नागपूर : नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपासातून अनेक खळबळजनक माहिती उघड झाली आहे. फहीम खाननेच जमाव जमवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
फहीम खानच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट मिळाल्या असून त्यामुळेच हिंसाचार उसळला. फहीम खानसह ६ आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात आणखी काही आरोपींची नावे पुढे येऊ शकतात. अशा आक्षेपार्ह पोस्ट आढळलेले अकाऊंट्स ब्लॉक करण्याचे काम सुरु आहे.
सोमवार, १७ मार्च रोजी रात्री नागपूरमधील काही भागात हिंसाचाराची घटना घडली. या घटनेनंतर नागपूरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, फहीम खान हा या हिंसाचाराचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले आहे.