प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपल्या स्वप्नांच्या दिशेने गरुडझेप घेणार्या सावित्रीच्या लेकीची कथा...
"संघर्ष हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग आहे, त्यावर फक्त बोलून उपयोग नाही. आपल्यासमोर येणार्या प्रत्येक अडचणींवर आपण विचारपूर्वक काम करायला हवे.” रेश्मा आरोटे यांचे हे वाक्य त्यांच्या संघर्षसंचितातून आलेले. रेश्मा सावित्री गंगाराम आरोटे यांचे आईवडील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यापासून चार किमी अंतरावर असणार्या सावळी गावातील रहिवासी. १९९२ साली रेश्मा यांचे आईवडील मुंबईत आले. आर्थिक उत्पन्नासाठी त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.
लहानपणी त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. विषमतेचे चटके सोसत रेश्मा लहानाच्या मोठ्या झाल्या. एकापाठोपाठ एक अशा आठ मुली त्यांच्या घरी जन्माला आल्या. रेश्मा यांच्या आई सावित्री आरोटे यांनी अत्यंत कष्टाने आपल्या मुलींना वाढवले. वडिलांनीदेखील अपार कष्ट सोसत, संसाराचा गाडा हाकला. त्यांच्या आई शिंदींच्या पानांपासून झाडू तयार करून विकायच्या. या कामात रेश्मा व त्यांच्या बहिणीदेखील आपल्या आईला हातभार लावायच्या. आईबरोबर झाडू विकण्यासाठी कर्जत, कल्याण, खोपोली, पडघा येथील आठवडी बाजारपेठेत सुट्टीच्या दिवशी त्या जात असत.
कुर्ला येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत रेश्मा यांचे शिक्षण झाले. सुरुवातीचा काही काळ शिक्षण घेताना भाषेची अडचण त्यांना सतावत राहिली. परंतु, कठोर परिश्रम करून त्यांनी या अडचणींवर मात केली. चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्या दहावी उत्तीर्ण झाल्या. दहावीनंतर त्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला व त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. अशातच बारावीत असताना जाहिरात लेखनाचा एक नमुना त्यांनी आपल्या शिक्षकांना दाखवला. शिक्षकांनी रेश्मा यांना कौतुकाची थाप तर दिलीच; त्याचबरोबर माध्यमाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावे असेसुद्धा सुचवले. माध्यम क्षेत्राची पदवी संपादन करताना, त्यांच्या विचारांच्या आणि आकलनाच्या कक्षा अधिक रुंदावल्या. विविध विषयांवर चर्चा करणे, वाचन करणे, व्याख्याने, स्पर्धा यांमुळे रेश्मा यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल झाला.
व्यक्तिमत्त्वाच्या विकासामध्ये शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे त्या सांगतात. यानंतर ‘जनसंपर्क’ या विषयात मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर अभ्यास केला. दरम्यानच्या काळात फोटोग्राफी, एडिटिंग, लेखन या विषयातील कौशल्यांचादेखील त्यांनी विकास केला. कमी वयात विविध कौशल्य संपादित केलेल्या रेश्मा यांनी, विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम करताना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांसोबत त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर ‘सलाम बॉम्बे फाऊंडेशन’ येथे ‘मीडिया फॅसिलिटेटर’ म्हणून त्यांनी साडेतीन वर्षे काम केले. या फाऊंडेशनच्या माध्यमातून मुंबईतील शासकीय तसेच, निमशासकीय शाळांमध्ये माध्यम प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी केले. दरम्यान याच काळात ‘कोरोना’च्या आपत्तीने डोकं वर काढले. मात्र, त्यांचे कार्य थांबले नाही. ऑनलाईन माध्यमातून त्यांनी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या माध्यमातील मुलांना शिकवले. फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद. ‘छायाचित्र पत्रकार’ म्हणून काम करताना त्यांनी आपल्या नजरेतून वेगवेगळ्या प्रकारची क्षणचित्रे टिपली.
आपल्या कामामध्ये वेगळेपण दाखवण्यासाठी रेश्मा कायम प्रयत्नशील असतात. छायाचित्रणामध्ये वेगळे विषय हाताळले जावे, या उद्देशाने मुंबईतील झोपडपट्टी, बाजारपेठ, तेथे असलेले म्हशींचे तबेले, मासिक पाळी, कैकाडी समाजातील विविध सण, महिलांचे जगणे या विषयांना घेऊन त्यांनी कॅमेर्यात बोलकी छायाचित्रे कैद केली. मुंबईतील म्हशींच्या तबेल्यांचे छायाचित्र काढताना सलग चार दिवस त्यांनी त्या तबेल्यांना भेटी दिल्या. काम करणार्या श्रमिकांचे जगणे समजून घेतले. या छायाचित्रांचे महत्त्व अधोरेखित करताना रेश्मा म्हणतात की, “उद्या कदाचित इथलं गावपण हरवून जाईल, तेव्हा माझे फोटो शाबूत असतील.”
‘मासिक पाळी’ या विषयावर फोटो शूट करताना, त्यांना त्यांच्या जवळच्या माणसांचा मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला. मासिक पाळी ही स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे, ते समजून घ्यायला नको का? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. ‘छायाचित्रकार म्हणून मुलानेच करायला हवी, तू मुलगी आहे म्हणून नको,’ असा ज्यांनी रेश्मा यांना विरोध केला होता, आज तेच लोक रेश्मा यांच्याकडून आवर्जून छायाचित्रे काढून घेतात.
वेगळेपणाचा ध्यास घेतलेल्या रेश्मा यांना त्यांच्या कामाचा योग्य तो सूर गवसला. ठाण्याच्या जिल्हा परिषदेत त्या जनसंपर्क अधिकारी म्हणून २०२३ साली रूजू झाल्या. जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना, जिल्हा परिषदेच्या सोशल मीडिया साईट्स हाताळण्याचे काम त्या करतात. त्याचबरोबर मजकुराच्या निर्मितीपासून मजकूर अपेक्षित त्या त्या ठिकाणी पोहोचविण्याचे कामही रेश्मा इमानेइतबारे करतात. जिल्हा परिषदेच्या प्रचार-प्रसिद्धीची धुरा सांभाळण्याचे काम त्या गेली दोन वर्षे करत आहेत. रेश्मा यांनी धोपटमार्ग न निवडता, स्वत:ची वेगळी वाट निर्माण केली. रेश्मा यांच्या गावी त्यांच्या याच कार्याचा यथोचित गौरवदेखील करण्यात आला. ‘जागतिक महिला दिना’निमित्त ‘डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठान’, महाराष्ट्र राज्य आयोजित ‘रमाई महोत्सव २०२५’ या कार्यक्रमांत त्यांचा सत्कारही संपन्नही झाला. समवयस्क तरुण-तरुणींना संदेश देत रेश्मा म्हणतात की, “आपल्याला नव्या वाटा शोधत माणूस म्हणून जगता यायला हवे. जगण्यातला आनंद घेत माणसाने पुढे जात राहावे.” रेश्मा यांना त्यांच्या समृद्ध वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!