उल्हासनगर : ( Stop the ration mafia MLA kumar aylani ) गोरगरिबांच्या रेशनचा काळाबाजार करून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री, संबंधित मंत्री तसेच उच्च पोलीस अधिकारी, रेशनिंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असेही या निवेदनात नमूद केले आहे .
काही दिवसांपूर्वी रेशन दुकानांचे वितरणाच्या ट्रकमधून जीपीएस काढून स्कूटरवर बसवून रेशन माफियांना सामाजिक कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले होते. माफियांकडून काळाबाजार करण्याचा हा प्रकार खूप पूर्वीपासून सुरू आहे, मात्र आजतागायत त्याला आळा बसलेला नाही. विश्वसनीय माहितीनुसार या रॅकेटमध्ये शिधावाटप विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून स्थानिक अधिकारी सामील आहेत. आरोपीला स्कॅनिंग मशिनसह पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले, मात्र हे प्रकरण शिधावाटप विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याकडूनच कारवाई केली जाईल, असे सांगून आरोपींना पोलिसांनी सोडून दिले.
आमदार कुमार. आयलानी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा सचिव, शिधावाटप विभागाचे नियंत्रक, पोलीस आयुक्त ठाणे आणि उल्हासनगर गुन्हे शाखा यांना पत्र लिहून संबंधित कंत्राटदार व रेशन माफिया तसेच स्थानिक अधिकारी व शिधावाटप विभागाचे अधिकारी यांच्यावर चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगर शहरात केवळ 10 टक्के रेशनचे वाटप केले जाते आणि गरिबांना वितरित केल्या जाणाऱ्या 90 टक्के रेशनचा काळाबाजार होतो.अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.