प्रत्येक शहराला आपली स्वतःची ओळख असते. ही ओळख जपत ते शहर मार्गक्रमण करत आपल्यापाशी असलेला पुरातन अनमोल ठेवा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करत असते. अशीच आपली पौराणिक आणि धार्मिक ओळख नाशिक शहराने जपली आहे. पेशवेकाळापासून सुरू झालेला रहाडींचा रंगोत्सव बदलत्या काळानुसार अधिक खुलत चालला असून येणारी नवीन पिढी अधिक जोमाने हा उत्सव साजरा करीत आहे. उपलब्ध कागदपत्रांवरून २० रहाडी असलेल्या नाशकात सध्या सात रहाडी अस्तित्वात आहेत. पुढील काळात सर्वच्या सर्व रहाडी खुल्या करुन नाशिकच्या या रंगोत्सवाला अधिक झळाळी येईल. आजच्या रंगपंचमीनिमित्ताने नाशिकच्या या पेशवेकालीन रहाड संस्कृतीचा मागोवा घेणारा हा लेख...
रंगपंचमीचा संपूर्ण दिवस रुसवे-फुगवे आणि भेदांना मुठमाती देत सर्व हिंदू बांधव मोठ्या आनंदात रंगोत्सव साजरा करतात. होळीनंतर दुसर्या दिवशी धुळवडीला वीर मिरवल्यानंतर रंगपंचमीला रहाड रंगोत्सव साजरा केला जातो. रहाड म्हणजे भलामोठा भूमिगत हौद. या रहाडींचा इतिहास मोठा रंजक असून पेशव्यांनीच रहाडी खोदल्याचे सांगितले जाते. साधारणपणे १७व्या शतकात दगड आणि चुन्याचा वापर करून रहाडींची निर्मिती करण्यात आली. पेशव्यांच्या बखरीनुसार नाशकात एकूण २० रहाडी असल्याचे सांगण्यात येते.
होळीच्या पाच दिवसांनी म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमीला रंगांचा उत्सव साजरा केला जातो. होळी झाल्यानंतर लगेचच दुसर्या दिवसापासून परंपरागत पूजाविधी करून रहाड खोदण्यास सुरुवात केली जाते. त्या स्वच्छ पाण्याने धुवून रंगरंगोटी करून सजवल्या जातात. २० रहाडींपैकी नाशिक शहरात सध्या सात रहाडी अस्तित्वात असून रंगपंचमीच्या दिवशी खुल्या केल्या जातात. या दिवशी रहाडींभोवती तरुण गोल उभे राहतात आणि रहाडीतल्या पाण्यात जोरदार सूर मारतात. त्याला ‘धप्पा’ म्हटले जाते. नाशिकची रंगपंचमी साजरी करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यामुळेच सर्वच रहाडींतील रंगोत्सवासाठी नैसर्गिक रंग तयार केला जातो. त्यासाठी झाडाची पाने, फुले, हळद, कुंकू यांना एकत्रित करून चार ते पाच तास एका भांड्यात गरम केले जाते.
नाशिकमध्ये जुनी तांबट गल्ली, तिवंधा चौक, काझीपुर्यातील दंडे हनुमान चौक, गाडगे महाराज पुलाखालील दिल्ली दरवाजा, पंचवटीतील शनी चौक आणि शिवाजी महाराज चौकातील साती-आसरा मंदिरासमोर रहाडी आहेत. रंगाच्या या उत्सवात न्हाऊन निघाल्यानंतर सागवानी लाकडांच्या मोठ्या ओंडक्यांचा वापर करून रहाड बुजवली जाते. या रहाडीत रंगाचे पाणी असते. त्यावर उसाचे चिपाड आणि माती टाकली जाते. ही रहाड पुन्हा थेट पुढल्या वर्षीच रंगपंचमीसाठी खुली केली जाते. कथडा शिवाजी चौकातील रहाड यंदाच उघडण्यात आली आहे, त्यामुळे नाशिकमध्ये सध्या सात रहाडी आहेत. यात शनी चौक, पंचवटी येथे गुलाबी रंगाची, गाडगे महाराज पुलाजवळ पिवळ्या रंगाची, रोकडोबा तालीम संघ व मधळी होळी तालीमजवळ केशरी-नारंगी, तर जुन्या तांबट लेनमधील होळी भगव्या रंगाने खेळली जाते.
रहाड आणि वैशिष्ट्ये :
दिल्ली दरवाजा
गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा चौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीची देखभाल आणि मान तुरेवाले पंच मंडळांकडे आहे. रहाडीची परंपरा यापुढेही सुरू ठेवण्याच्या उद्देशाने ‘आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळा’ची स्थापना करण्यात आली. पळसाच्या फुलांपासून बनवला जाणारा रंग हे या रहाडीचे वैशिष्ट्य असून या रहाडीचा रंग केशरी आहे.
तांबट लेन
पेशवेकालीन पाषाणातील दगडाच्या बांधकामात असलेली ही रहाड अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. तांबट लेन येथील युवकांनी एकत्र येत ही रहाड खुली केली. या रहाडीचा रंग भगवा आहे. रंगपंचमीच्या दिवशी येथील पाच कुटुंबांना पूजेचा मान दिला जातो. त्यानंतर खर्या अर्थाने रंगांच्या उत्सवाला सुरुवात होते. रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले तुळस, चंदनाचा वापर केला जातो. १५० किलोहून अधिक फुले गोळा करून ती कढईमध्ये उकळवली जातात. त्यानंतर पाण्याने भरलेल्या रहाडीत एकजीव केल्यानंतर रंग तयार होतो. या रहाडीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे महिलांना रंग खेळता यावा, या उद्देशाने एक कोपरा राखीव ठेवला जातो. तेथे पुरुषांना जाण्यास सक्त मनाई करण्यात येते.
तिवंधा चौक
नाशिक शहरातील प्रसिद्ध बुधा हलवाई दुकानासमोर तिवंधा चौकात ही पेशवेकालीन रहाड आहे. या रहाडीचा रंग पिवळा असून तो पूर्णपणे फुलांपासून बनवला जातो. रहाड सजवल्यानंतर रंगाची, रहाडीची विधिवत पूजा केली जाते. रहाडीचा मान जळगावकर कुटुंबीयांना आहे. विशेष म्हणजे या रहाडीत महिलांना प्रवेश दिला जातो. अर्धा भाग महिलांसाठी राखीव असतो, तर अर्धा भाग पुरुषांसाठी राखीव असतो.
दंडे हनुमान चौक
दंडे हनुमान चौक परिसरात दंडे हनुमान रहाड आहे. काही वर्षांपूर्वी बैलगाडीवर मोठमोठे टीप, पाण्याच्या टाक्यांमधून रंग आणून रंगपंचमी साजरी केली जात असे, अशी आख्यायिका असलेल्या या रहाडीची परंपरा कालांतराने बंद झाली. त्यानंतर पुन्हा रहाड खोदण्यात येऊन रंगपंचमी साजरी केली जाते. जवळपास २०० किलोपेक्षा अधिक फुलांना एकत्रित करून पिवळा रंग तयार केला जातो.
दोन रहाडी केल्या पुनर्जीवित
मागील अनेक वर्षांपासून बंद झालेल्या रहाडी पुनर्जीवित करण्यात येत आहेत. जुने नाशिक परिसरात दोन वर्षांत दोन रहाडी पुनर्जीवित करण्यात आल्या आहेत. तब्बल ५७ वर्षांनंतर म्हणजेच मागील वर्षी मधली होळी भागातील रहाड उघडण्यात आली, तर कथडा शिवाजी महाराज चौकातील रहाड यंदा उघडण्यात आली. सद्यस्थितीत सात रहाडी असल्या, तरी सर्वच्या सर्व २० रहाडींचा शोध सुरू असून त्यांचेही पुनरुज्जीवन केले जाणार आहे.
शॉवर रंगपंचमी
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नाशिक शहरामध्ये ‘शॉवर रंगपंचमी’ खेळली जाते. भद्रकाली परिसरातील गाडगे महाराज पुतळा, बुधवार पेठ, साक्षी गणेश मंदिर अशा प्रमुख ठिकाणी ‘शॉवर रंगोत्सव’ आयोजित केला जातो. तसेच गाडगे महाराज पुलाच्या खाली शॉवर लावले जाऊन रंगांची उधळण केली जाते. हा नवीन प्रयोग नाशिककरांना चांगलाच भावला असून या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.
पेशवेकाळापासून रहाडींची परंपरा
प्रत्येक शहरात कुस्तीगीर तयार व्हावे, या उद्देशाने पेशव्यांनी एक व्यवस्था निर्माण केली होती. नाशिकमध्ये जेथे जेथे रहाड आहे, तेथे आधी कुस्त्यांचा आखाडा होता. त्या भागातील तरुण तेथे कुस्तीचा सराव करायचे. पेशव्यांच्या रास्ते नावाच्या सरदाराच्या पत्नी नाशिकच्या होत्या. त्यांनी या कुस्तीगीरांना रंग खेळताना बघितले. याच भागात खोल खड्डा करून रंगांची उधळण करण्याची कल्पना त्यांनी पेशव्यांना सूचवली. त्यानुसार नाशिकच्या विविध चौकांत २० रहाडी खोदल्या गेल्या. त्यांतील आता सात सुरू आहेत. पेशवेकाळापासूनच रंगोत्सव खेळण्याची परंपरा सुरू करण्यात आली.
- डॉ. नरेंद्र धारणे, विद्यावाचस्पती व अभ्यासक
काही काळ थांबलेली परंपरा पुन्हा सुरू
कथडा येथील शिवाजी महाराज चौकातील रहाड कित्येक वर्षांत उघडली गेली नव्हती. आम्ही यावर्षी ती पुनर्जीवित केली. या भागात साती-आसरांचे जुने स्थान आहे. अलीकडेच त्यांचा जीर्णोद्धार करून तेथे सुंदर मंदिरही बांधले. साती-आसरा या जलदेवता आणि रंगपंचमी हा तर जलाचाच उत्सव. त्यामुळे काही काळ थांबलेली ही परंपरा आम्ही पुन्हा भव्य स्वरुपात सुरू करत आहोत.
- संतोष कहार, अध्यक्ष,
शिवाजी तरुण मित्र मंडळ व साती-आसरा देवी संस्था
उत्सव साजरा करणारी आमची पाचवी पिढी
तिवंधा चौकातील ‘हिंदमाता सेवक मित्र मंडळ’ १९४८ पासून रहाड रंगोत्सवाचे आयोजन करत आहे. आमच्या पूर्वजांनी सुरुवात केलेला हा रहाड उत्सव आता आमची पाचवी पिढी साजरा करीत आहे. इथल्या रहाडीचा रंग पिवळा असतो. रंगपंचमीच्या दिवशी रहाडीची विधिवत पूजा केली जाते. यामध्ये जलदेव, सूर्यनारायणाची पूजा केली जाते. त्यानंतर नारळ वाढवल्यानंतर रंगोत्सव खेळायला सुरुवात होते.
- सर्वेश देवगिरे, अध्यक्ष, हिंदमाता सेवक मित्र मंडळ