एक चूक आणि प्रसिद्धीला ठेच; प्रकाश राज, विजय देवरकोंडासह २५ दाक्षिणात्य अभिनेत्यांवर गुन्हा दाखल, नेमक प्रकरण काय? जाणून घ्या...
20-Mar-2025
Total Views | 20
मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते प्रकाश राज, राणा डग्गुबती आणि विजय देवरकोंडा हे सध्या कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. तेलंगणा पोलिसांनी २५ कलाकार आणि प्रभावशाली व्यक्तींविरुद्ध बेकायदा बेटिंग अॅप्सच्या जाहिरातीसाठी गुन्हा दाखल केला आहे. सायबराबादमधील मियापूर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर आणि अन्य माध्यमांतून बेटिंग अॅप्सच्या जाहिराती करत होते. फणींद्र शर्मा नावाच्या एका व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल करत या सेलिब्रिटींच्या प्रचारामुळे अनेक तरुण आर्थिक अडचणीत आल्याचा आरोप केला आहे.
चौकशीत उघड झाले महत्त्वाचे तथ्य:
या प्रकरणाच्या चौकशीत काही तेलुगू टीव्ही कलाकारांनी स्वतःहून माफी मागत या जाहिरातींमध्ये सहभाग घेतल्याची कबुली दिली आहे. त्यांनी हे अॅप्स किती घातक आहेत याची कल्पना नसल्याचेही सांगितले. मात्र, प्रकाश राज, राणा डग्गुबती आणि विजय देवरकोंडासह काही सेलिब्रिटींवरील आरोप अजूनही तपासाअंतर्गत आहेत.
तेलंगणा गेमिंग कायद्याच्या कलम ३, ३(अ) आणि ४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ड) अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आता या अॅप्समध्ये गुंतवलेल्या पैशांचा आणि कलाकारांच्या भूमिकेचा सखोल तपास करत आहेत. या प्रकरणातील काही कलाकार आधीच चौकशीला सामोरे गेले असून, काहींनी आपली बाजू मांडली आहे. मात्र, प्रकाश राज, राणा डग्गुबती आणि विजय देवरकोंडावर काय कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याप्रकरणी पुढील काही दिवसांत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.