नागपूरात संचारबंदी कायम! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
19-Mar-2025
Total Views |
नागपूर : नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी तिसऱ्या दिवशीही संचारबंद कायम ठेवण्यात आली आहे. नागपूरातील एकूण ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संचारबंदी लागू असून पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
सोमवार, १७ मार्च रोजी नागपूरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'औरंगजेबाची कबर हटाओ' असे नारे देत आंदोलन केले. यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली. त्यानंतर या प्रतिकात्मक कबरीच्या कापडावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरली आणि नमाज आटपून येत असलेल्या २०० ते २५० लोकांचा जमाव तयार झाला. या जमावाकडून घोषणा देत दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत वैद्यकीय कारण वगळता इतर कोणत्याही कारणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित जमू नये, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
संचारबंदी कोणत्या भागात?
तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपीलनगर या ११ ठाण्यांच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या भागांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून नजर ठेवण्यात येत आहे.