मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या 'डिजिटल गव्हर्नन्स'ला सहकार्य
- लखपती दीदी उपक्रमातही सहभाग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिल गेट्स यांच्यात चर्चा
20-Mar-2025
Total Views |
मुंबई: ( Microsoft and Gates Foundation support Maharashtra's 'digital governance' ) राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेवून महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी घेण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स तसेच गेट्स फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गेट्स आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यादरम्यान आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि बिल गेट्स यांची पहिल्यांदाच भेट होत असून याचा आनंद असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र परिवर्तन टप्प्यातून जात असल्याने पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्यामध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाऊंडेशने सहकार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यात एआयच्या वापरातून ऊसाचे दुप्पट उत्पादन घेतल्याचे उदाहरणही मुख्यमंत्र्यांनी दिले.
क्रिस्पर केस नाईन आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी भागीदारी करणार आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महिला सबलीकरण आणि स्वयंरोजगारासाठी २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे सांगितले, शिवाय गरीब आणि गरजू महिलांना राज्य शासन महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून १ हजार ५०० रूपये देत असल्याची माहिती दिली. या उपक्रमातही सहभाग घेण्यास मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशन तयार असल्याचेही बिल गेट्स यांनी सांगितले. महिलांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार डिजिटल करण्यासाठी सहकार्य करण्याची गेट्स यांनी तयारी दर्शवली.
शाश्वत ऊर्जेसाठी भागीदारी
- महाराष्ट्रात विविध सामाजिक संस्था, शासकीय संस्था, कंपन्यांच्या सहकार्याने शाश्वत ऊर्जेसाठी भागीदारी घेणार असून याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही गेट्स यांनी सांगितले. महाराष्ट्रात मोठी क्षमता असल्याने महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल जगभर नेण्यास प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
- बिलगेट्स यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सियाटल भेटीसाठी आमंत्रण दिले. या भेटीप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ श्रीकर परदेशी, गेट्स फाउंडेशनचे भारतातील संचालक हरी मेनन, गेट्स फाऊंडेशनच्या जागतिक मलेरिया प्रकल्पाचे संचालक फिलिप वेलकॉफ, आरोग्य सल्लागार डॉ. आनंद बंग आदी उपस्थित होते.