World Wildlife Day - वन्यजीवांचे 'ड्रोन'करी; आढावा महाराष्ट्रातील 'ड्रोन'कऱ्यांचा

    02-Mar-2025   
Total Views | 405
World Wildlife Day


वन्यजीव संशोधन क्षेत्रातील माहिती संकलन पद्धतींमध्ये गेल्या २५ वर्षांमध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत (World Wildlife Day). मात्र, गेल्या पाच वर्षांत राज्यात ड्रोन आधारित वन्यजीव सर्वेक्षण प्रणालीचा अवलंब वाढला आहे (World Wildlife Day). आजच्या ‘जागतिक वन्यजीव दिना’निमित्त जाणून घेऊया ड्रोन सर्वेक्षण पद्धतीविषयी... 
(World Wildlife Day)
 
 
 
समुद्री गायींचा मागोवा
 
‘डुगोंग’ म्हणजे समुद्री गाय हा साधारणपणे १० ते १२ फूट वाढणारा ३५० ते ४०० किलो वजनाचा एकमेव शाकाहारी सागरी सस्तन प्राणी आहे. हा प्राणी समुद्री गवतावर अन्नग्रहण करतो. भारतामध्ये सुमद्री गाय या केवळ गुजरात मधील कच्छच्या आखातमध्ये, तामिळनाडूमधील पाक-बे व मन्नारच्या आखातामध्ये आणि अंदमान-निकोबार बेटाच्या सागरी परिक्षेत्रात आढळतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये समुद्री गवताच्या अधिवासाचा झालेला र्‍हास आणि शिकारीमुळे भारतामधील समुद्री गायींची संख्या प्रचंड रोडावली. नायर आणि शिवकुमार यांनी केलेल्या २०१३ सालच्या सर्वेक्षणानुसार भारतात समुद्री गायींची संख्या केवळ २५० च्या आसपास राहिली होती. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पुढाकार घेऊन ’ कॅम्पा स्पिसीज रिकव्हरी प्रोग्राम’अंतर्गत २०२६ साली ’डुगोंग प्रोजेक्ट’ सुरू केला. ’भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्लूआयआय) वरिष्ठ संशोधक डॉ. जे.ए. जॉन्सन, डॉ. नेहरू प्रभाकरन, चिन्मया घाणेकर आणि पाँडिचेरी विद्यापीठाचे डॉ. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाअंतर्गत या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पामध्ये सागर राजपुरकर यांनी ड्रोनच्या मदतीने समुद्री गायींचे सर्वेक्षण केले. ड्रोनच्या मदतीने भारतातील समुद्री गायींविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी केलेला हा पहिलाच प्रयोग होता. समुद्री गायींचे हवाई सर्वेक्षण करण्यासाठी सागर आणि त्यांच्या टीमने सर्वप्रथम अश्या पद्धतीने सुरू असणार्‍या कामांची माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांना एका ऑस्ट्रेलियन अभ्यासात आढळून आले आहे की, समुद्री गायींचे ड्रोन सर्वेक्षण हे बोट आधारित सर्वेक्षणांपेक्षा अधिक प्रभावी असते. त्यामुळे त्यांनी भारतात ड्रोन सर्वेक्षण पद्धती वापरण्यासंदर्भात शिक्कामोर्तब केले. ’कॅम्पा डॉल्फिन प्रोजेक्ट’मध्ये काम करणारे सजल शर्मा यांनी सागरला मानवरहित हवाई वाहन म्हणजेच ’यूएव्ही’चालवण्यासंदर्भात प्रशिक्षण दिले. २०१९ साली सागर आणि टीमने अंदमान बेटावर समुद्री गायींसाठी सर्वप्रथम ड्रोनद्वारे हवाई सर्वेक्षण केले. त्यावेळी त्यांना ड्रोनमुळे चार समुद्री गायींचे दर्शन घडले. त्यानंतर २०२१ साली सागरच्या टीमने गुजरातमधील कच्छच्या आखातामध्ये समुद्री गवतावर ताव मारणार्‍या समुद्री गायीचे सर्वेक्षण केले. गुजरातमध्ये समुद्री गायी अधिवास करत असल्याचा हा पहिला छायाचित्रित पुरावा होता. गेल्याच आठवड्यात मन्नारच्या आखातामध्येदेखील सागरच्या टीमला ड्रोन सर्वेक्षणावेळीसमुद्री गायीचे दर्शन घडले.त्यामुळे ड्रोन सर्वेक्षण हे ’डब्लूआयआय’च्या टीमसाठी मैलाचा दगड ठरला आहे. ड्रोनमुळे त्यांना कमी कालवधीत विस्तृत प्रदेशाचे सर्वेक्षण करणे सोयीचे ठरले. तसेच ड्रोनची पुरेशी उंच राखल्यास ड्रोनच्या आवाजाचा समुद्री गायींना त्रास होत नसल्याचे देखील संशोधकांच्या लक्षात आले. समुद्री गाय दिसल्यावर त्याचे वर्तन चित्रित करण्यासाठी सागरने ड्रोनच्या ’फोकल फॉलो’, या तंत्राचा अवलंब केला. तसेच समुद्री गायींच्या संख्येच्या घनतेचा अंदाज घेण्यासाठी ’स्ट्रीप ट्रान्सेक्ट’ मुळे शक्य झाले. सागरला आपल्या डॉक्टरेटच्या संशोधनाचा एक भाग म्हणून ड्रोन सर्वेक्षणाची मदत झाली आहे. समुद्री गवताच्या अधिवासाचे सर्वेक्षण आणि थर्मल ड्रोनचा वापर करुन रात्रीच्या वेळी समुद्री गायींच्या मागोवा घेण्याच्या संधी भविष्यात ड्रोन सर्वक्षणामधून असल्याचे सागर सांगतो.
World Wildlife Day 
 


सासवडच्या लांडग्यांवर ड्रोनची नजर
 
वानरवैज्ञानिक डॉ. अद्वैत देशपांडे यांनी इथोपियामधील गेलाडा माकडांवर अभ्यास करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण पद्धती विकसित केली होती. कारण, एका स्वतंत्र माकडाच्या वर्तनाचे निरीक्षण उघड्या डोळ्यांनी करणे सहजसोपे असते. मात्र, माकडांच्या कळपाच्या वर्तनाचा अभ्यास करणे, एकट्याचे काम नसल्यामुळे त्यांनी ड्रोनच्या मदतीने हा अभ्यास करण्याचे निश्चित केले. मात्र, २०२१ साली इथोपिया येथे युद्ध सुरू झाले आणि त्यांचे काम थांबले. मात्र, फेलोशिपअंतर्गत हे काम करणे गरजेचे असल्याने देशपांडे यांनी पुणे जिल्ह्यातील सासवडच्या गवताळ अधिवासातील लांडग्यांच्या वर्तनाचा अभ्यास ड्रोन सर्वेक्षणच्या मदतीने करण्याचे ठरवले. ’दी ग्रासलॅण्ड ट्रस्ट’अंतर्गत सध्या देशपांडे लांडग्याच्या वर्तनाचा अभ्यास करत आहेत. लांडग्यांच्या कळप एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात जात असताना त्यांचे सामाजिक वर्तन कशा प्रकारचे असते, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ड्रोन सर्वेक्षण आणि ‘एआय’ तंत्राच्या आधारे करण्यात येत आहे. यासाठी प्रवास करणार्‍या लांडग्यांना हेरून त्यांच्यापासून ६० ते ७० मीटर उंचावर ड्रोन उडवला जातो. या माध्यमातून टिपलेली छायाचित्रणे ही ’एआय’मध्ये अपलोड केली जातात. यासाठी ‘एआय’ला लांडग्यांच्या छायाचित्रांच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. ’ऑब्जेक्ट डिटेक्शन मॉडेल’च्या आधारे ड्रोनने टिपलेल्या उच्च-रिझोल्यूशनच्या प्रतिमांचे ‘जीपीएस’ ट्रॅक तयार होतात. म्हणजे कपळातील प्रत्येक लांडगा हा प्रवास करताना कशा पद्धतीने हालचाल करत आहे, याचे ‘जीपीएस’ ट्रॅक तयार होतात. ही पद्धत वापरून अद्वैत हे लांडग्याचा कळप कसा प्रवास करतो, ते आपल्या प्रवासाची दिशा कशी ठरवतात, कुठे जायचे कसे ठरवतात यामागील वर्तनाचा अभ्यास करत आहेत. तसेच, या प्रवासादरम्यान एका लांडग्याच्या नजरेच्या कक्षेत किती लांडगे असतात, ते एकमेकांशी सुसंगत राहून कशा पद्धतीने प्रवास करतात हेदेखील तपासण्याचे काम सुरू आहे. लांडग्यांना समोरून पाहिल्यास प्रत्येक लांडग्याची वेगळी ओळख पटवता येत नाही. मात्र, देशपांडे यांनी ड्रोनद्वारे ज्यावेळी लांडग्यांचे हवाई सर्वेक्षण केले, त्यावेळी त्यांना प्रत्येक लांडग्यांच्या पाठीवरील केसाची रचना वेगवेगळी दिसली आहे. त्यामुळे या रचनेवरून प्रत्येक लांडग्याची ओळख पटवता येईल का, याचीदेखील तपासणी अद्वैत करत आहेत. ड्रोनद्वारे सर्वेक्षण करताना अद्वैत काही बाबींची काळजी घेतात. ड्रोनच्या आवाजामुळे लांडग्यांचा कळप बिथरणार नाही, याची काळजी घेतली जाते. तसेच दिवसाला एक तासासाठीच ड्रोन उडवला जातो. ’दी ग्रासलॅण्ड ट्रस्ट’च्या टीमने वनकर्मचार्‍यांनादेखील ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे भविष्यात वनकर्मचार्‍यांकडूनच ड्रोन आणि ‘एआय’च्या मदतीने लांडग्यांच्या हालचालींवर कसे लक्ष ठेवता येईल, यासाठीदेखील संस्था काम करत आहे.

World Wildlife Day

 
 
मानव-वन्यजीव संघर्षावर तोडगा
 
वन्यजीव बचावाचे अग्रगण्य काम करणारी पुण्याची ’रेस्क्यू’ ही संस्था २०२२ पासून ड्रोनचा वापर हा मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव बचावाच्या घटना आणि वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी करत आहे. संस्थेचे तुहीन सातारकर थर्मल ड्रोनच्या मदतीने या प्रकारचे काम करतात. २०२१ साली गडचिरोलीमध्ये हत्तींचा प्रवेश झाला आणि या हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वनविभागाकडून ’रेस्क्यू’ टीमला दिली. नक्षल परिसर, रस्त्यांचे मर्यादित जाळे आणि खराब मोबाईल नेटवर्कमुळे अशा संवेदनशील प्रदेशात पायी चालत रात्रीच्या वेळी वावरणार्‍या हत्तींचा माग काढणे मुश्किलीचे होते. अशा वेळी टीमने थर्मल ड्रोनची मदत घेतली. यामुळे हत्तींची संख्या, त्यांचा वावर, हालचालीसाठी वापरात येणारा प्रदेश याची सविस्तर माहिती थर्मल ड्रोन सर्वेक्षणामधून मिळाली. वन्यजीवांच्या हालचालींचा मागोवा हा जमिनीवरून घेण्याच्या तुलनेत ड्रोनद्वारे घेणे, अधिक सोयीचे असते, असे तुहीन सांगतात. कारण, या कामामध्ये कमी माणसांची आवश्यकता असल्याने संसाधनांचा वापरदेखील मर्यादित राहतो. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनेवेळी वन्यप्राणी अडकलेल्या जागेचा ठावठिकाणा शोधण्यामध्येही ड्रोन मदतशीर ठरत असल्याचे तुहीन सांगतात. तसेच या घटनांमध्ये वन्यप्राणी जर खुल्या प्रदेशात असेल, तर त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन मारल्यानंतर तो बिथरतो आणि पळतो. अशा परिस्थितीत त्या प्राण्याचा माग काढण्यासाठीदेखील ड्रोनचा वापर होत असल्याची माहिती तुहीन देतात. लोक गृहीत धरतात की, ड्रोन आपोआप प्राणी शोधू शकतात. मात्र, वास्तविकता अशी आहे की, ड्रोन हे वन्यजीव व्यवस्थापनामधील एक पूरक साधन आहे आणि त्यांचा प्रभावी वापर हा मुख्यत्वे कौशल्य, अनुभव आणि पूर्व माहितीवर अवलंबून आहे. तसेच ड्रोनच्या वापरामुळे डेटा सुरक्षा आणि सुरक्षिततेसंबंधीदेखील काही आव्हाने आहेत. ड्रोन हा व्यापक माहितीचे संकलन करतो, ज्याचा गैरवापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. ड्रोनने टिपलेली माहिती शिकार्‍यांच्या हाती पडल्यास वन्यजीव धोक्यात येऊ शकतात. वन्यजीव संरक्षणात या तंत्रज्ञानाचा नैतिक आणि सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी कठोर नियम आणि माहितीची सुरक्षित हाताळणी आवश्यक आहे.
 
World Wildlife Day 
 
 
रात्रीस ’ड्रोन’चाले
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी खोर्‍यात हत्तींच्यावावरावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने दोन थर्मल ड्रोन विकत घेतले आहेत. खोर्‍यामधील हत्ती बाधित क्षेत्रातील हत्तींच्या नियोजनासाठी स्थानिक लोकांच्या मदतीने थर्मल ड्रोन सर्वेक्षण पद्धतीचा प्रभावी वापर केला जातो. थर्मल ड्रोन उडवण्याचे काम करतात. घोटगेवाडी वनपरिक्षेत्राचे वनरक्षक मयुरेश करंगुटकर. वर्षभरापूर्वीच वन विभागात रुजू झालेले करंगुटकर थर्मल ड्रोनच्या मदतीने आता सराईतपणे हत्तीच्या हालचालीचा मागोवा घेतात. सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी मेळघाट येथील ड्रोनद्वारे व्याघ्र सर्वेक्षण करणार्‍या मंडळींना सिंधुदुर्गात आमंत्रित करून वनकर्मचार्‍यांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. ड्रोनद्वारे हत्तींचा मागोवा घेणारे करंगुटकर सांगतात की, तिलारीच्या खोर्‍यातील हत्तींचा वावर हा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी असतो. हत्तीच्या पायाच्या विशिष्ट रचनेमुळे ते पालापाचोळ्यातून चालत असताना पालापाचोळा चिरडल्यामुळे निर्माण होणारा आवाज येत नाही. रात्रीच्या काळोख आणि पाऊलांचा आवाज येत नसल्यामुळे हत्तीला हुडकणे मुश्किलीचे होते. मात्र, आता थर्मल ड्रोनमुळे हत्तीच्या हालचालींचा मागोवा घेणे सोयीचे झाले आहे. थर्मल ड्रोनमधील इन्फ्रारेड थर्मल इमेजिंग आणि इंटेलिजेंट सेन्सिंग तंत्रज्ञानामुळे हत्तीचा नेमका ठावठिकाणा कळतो. करंगुटकर आणि त्यांच्या टीमला हत्तीच्या वावराची माहिती मिळाल्यावर ते थर्मल ड्रोनद्वारे हत्ती नेमका कुठे जात आहे, याचा अंदाज घेतात. हत्ती शेताच्या दिशेने आगेकूच करत असल्याचे लक्षात आल्यावर, करंगुटकर आणि त्यांची स्थानिक ’हाकारी’ टीम लागलीच हत्ती पोहोचण्यापूर्वी शेताच्या परिसरात दाखल होते. त्याठिकाणी हत्ती पोहोचल्यानंतर ओरडून किंवा बॅटरीच्या प्रकाशाच्या आधारे हत्तींना पिटाळण्यात येते. गरज असल्यावरच फटाक्यांचा वापर केला जातो. ड्रोनचा आवाज हा मधमाशांच्या आवाजासारखा असल्याने सुरुवातीच्या काळात हत्ती ड्रोनच्या आवाजाला घाबरून लांब पळत असे. मात्र, आता टस्कर हत्तीला या आवाजाची सवय झाल्यामुळे तो या आवाजाला घाबरत नसल्याचे निरीक्षण करंगुटकर यांनी टिपले आहे. मात्र, मादी आणि तिची पिल्ले या आवाजाला घाबरत असल्याचे ते सांगतात. थर्मल ड्रोनमुळे हत्तींची हालचाल टिपून त्यामुळे होणारा संभाव्य मानव-हत्ती संघर्ष रोखता येत असल्याचे करंगुटकर सांगतात.

World Wildlife Day 
 
 
 
‘ड्रोन’वापराची वैशिष्ट्ये
 
- वन्यजीव संशोधन क्षेत्रात सध्या ड्रोनचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरुवात झाली असून ज्यामुळे अधिवासाचे सर्वेक्षण, प्राण्यांच्या हालचाली टिपणे आणि त्यांच्या लोकसंख्येची गणना करण्यासारखी कामे ही अधिक सुलभ आणि अचूक पद्धतीने होत आहेत.
 
- ड्रोनचा वापर अधिक प्रभावीपणे करून त्याद्वारे सर्वसामावेशक परिणाम प्राप्त करण्यासाठी ड्रोनला रेडिओ कॉलरिंगसारख्या इतर तंत्रज्ञानासह जोडून काम करणे आवश्यक आहे.
 
- ड्रोन किंवा ‘यूएव्ही’ हे केवळ वन्यजीवांच्या हालचाली आणि त्यांच्या अधिवासावर लक्ष ठेवण्याच्या व्यतिरिक्त विविध वन्यजीव संवर्धनाच्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठीदेखील उपयोग ठरतात.
 
- ड्रोनमुळे दुर्गम भागातील वन्यजीव अधिवासांवर देखरेख ठेवणे, शिकार रोखणे आणि मानव-वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन करणे सोयीचे होते.
 
- ड्रोनच्या उपयोगाचे अनेक फायदे असले, तरीही त्याच्या वापराची काही आव्हानेदेखील आहेत. बॅटरीवापराची असलेली मर्यादा, किंमत आणि ड्रोनवापराची नीतीमूल्य अशा काही बाबींवर तडजोड करावी लागत आहे.
 
- ड्रोनमुळे दुर्गम भागातील वन्यजीव अधिवासांवर देखरेख ठेवणे, व्यवस्थापन करणे सोयीचे होते.
 
 
 
वन्यजीव हालचालींचा मागोवा
वन्यजीवांच्या हालचालींचा मागोवा घेणे ही वन्यजीव निरीक्षणामधील एक महत्त्वपूर्ण बाब आहे. ड्रोनच्या आधारे सर्वेक्षण करून शास्त्रज्ञ हे वन्यजीव आपल्या अधिवासाचा वापर कशा पद्धतीने करतात आणि त्यांच्या वर्तनामधील बदलांची सूक्ष्म निरीक्षणे टिपू शकतात. तसेच या निरीक्षणांच्या आधारे त्या प्रजातीच्या व्यवस्थापनाबद्दल पुराव्यावर आधारित निर्णय ते अधिक सक्षमतेने घेऊ शकतात. परदेशात आता ड्रोन आधारित ‘व्हीएचएफ रिडोओ-ट्रॅकिंग प्रणाली’ विकसित झाली आहे. ज्यामुळे संशोधकांना आता रेडिओ कॉलर केलेल्या प्राण्याच्या हालचालीच्या मागोवा घेण्यासाठी ‘व्हीएचएफ अ‍ॅण्टिना’ घेऊन त्याच्या मागे पायपीट करावी लागणार नाही. उलटपक्षी, अशा पद्धतीचे ड्रोन वापरून संशोधक आता एकाच ड्रोन उड्डाणातून रेडिओ कॉलर केलेल्या ४० प्राण्यांच्या हालचालींचा मागोवा घेऊ शकतात.
 
 
 
वन्यजीव सर्वेक्षणासाठी मदत
व्हिडिओ चित्रित करण्याची क्षमता, थर्मल कॅमेरा आणि छायाचित्रांच्या आधारे त्याचे विश्लेषण करण्यासाठी तयार झालेल्या सॉफ्टवेअरमुळे वन्यजीव सर्वेक्षणामध्ये ड्रोन उपयुक्तता वाढत आहे. विमानातून केल्या जाणार्‍या सर्वेक्षणापेक्षा ड्रोन उडवून केलेले सर्वेक्षण हे अधिक जलद आणि कमी खर्चिक आहे. तसेच थर्मल कॅमेर्‍याच्या मदतीने लपून राहणार्‍या प्रजातींचे सर्वेक्षण करणे सुकर झाले आहे.
 
 
 
जैविक नमुन्यांचे संकलन
‘ओशन अलायन्स’ ही संस्था ‘व्हेल’या सागरी सस्तन प्राण्याचे जैविक नमुने गोळा करण्यासाठी २०१५ पासून ड्रोनचा वापर करत आहे. ज्यावेळी व्हेल श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन आपले श्वसनछिद्र उघडतो, त्यावेळी पाण्याचा फवारा उडतो. अशा वेळी संशोधकांकडून त्याठिकाणी ड्रोन पाठवला जातो. या फवार्‍यामधून व्हेलच्या शरारीरातून बाहेर पडलेले घटक हे ड्रोनच्या मदतीने गोळा केले जातात. या घटकांमुळे त्या व्हेलचे डीएनए, हार्मोन्स आणि मायक्रोबायोम्सची माहिती मिळते. तसेच ड्रोन त्यावेळी व्हेलचे छायाचित्रण करून ते चित्रण संशोधकांना पाठवत असतो.
 
 
वनस्पतींसाठीही उपयुक्त
संशोधक केवळ वन्यजीवांचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोनचा वापर करत नाहीत, तर वनस्पतींचा मागोवा घेण्यासाठीदेखील ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. अधिवासाच्या पुनर्संचयनाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. उदा, कोलोरॅडोमधील ‘द नेचर कॉन्झर्व्हन्सी’ या संस्थेने आगीमुळे प्रभावित झालेल्या भूदृश्यांचे आधी आणि नंतरचे छायाचित्र टिपण्यासाठी आणि कॉटनवुड झाडांचे मॅपिंग करण्यासाठी ड्रोनचा वापर केला. उपग्रह प्रतिमांपेक्षा उच्च रिझोल्यूशन प्रतिमा ड्रोनमुळे मिळत असल्याने वनस्पती मॅपिंगसाठी ड्रोन सर्वेक्षण हा मैलाचा दगड ठरला आहे.
 
 
वृक्षरोपणामध्ये मदत
झाडे लावण्याची प्रक्रिया ही श्रमकेंद्रित असते. त्यासाठी अनेक लोकांची मदत लागते. मात्र, आता परदेशातील काही कंपन्यांनी ‘डेन्ड्रा सिस्टम्स’ आणि ‘एअरसीड टेक्नोलॉजी’सह बियाणांचे रोपण करणारे ड्रोन विकसित केले आहेत. अत्याधुनिक अल्गोरिदम डिझाईन करून उड्डाणाचा मार्ग निश्चित करण्यात येतो. त्यानंतर ड्रोन उडवला जातो. अशा प्रकारचे ड्रोन दिवसाला ४० हजार बियाणांचे रोपण करू शकतात.
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121