नेरूळ पोलीस ठाण्यातील वादग्रस्त इफ्तार पार्टी रद्द
19-Mar-2025
Total Views | 26
2
मुंबई (सागर देवरे): ‘नेरूळ पोलीस ठाणे’ आणि ’मरकज-ए-फलाह’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 मार्च रोजी नेरुळ पूर्वमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे कार्यक्रम पत्रिका स्वरूपातील हे पत्र ’मरकज-ए-फलाह’ या धार्मिक संघटनेच्या नाव आणि नेरुळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्यांच्या अधिकृत सही आणि लोगोसहित सोशल मीडियावर व्हायरल झाले. या कार्यक्रमाला वाढता विरोध आणि राज्यातील तापलेले वातावरण पाहता, कायदा-सुव्यवस्थेच्या कारणाने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पत्रक पुन्हा एकदा आयोजक आणि नेरुळ पोलीस ठाण्याद्वारे जारी केले आहे.
फ्रुटवाला कल्चर सेंटर, सेक्टर-5, नेरुळ पूर्व येथे ’मरकज-ए-फलाह’ ही इस्लामिक संघटना आणि नेरूळ पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजक म्हणून निमंत्रण पत्रिका तयार केली होती. या निमंत्रण पत्रिकेत नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी यांच्या सहीनिशी महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत चिन्ह असलेला लोगोही वापरण्यात आला होता. महाराष्ट्र पोलीस यंत्रणा ही राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोनातून कार्यरत एक महत्त्वाची शासकीय संस्था आहे. या संस्थेने भारतीय संविधानानुसार धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचे पालन करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत चिन्ह हे केवळ सरकारी दस्तऐवज, पत्रव्यवहार, आदेश आणि विशिष्ट अधिकृत वापरासाठीच राखून ठेवण्यात आलेले असते. असे असताना आणि महाराष्ट्रातील वातावरण धार्मिक दंगलीमुळे तापलेले असताना कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणार्या पोलीस ठाण्यानेच अशा कार्यक्रमाचे सयुक्तरित्या आयोजन केल्याने याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
‘विश्व हिंदू परिषद’-नवी मुंबईचे पत्र
पत्र समाजमाध्यमांवर पसरताच, नवी मुंबई येथील ‘विश्व हिंदू परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी नेरुळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. यावेळी, त्यांनी सोमवार, दि. 17 मार्च रोजी नागपूर येथे झालेल्या अनुचित घटनेचा आणि पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पाश्वर्र्भूमीवर या कार्यक्रमाला तीव्र शब्दांत विरोध केला. याबाबतचे पत्र ‘विश्व हिंदू परिषद’-नवी मुंबईवतीने नेरुळ पोलिसांना देण्यात आले. याची दखल घेत ही वादग्रस्त इफ्तार पार्टी रद्द करण्यात आली.
वरिष्ठ पोलिसांनी उत्तर देणे टाळले
या संपूर्ण घटनेची माहिती घेण्याकरता दै. ’मुंबई तरुण भारत’ने नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी यांना संपर्क साधला. मात्र, त्यांनी याबाबत बोलणे टाळले. त्यानंतर वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
अशा कार्यक्रमाचे आयोजन आवश्यक होते का?
नागपूर येथे झालेल्या अनुचित घटनेत चार पोलीस उपायुक्त, अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यावर सशस्त्र हल्ले झाले. जिहाद्यांच्या या प्रचंड हैदोसानंतर अशाप्रकारे दुसर्याच दिवशी नेरुळ पोलीस ठाण्याकडून इफ्तार पार्टीच्या आयोजनास हिंदू समाजाचा तीव्र विरोध आहे. मुळात सध्याची परिस्थिती पाहता, अशा कार्यक्रमाचे आयोजन होणे आवश्यक होते का, हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
- स्वरूप पाटील, जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद, नवी मुंबई
नेरुळ पोलीस ठाण्याकडून कायद्याचे उल्लंघन
या पत्रकामध्ये पोलीस सहभागातून इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले आहे. पत्रकात वापरण्यात आलेले ‘लोगो’ ही ’प्रतीकं आणि नावं (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायदा 1950’ ‘कलम 3’ नुसार बेकायदेशीर आहे. तसेच, ‘कलम 5’अनुसार शिक्षेसही पात्र आहे. पोलीस यंत्रणेच्या या कृतीमुळे ही यंत्रणा एका विशिष्ट धर्माच्या बाजूने कल असणारी आहे, अशी शंका सामान्य माणसाच्या मनात उपस्थित होऊ शकते. धर्मपालन हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग असला, तरी एखाद्या व्यक्तीला किंवा धार्मिक संघटनांना पोलीस यंत्रणेचे चिन्ह वापरायची परवानगी नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी त्वरित लक्ष द्यावे आणि उचित कार्यवाही करावी.
- अॅड. आकाश जगताप, अधिवक्ता, सामाजिक कार्यकर्ते मुंबई