टाटा आणि एअर न्यूझीलँड यांच्यात एआय-सक्षम परिवर्तनासाठी भागीदारी

पायाभूत सुविधांसह डिजीटल क्षमतावाढीसाठी मदत होणार

    20-Mar-2025
Total Views | 7
टाटा
 
 
मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एअर न्यूझीलँड यांनी पाच वर्षांची भागीदारी जाहीर केली आहे. या कराराअंतर्गत, टीसीएस एअरलाइनच्या डिजिटल पायाभूत सुविधा सुधारणार असून, एआय-सक्षम नवकल्पना आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी सहाय्य करणार आहे. या सहयोगामुळे एअर न्यूझीलँडच्या डिजिटल क्षमता वाढणार असून, प्रवासी अनुभव सुधारेल आणि तांत्रिक कार्यक्षमता मजबूत केली जाईल. यामध्ये फ्लिट मॅनेजमेंट, क्रू शेड्युलिंग आणि ग्राउंड सर्व्हिसेस यांसारख्या प्रमुख सेवा क्षेत्रांचा समावेश आहे.
 
मुंबईतील टीसीएस येथे झालेल्या कराराच्या औपचारिक घोषणेसाठी न्यूझीलँडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन, टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, एअर न्यूझीलँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग फोरन आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन आदी उपस्थित होते. टाटा समुहाने भारताच्या विकासात फार मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे या भागीदारीने भारत आणि न्युझिलँडचे व्यापारी संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला.
 
टाटा समुहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने वाढत आहे. उत्पन्नाच्या संधी वाढत असून ही वाढ अजून बराच काळ सुरू राहणार आहे. या करारामुळे न्यूझिलँड आणि भारत यांच्यातील व्यापार वाढेल आणि यात भारत सक्रिय सहभाग घेईल.टीसीएसच्या आधुनिक तंत्रज्ञान कौशल्यांचा वापर न्युझीलँडला होईल. यामुळे ग्राहकांना अधिक प्रभावीपणे सेवा देणे शक्य होईल.
 
टीसीएस म्हणजे  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही गेल्या ३७ वर्षांपासून न्यूझीलँडमधील डिजिटल परिवर्तनासाठी विश्वासू भागीदार आहे. ऑकलंडमधील कार्यालयातून बँकिंग, रिटेल, बांधकाम, उत्पादन आणि स्थानिक प्रशासन क्षेत्रातील वीसपेक्षा जास्त प्रमुख कंपन्यांसाठी सेवा देत आहे. एअर न्युझीलँड दरवर्षी १५ दशलक्षाहून अधिक प्रवाशांना सेवा देते आणि आठवड्यातून ३ हजार ४०० हून अधिक उड्डाणे पार पाडते. या नव्या करारामुळे एअरलाइनच्या डिजिटल रीटेल आणि लॉयल्टी प्रोग्रॅम मध्येही सुधारणा होणार आहे. या महत्त्वाच्या भागीदारीमुळे एआय-सक्षम डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून, एव्हिएशन इंडस्ट्रीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असेल.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा