मृत्यूचे रहस्य

भाग -३२

    20-Mar-2025
Total Views | 14

mrutyuche rahasya part 32
 
 
सुदर्शन चक्र
 
आता सुदर्शनचक्र काय ते पाहू. नावच आहे ‘सु-दर्शन’, म्हणजे साधकाला जी चक्रगती ‘सु’ म्हणजे चांगली वाटते, त्या दिव्य चक्रगतीला भगवान वेदव्यास ‘सुदर्शन’ असे म्हणतात. शरीराबाहेर जाताना साधारण साधकाला क्लेष होतात. कारण, त्यात त्याचे भौतिक मरण असते. म्हणून शरीराबाहेर जाताना दिसणार्‍या त्या दिव्य चक्राची अपसव्य (डावीकडे फिरणारी) गती सुदर्शनीय नसते. कारण ती जीवात्म्याला जड शरीरापासून विलग करीत असते, तर शरीरात पुनर्प्रवेश करताना जी सव्य चक्रगती (उजवीकडे फिरणारी) दिसते. तीच साधारण साधकाकरिता सु-दर्शनीय होय. म्हणून व्यास सव्य चक्रगतीला ‘सु-दर्शनचक्र’ असे म्हणतात. सव्य चक्रगतीने घटनाप्राप्ती म्हणजे रक्षण होते. ‘विष्णु’ या शब्दाचा अर्थ रक्षण करणे असाच आहे. म्हणूनच श्रीकृष्णाला रक्षणकर्ता मानले आहे. शरीराचे रक्षण करणारी गती म्हणजे ‘सुदर्शन चक्र’ होय. सुदर्शनाचा हा खरा अर्थ लक्षात आल्यास, सुदर्शनाचे पुढील कार्य लक्षात यायला वेळ लागणार नाही.
 
भगवान श्रीविष्णुंचे अवतार म्हणून भगवान श्रीराम व श्रीकृष्ण मानले जातात. पण, श्रीविष्णुचे आवडते व महत्त्वाचे आयुध सुदर्शनचक्र वाल्मिकींनी श्रीरामांना बहाल केले नाही, तर ते व्यासांनी त्यानंतरच्या अवताराला म्हणजे श्रीकृष्णाला दिले आहे. श्रीरामांच्या हाती वाल्मिकींनी धनुष्यबाण दिला आहे. वाल्मिकींनी रामाला धनुष्यबाण देण्याची कारणपरंपरा उपनिषदात आहे. उपनिषदात या आत्मारामाचे कोणते धनुष्यबाण आहे, हे स्पष्ट करून त्या आत्मारामाने लक्ष्यभेद कोठे करावा तेही सांगितले आहे. श्रीरामांचे शरसंधान अचूक होते. उपनिषद आत्मरुप रामाचे वर्णन करतात,
 
‘प्रणवो धनुः शरोः आत्मा ब्रह्म तल्लक्षं उच्चते’
 
आत्मा हा बाण असून, ॐकार प्रणव साधना धनुष्य आहे. अशा या धनुष्यावर आत्मरुप शर म्हणजे बाण चढवून, रामरुप साधकाने तो ब्रह्मरुप लक्ष्यात मारावा. उपनिषदात ही दिव्य संकल्पना मांडली आहे, म्हणून वाल्मिकींनी रामायणामध्ये आदर्शरुप रामाला कोदंडधारी दाखविले आहे. भगवान श्रीविष्णुला पुराणात पालनकर्ती देवता मानले आहे. विश्वाचे जो पालन करतो तो विष्णु, असा ‘विष्णु’ शब्दाचा अर्थ आहे. मग अशा विश्वरचनेचे पालन करणार्‍या देवतेची कर्मगती, तशीच विश्वपालक असली पाहिजे. आपण पाहिलेच आहे की, सव्य गतीने विश्वातील वस्तुधारणेचे रक्षण होते. म्हणून विश्वपालक देवतेची कर्मगतीसुद्धा सुदर्शनरुप सव्य चक्रगतीने दाखविली आहे. सव्य गतीचा अनुभव धारण करणारा असल्यामुळे साधकास ते सव्य दर्शन ‘सु’ म्हणजे चांगलेच राहणार, म्हणून पालक देवता श्रीविष्णु व श्रीकृष्ण यांचे शस्त्र सुदर्शन दाखविले आहे. या सुदर्शनाचा उपयोग साधकाच्या साधनेतील सुयोग्य अवस्थांचे रक्षण होण्याकरताच होणार. भगवान वेदव्यासांनी आपल्या कथांमधून असेच वर्णन केले आहे.
 
राजा अंबरीषाला विनाकारण शाप देणार्‍या मुनि दुर्वासांच्या मागे भगवंताचे असलेच सुदर्शन लागून, राजा अंबरीषाचे दुर्वासांच्या शापापासून रक्षण झाले. वैदिक परंपरेत पौराणिक कथांमध्ये योजलेल्या प्रत्येक शब्दामध्ये, खोल आशय दडलेला आहे. दुः+वास म्हणजे दुर्वास होय. ज्या वृत्तींचा वास ‘दुः’ म्हणजे वाईट असतो, साधकाला आपल्या इतर वृत्ती जरी वरवर ऋषितुल्य वाटल्या, तरी काही मुळात वाईट असलेल्या वृत्तींपासून भक्त वा साधकाचे रक्षण झालेच पाहिजे. व्यक्ती कितीही विद्वान असला, तरी अति क्रोध हा वाईटच, म्हणून कथेत सुदर्शनचक्र दुर्वासांच्या मागे लागून त्या दुर्वास वृत्तींना, सत्परायण अम्बरीषाला शरण जाण्यास भाग पाडले आहे. ‘अंबरीष’ म्हणजे सर्व विश्वाचे मूळ असलेल्या शक्तीचा मालक, म्हणजेच थोर सत्प्रवृत्त साधक! असल्या थोर वृत्तीसमोर साधकातील क्रोधी दुर्वृत्तीरुप दुर्वास नम्र व्हायला नकोत काय? गजराजाला नक्राच्या मगरमिठीतून सुटका करण्यास हेच सुदर्शन कामास आले. ‘नक्र’ म्हणजे मगरमिठीप्रमाणे घट्ट पकडणार्‍या साधकाच्या दुष्प्रवृत्ती होत. जयद्रथवधावेळी हेच सुदर्शनचक्र, अर्जुनरुपी साधकास वाचविते. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडल्यावर उत्तरेच्या गर्भात असणार्‍या परीक्षिताचे रक्षण, याच सुदर्शनाद्वारे करण्यात आले.
 
अभिमन्यूचा अर्थ आम्ही जाणला. आता त्याची पत्नी उत्तरा कोण? साधकाचे उत्तर साधनाजीवनातील अनुभूती आणि शक्ती म्हणजे, साधक अभिमन्यूची पत्नी उत्तरा होय. साधकाच्या या उत्तर म्हणजे प्रगल्भ अवस्थेच्या गर्भात, परिक्षित उत्पन्न होणार नाही काय? परीक्षित म्हणजे सतर्क व विवेकपूर्ण संयमी साधक! साधना सतत केल्याने साधकाच्या उत्तर अवस्थेत संयम, सतर्कता आणि विवेकबुद्धी उत्पन्न होणार नाही काय? हाच अभिमन्यूपुत्र परीक्षित होय. या परीक्षिताला जीवनातील साधनानुभव घेण्याचे स्वातंत्र्य न देता, अश्वत्थामा त्या साधकावस्थेला एकदमच ब्रह्मरुप बनवू पाहातो. यालाच अश्वत्थाम्याचे ब्रह्मास्त्र म्हटले आहे. ब्रह्म अवस्थेचे जे रक्षण करील ते ब्रह्मास्त्र होय. काही साधकांना असली ब्रह्म अवस्था वा मुक्ती नको असते, ते परमेश्वराला जन्म घेऊन संतसंगच मागतात. तुकाराम महाराज म्हणतात,
 
नलगे मुक्ति धन संपदा। संत संग देई सदा।
तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी।
 
ब्रह्मावस्था म्हणजे मुक्ती न मागता, परीक्षितरुप साधक आपल्या साधनारुप साधक जीवनांचे पुनर्जीवन मागतो. म्हणून ब्रह्मलीन अवस्थारूप ब्रह्मास्त्रापासून, भगवंत भक्तरुप परीक्षिताचे रक्षण आपल्या सुदर्शन चक्राने करतात. कथेचा अर्थ अतिशय खोल आहे.
 
संसप्तकांशी युद्ध
 
बुद्धिवान व उच्च साधकांकरिता अर्जुनाने संसप्तकांशी तीन अहोरात्र युद्ध केले. याचा खरा यौगिक अर्थ सांगणे आवश्यक वाटते. महाभारतातील कथेत शरीरात जसा आत्मा असतो, तद्वत्च आत्मरहस्य आहे. मानवी शरीरात सात योगचक्रे असतात. त्या प्रत्येक योगचक्रावर विजय मिळविल्याशिवाय, योगी परम आत्मस्वरुप पाहू शकत नाही. आपल्या अनेक कुसंस्काररुप व कुवृत्तीरुप शत्रूंवर पूर्ण विजय मिळविल्याशिवाय, योगी सातव्या सहस्त्रदलकमलात चित्तवृत्ती स्थिर करून परमपदाला पोहोचू शकत नाही. सतत प्रयत्न केल्यावर चित्तवृत्ती स्थिर झालेला योगी, त्या परमसिद्ध समाधी अवस्थेत तीन अहोरात्र राहू शकतो. प्रयत्न करणारा योगी म्हणजे अर्जुन होय. म्हणून अर्जुन तीन अहोरात्र संसप्तकांशी म्हणजे, सात योगचक्रांशी सतत युद्ध करण्यात गुंतला होता, असे भगवान व्यास सांगतात. संसप्तक म्हणजे सात योग चक्रे होत.
 
(क्रमशः)


योगिराज हरकरे
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
 
९७०२९३७३५७
अग्रलेख
जरुर वाचा
रामकथांचा विश्वविख्यात विदेशी अभ्यासक, साधक डॉ. कामिल बुल्के

रामकथांचा विश्वविख्यात विदेशी अभ्यासक, साधक डॉ. कामिल बुल्के

Ram Katha भारत सरकारने 1972 साली ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केलेले, हिंदी भाषेचे विद्वान आणि राम, रामायण व समग्र विश्वातील रामकथेचे ख्यातनाम मर्मज्ञ-संशोधक डॉ. कामिल बुल्के यांचा ‘रामकथा : उगम आणि विकास’ हा हिंदी भाषेत लिहिलेला शोधप्रबंध जगातील सर्वच विद्यापीठांनी गौरवलेला आहे. रामकथेचा विश्वविख्यात विदेशी अध्ययनकर्ता संशोधक म्हणून डॉ. कामिल बुल्के ओळखले जातात. एक विदेशी गोरा माणूस ‘ईसाई मिशनरी’ म्हणून भारतात येतो काय आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवून रामकथेचा मर्मज्ञ होतो काय, “रामकथेचा अभ्याच हीच माझी साधना,..