तया निर्विकल्पासि कल्पीत जावे

    20-Mar-2025
Total Views | 15
 
manache shlok 189-190
 
 
मागील श्लोक क्रमांक १८८ मध्ये स्वामींनी सांगितले आहे की, “विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे।” समर्थांनी दासबोधात व मनाच्या श्लोकांत भक्तिमार्गाची महती सांगितली आहे. मनाच्या श्लोकात सुरुवातीसच राघवाचा पंथ प्रतिपादन करताना समर्थ म्हणतात की, “मना सज्जना भक्तिपंथेचि जावे।” (श्लोक क्रमांक २). समर्थांनी विवरण केलेल्या भक्तिपंथात स्वरूपाचे, रामाचे अनुसंधान कायम ठेवून ‘विभक्त नव्हे तो भक्त’ असे ऐक्य साधूनच उपासना करावी लागते. ल. रा. पांगारकर म्हणतात त्याप्रमाणे, हे श्लोक म्हणजे सगुण-निगुर्णातीत परब्रह्माचा अभ्यास आहे. तरीही मानवाने आपल्या कल्पनासामर्थ्याने परब्रह्मस्थिती कशी अनुभवावी, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
 
मही निर्मिली देव तो वोळखावा।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा।
तथा निगुर्णालागि गूणी पहावें।
परी संग सोडूनि सूखें रहावें॥१८९॥
 
स्वामी सांगतात की, देवाला जर कुठे शोधायचे तर प्रथम ही पृथ्वी ज्याने निर्माण केली, त्याचा देव म्हणून विचार केला पाहिजे. सभोवताली दिसणारे नद्या, जमीन, पाणी, सागर, आकाश, बर्फाच्छादित डोंगर, निसर्ग, रानेवने, हे सारे घटक विचारात घेऊन पृथ्वीचे वर्णन करता येते. तसेच ही जीवसृष्टी, तिचा आधार सूर्य, गुरुत्वाकर्षणाद्वारा परस्परांना सांभाळत नियमित गतिमान असणारे आणि त्यात क्षणाचाही फरक पडू न देणारे ग्रह, तारे हे सारे कल्पनेपलीकडचे अद्भुत विश्व आहे. अफाट विश्वपसारा, हा खगोलशास्त्राच्या अभ्यासाचा विषय असला, तरी वैज्ञानिकांना तेथील अनेक कोडी सोडवता आलेली नाहीत. उदाहरणार्थ असे म्हणतात की, सूर्यावर क्षणाक्षणाला अणुस्फोट होऊन त्यातून जी ऊर्जा व प्रकाश बाहेर पडतो, तो सूर्य अनेक वर्षे देत आला आहे, देत राहणार आहे. तथापि, हे स्फोट सूर्यावर कोणती शक्ती घडवून आणते, हे विज्ञानशास्त्र सांगू शकत नाही. आकाशगंगेत तर आपल्या सूर्यापेक्षा कैकपटींनी मोठे, ऊर्जावान असंख्य सूर्य असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. तथापि, या सार्‍यांचा निर्माणकर्त्या मुख्य देवाचा विचार करून ते निर्गुणत्व आपल्या ठिकाणी असल्याचा प्रत्यय आला, म्हणजेच त्याच्याच अंशमात्रे करून आपल्या जीवाची निर्मिती झाली असा प्रत्यय आला, तर जीवाला तत्काळ मुक्ती मिळते, असे स्वामी म्हणतात.
 
सृष्टीतील घटकांचे कार्यकारण भाव उलगडत गेल्यास, सृष्टीचे काही नियम शोधता येतात. पृथ्वीचा विचार करताना कल्पनेने त्यातील घटकाचे कारण शोधता येते. परंतु, सापडलेल्या कारणाच्या मागे जाऊन त्यातील कारणपरंपरा शोधताना, अनेक तार्किक अडचणी उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे ’मही निर्मिली त्या देवाला’ ओळखताना त्यातील कार्यकारण भाव शोधता येत नाही, विश्वातील घडामोडींचे कारण शोधता येत नाही, तेथे साहजिकच पृथ्वीला, सृष्टीला निर्माण करणार्‍या परमेश्वरतत्त्वाचा, परमेश्वरी सत्तेचा आधार घ्यावा लागतो. तथापि परमेश्वर सत्तेचे, तत्त्वाचे कारण कल्पनेने सापडत नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, शाश्वत ब्रह्म, परमेश्वर स्वयंभू असल्याने त्याचे कारण शोधता येत नाही. या स्वयंभू परमेश्वरी आधारावरच विश्वातील घडामोडी घडत असतात. परब्रह्माच्या साक्षात्कारातच ज्ञानाचे बीज दडले आहे. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर, हा जीव म्हणजे त्या ईशशक्तीचा अंश असल्याची खात्री पटल्यावर आणखी काही जाणून घेण्याची इच्छा राहात नाही आणि जीवाला मोक्ष मिळतो, असे स्वामींचे मत आहे.
 
नुसत्या कल्पनेने निर्गुणाला जाणता येत नाही. आपल्या कल्पनाशक्तीला गुण ओळखता येतात. रुप, गुण यांनाच सतत पाहात, अनुभवत असल्याने जीवाला निर्गुण अवस्था पाहता येत नाही. निर्गुण ब्रह्मतत्त्वाला रूप-गुणात आणता येत नाही. परंतु, सर्व चांगल्या गुणांत परमेश्वराचा वास असल्याने, गुणांचा अभ्यास करून सद्गुणांचा अनुभव घेत गेल्यास, गुणातीत निर्गुण परमेश्वरतत्त्वाचा साक्षात्कार होऊ शकतो. यासाठी स्वामी सांगतात की, “तया निर्गुणालागि गूणीं पहावे।” अर्थात गुणांच्या ठिकाणी परमेश्वराला पाहता येते. तथापि, त्यासाठी वाईट गुणांची म्हणजे अवगुणांची संगती सोडावी लागेल, हे उघड आहे. थोडक्यात, निर्गुण परमात्मतत्त्व गुणांमध्ये पाहिल्यास आणि अवगुणांचा संग सोडल्यास, मानवी जीवन सुखी-समाधानी होईल. आता परमेश्वर कार्यकारण भावाच्याही पलीकडे कसा आहे, हे पुन्हा एकदा स्वामी सांगत आहेत.
 
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।
परेहून पर्तां न लिंपे विवर्ता।
तथा निर्विकल्पासि कल्पित जावें।
परी संग सोडूनि सूखे राहावें॥१९०॥
 
परमेश्वरतत्त्व स्वयंभू असल्याने ते कार्यकारण भावाच्या पलीकडे आहे. पण, आपल्या मनाला कार्यकारण भाव शोधण्याची इतकी सवय झालेली असते की, प्रत्येक घटनेत तो शोधल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही. आपली कल्पनाशक्ती सतत कार्यरत असते. त्यामुळे आपण आपल्या कल्पनेने परमेश्वराला अनेक मानवी उपाधी लावून पाहण्याचा प्रयत्न करीत असतो, असे स्वामींना म्हणायचे आहे. या सार्‍या विचारांतून विश्वाला चालवण्यासाठी परमेश्वर ऊर्जा प्रदान करतो किंवा परमेश्वर या सृष्टीचे पालनपोषण करतो, असे वाटते. पण, या सार्‍या मानवी कल्पना आहेत. या कल्पना मानवी स्वभावानुसार विचार करण्याच्या सवयीमुळे आलेल्या असल्याने, त्यातून कार्यकारण भाव दृष्टोत्पत्तीस येतो आणि परमेश्वरतत्त्व तर कार्यकारण भावाच्या पलीकडे आहे. परमेश्वरतत्त्व सार्‍यांच्या पलीकडे आहे. त्यामुळे ना तो कार्य करून घेणारा विश्वाचा कार्यकर्ता आहे, ना तो विश्वाचा पालनपोषण करणारा सृष्टिभर्ता आहे. तरीही आपण अनेक लक्षणे उपाधी त्याला लावत असतो. आपली बुद्धी फारतर परावाणीपर्यंत विचार करू शकते. पण, परमेश्वरतत्त्व हे परावाणीच्याही पलीकडे आहे (परेहून पर्ता). त्याचे वर्णन करताना स्वामी पुढे म्हणतात की, “न लिंपे विवर्ता.” विवर्त म्हणजे भ्रम किंवा माया. परब्रह्माला भ्रमाचा स्पर्श होऊ शकत नाही.
 
 भ्रमाची अनेक उदाहरणे, भ्रमाचे प्रकार समर्थांनी दासबोधात विस्ताराने सांगितले आहेत. मानवी जीवनात त्यांचा जागोजागी प्रत्यय येतो. पण, परमेश्वरीतत्त्वाला त्याचा स्पर्श होत नाही. भ्रमाची व्याख्या करताना स्वामींनी म्हटले आहे की, “परब्रह्म जाणण्यासाठी सूक्ष्म विचारांचा मागोवा घेत ज्या वातावरणातून जावे लागते, त्याला भ्रम म्हणतात.” संतांनी ही अवस्था ओलांडून परब्रह्मतत्त्व जाणलेले असते. आपल्यासारख्या सामान्य माणसाला भ्रम किंवा माया ओलांडणे कठीण असल्याने, आपल्याला कल्पनेच्या आधारे जावे लागते. आपण त्या सर्व कल्पनांच्या पलीकडे असणार्‍या ब्रह्मतत्त्वाला जाणण्यासाठी आपल्या कल्पनेचा ओघ तिकडे वळवावा आणि भौतिक सृष्टीच्या खरेपणाची जी भावना असते, त्यात भावनेने न गुंतून राहता सुखाने आयुष्य जगावे. (संग सोडूनि सूखें राहावें). हे भौतिक जग खरे आहे, त्यापासून मला सुख मिळेल, ही सुद्धा एक कल्पनाच आहे. तेव्हा ती कल्पनाशक्ती भौतिकात सुख शोधण्यासाठी खर्च न करता, तिला शाश्वत परब्रह्माच्या शोधाकडे वळवली तर मानवी जीवन सुखी करता येईल, असे स्वामींना वाटते. म्हणून “निर्विकल्पासि कल्पित जावे” असे स्वामी म्हणतात. त्यामध्ये येणार्‍या अडचणींचा ऊहापोह स्वामींनी पुढील श्लोकांत केला आहे.(क्रमशः)

 
सुरेश जाखडी

 
७७३८७७८३२२
अग्रलेख
जरुर वाचा
रामकथांचा विश्वविख्यात विदेशी अभ्यासक, साधक डॉ. कामिल बुल्के

रामकथांचा विश्वविख्यात विदेशी अभ्यासक, साधक डॉ. कामिल बुल्के

Ram Katha भारत सरकारने 1972 साली ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केलेले, हिंदी भाषेचे विद्वान आणि राम, रामायण व समग्र विश्वातील रामकथेचे ख्यातनाम मर्मज्ञ-संशोधक डॉ. कामिल बुल्के यांचा ‘रामकथा : उगम आणि विकास’ हा हिंदी भाषेत लिहिलेला शोधप्रबंध जगातील सर्वच विद्यापीठांनी गौरवलेला आहे. रामकथेचा विश्वविख्यात विदेशी अध्ययनकर्ता संशोधक म्हणून डॉ. कामिल बुल्के ओळखले जातात. एक विदेशी गोरा माणूस ‘ईसाई मिशनरी’ म्हणून भारतात येतो काय आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवून रामकथेचा मर्मज्ञ होतो काय, “रामकथेचा अभ्याच हीच माझी साधना,..

मर्चंट नेव्हीमधील आव्हाने, चिंता आणि भविष्यातील मार्ग

मर्चंट नेव्हीमधील आव्हाने, चिंता आणि भविष्यातील मार्ग

‘ Merchant Navy’ अर्थात व्यापारी जहाजांचे सध्याच्या काळात असलेले महत्त्व हे वादातीत आहे. अनेक देशातील खलाशी या क्षेत्रामध्येच यशस्वी करिअर घडवितात. देशालादेखील यातून लाभच होत असतो. मात्र, या खलाशांच्या जीवनावर मात्र कायमच धोक्याचे सावट असते. त्यात अनेकदा अडचणीमध्ये सापडल्यावर कंपन्यादेखील या खलाशांना वार्‍यावर सोडून देतात. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते. आजकाल या घटनांच्या वारंवारतेत वाढ झाली आहे. त्यामुळे खलाशांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिक कडक नियम आणि त्याच्या पालनाची गरज आंतरराष्ट्रीय स्तरावर ..