“महाराष्ट्राला लोककलेचा खरा अर्थ कृष्णराव साबळे, अर्थात शाहीर साबळेंनी सांगितला,” असे प्रतिपादन त्यांचे शिष्य विवेक ताम्हनकर यांनी केले आहे. मुंबई विद्यापीठातून ‘लोककला’ या विषयात पदविका प्राप्त करून ‘महाराष्ट्राची लोकधारा’पासून अनेक कार्यक्रमांत ताम्हनकर यांनी शाहीर साबळे यांच्यासह २० पेक्षा अधिक वर्षे काम केले. ‘यशराज कला मंच’ या संस्थेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे ते लोककलेची पारंपरिकता जपत विविध कार्यक्रमांचेही सादरीकरण करतात. आजच्या शाहीर साबळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ने विवेक ताम्हनकर यांच्याशी शाहीर साबळे यांच्या स्मृतींसह शाहिरी परंपरा, तिचे भवितव्य यांविषयी घेतलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश...
शाहीर साबळे आणि तुमच्या भेटीचा योग कसा जुळून आला?
माझ्यावेळी कोळीगीत आणि लावणी हे दोन प्रकार लोककलेत प्रसिद्ध होते. सुरुवातीला मला लोककलेचा काहीच गंध नव्हता. माझी 12वी झाल्यानंतर मी माझ्या आत्याकडे अंबिका नगर येथे गेलो होतो. अंबिका नगरमध्ये बाबांचे घर होते. आम्ही सगळेच शाहीर साबळे यांना ‘बाबा’ म्हणतो. ज्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा केदार शिंदेंसह लोकधारेच्या संपूर्ण कलाकारांची गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाची तयारी चालू होती. मी बाबांना भेटून सांगितले की, मलादेखील लोकधारेत सहभाग घ्यायचा आहे. त्यावेळी कलाकारांची संख्या खूप असल्याने बाबांनी मला नकार दिला. मी खूप विनंती केली, त्यावेळी बाबांनी मला सांगितले की, पुढच्या वर्षी आमचे एक शिबीर आहे. तू तिथे सहभाग घे. मी संपूर्ण वर्ष वाट पहिली आणि अखेर तो दिवस आला, मी बाबांच्या शिबिरात काम करू लागलो. त्यावेळी केदार शिंदे, अंकुश चौधरी, भरत जाधव हे तेव्हा तिथे शिकवायला असायचे. हा प्रसंग विशेष अधोरेखित करावासा वाटतो. लोककलेत तारपा नृत्य हा प्रकार प्रसिद्ध आहे आणि हा नृत्य प्रकार मला पहिल्यांदा अभिनेता भरत जाधवने शिकवला आणि तिथून माझी लोकनृत्याला खरी सुरुवात झाली.
शाहीर साबळे यांनी लोककलांसाठी केलेल्या योगदानाबद्दल तुम्हाला कोणता भाग सर्वात महत्त्वाचा वाटतो?
शाहीर साबळे यांचे लोककलेसाठी खूप मोठे योगदान आहे. आता जसे लोककलांचे, लोकनृत्यांचे कार्यक्रम होतात. पूर्वी तसे काहीच नव्हते. खर्या अर्थाने महाराष्ट्राची लोकधारा बाबांनी चालू केली. तेव्हा लोककला, लोकपरंपरा काय हे लोकांना कळायला लागले. साबळे यांची आई आणि आजी घरात जात्यावर दळताना त्या ओव्या म्हणायच्या; त्या ओव्यांची बाबांना आवड निर्माण झाली. मग त्यांच्या दारावर आलेला वासुदेव असो वा पिंगळा या सगळ्या गोष्टी एकत्र करून लोककलेच्या, लोकनृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे शाहीर, शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राची लोकधारा उभी केली.
शाहीर साबळे यांच्यासोबत काम करताना किंवा शिकताना तुमच्या लक्षात राहिलेल्या खास आठवणी?
मी स्वतःला खरेच खूप भाग्यवान समजतो; मला त्यांच्यासोबत काम करता आले. सुरुवातीला मी त्यांच्या कार्यक्रमात निवेदन करायचो. त्यावेळी आमच्या संस्थेत जाधव काका होते. ते संपूर्ण व्यवस्थापन बघायचे आणि सावंत काका म्हणून जे होते, ते आमचे मेकअप करायचे. त्यांनी एकदा बाबांना सांगितले होते की, विवेक निवेदन करतोय, तर त्याला फेटा बांधा. त्यावेळी बाबा असे म्हणाले, ज्यावेळी विवेक एकदम परफेक्ट निवेदन करेल, तेव्हा मी स्वतः त्याला फेटा बांधणार आणि ही गोष्ट माझ्या एकदम पक्की डोक्यात राहिली. मग मी निवेदन आणखी कसे चांगले करता येईल, याचा सराव करायला लागलो. आंबेकर नगरला एक कार्यक्रम होता. त्यावेळी बाबांनी मला स्वतः बोलवून ‘ये विवेक, आज तुला मी फेटा बांधणार,’ असे सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी खरेच खूप अभिमानाची होती. मला माझ्या कामाची पोचपावती मिळाली.
नव्या पिढीने लोकसंगीत आणि लोकनाट्य याकडे वळावे, यासाठी काय करणे गरजेचे आहे?
आजच्या पिढीला ही लोककलेची ओळख व्हायला लागली आहे, नाही असे नाही; पण कसंय ना, त्यातली पारंपरिकता जी आहे, लोकसंगीतातला मूळ गाभा त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे. त्यासाठी शिबिरे भरवली गेली, तर त्याचा मुलांना खरेच खूप फायदा होईल आणि आजही काही जुने-जाणते शाहीर आहेत, जे आता या मुलांना लोककलेचे महत्त्व समजावून सांगू शकतात. लोककला ही मुळातच प्रवाही आहे, ती थांबून राहात नाही. काळानुसार त्यात बरेच बदल होतात. पण त्याचा मूळ गाभा हलता कामा नये. नाहीतर, लोककला भरकटली जाऊ शकते. आता तुमच्या पिढीसाठी लोककलेला जर थोडा आधुनिक ‘टच’ दिला, तर लोककला लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकते.
महाराष्ट्रातील विविध लोकसंगीत शैलींबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यातील कोणती शैली अधिक लोकप्रिय आहे?
अनेक प्रकारचे लोकसंगीत आहे. महाराष्ट्राचे लोकसंगीत म्हटल्यावर गोंधळ, पोवाडा, लावणी या सगळ्या गोष्टींचे स्वतःच एक वैशिष्ट्य आहे. त्यात आपण तुलना नाही करू शकत. प्रत्येकाच वैशिष्ट्य असल्याने लोककलेने, लोकसंगीताने पारंपरिकता जपली जावी, एवढीच इच्छा आहे. त्यात कुठेही भ्रष्टपणा येऊ नये. लोकनाट्यांना सवंगपणा येऊ लागलाय, लोकांना जे आवडत ते या लोकनाट्यातून देण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, यामुळे पारंपरिकतेचा बाज सगळा निघून जात आहे. तसे होता कामा नये.लोककला खरोखरच जपायची असेल, तर थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि सगळ्यात पहिले हा सवंगपणा घालवणे महत्त्वाचे आहे.
संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.