नवी दिल्ली: ( Election ID card and Aadhaar will be linked ) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याबाबत चर्चा करण्यासाठी प्रमुख अधिकारी आणि तांत्रिक तज्ञांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृह सचिव, सचिव विधिमंडळ विभाग, सचिव मंत्रालय आणि सीईओ, यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाचे तांत्रिक तज्ञ देखील या बैठकीत सहभागी झाले होते.
भारतीय संविधानाच्या कलम ३२६ नुसार, मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकालाच दिला जाऊ शकतो; आधार कार्ड केवळ व्यक्तीची ओळख स्थापित करते. म्हणूनच, मतदार ओळखपत्रास आधारशी जोडणे हे संविधानाच्या कलम ३२६, लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम २३(४), २३(५) आणि २३(६) मधील तरतुदींनुसार आणि दिवाणी खटला क्रमांक १७७/२०२३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगानेच केले जाईल असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आधार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांमध्ये लवकरच तांत्रिक सल्लामसलत सुरू होणार आहे, असे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.
येत्या निवडणुकांपूर्वी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, समावेशकता आणि कार्यक्षमता वाढवणे हे या कार्यवाहीचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.