ठेऊन ज्यांनी बदनाम केलं त्यांचे..”, किरण माने यांची थेट प्रतिक्रिया!
20-Mar-2025
Total Views |
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून औरंगजेबाच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. संभाजी महाराजांना औरंगजेबाने दिलेल्या अत्याचारांचे चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले असून, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरू असताना अभिनेता किरण माने यांनी एक ठाम भूमिका घेतली आहे. किरण माने यांनी एका पोस्टमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचे आरोप करणाऱ्यांच्या स्मारकांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
किरण माने यांची मागणी:
किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले, "छत्रपती संभाजी महाराजांना ‘बाई-बाटली’चा खोटा ठपका ठेवून ज्यांनी बदनाम केले, त्या औरंगजेबाच्या समर्थकांची स्मारके आणि पुतळे महाराष्ट्रातून हटवले पाहिजेत. तसेच, त्यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृह व सभागृहांची नावे बदलून ती छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने करण्यात यावीत."
त्यांच्या या परखड भूमिकेने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी किरण माने यांच्या मताला पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी ही मागणी कितपत शक्य आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. काही युजर्सनी ‘स्मारकांपेक्षा विचार उखडून टाकणं गरजेचं’ असल्याचं मत मांडलं आहे. सध्या औरंगजेबाच्या कबरीसंदर्भातील हा वाद चिघळत असून, किरण माने यांच्या प्रतिक्रियेने या चर्चेला नवा कलाटणी मिळाली आहे.