इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या माँ जिजाऊंच्या पाचाड येथील समाधीस्थळाचा दर्जेदार विकास करा
भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांची मागणी
19-Mar-2025
Total Views | 7
मुंबई : ( Develop the historical footprints of Maa Jijau at Pachad Pravin Darekar ) राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ दर्जेदार पध्दतीने विकसित केले पाहिजे. तेथे दर्जेदार अशा कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत. समाधी स्थळ हे ऐतिहासिक पाऊलखुणा आहे, त्या टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी रायगड प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेऊन शासनाने मूल्यमापन करावे, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.
विधान परिषदेत आज आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीस्थळाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाग घेताना आ.दरेकर म्हणाले की, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ विकसित केले पाहिजे. दर्जेदार अशा कुठल्याही मूलभूत सुविधा तेथे नाहीत. प्राधिकरणाला ६००-६५० कोटी निधी सरकारने दिला आहे. प्राधिकरणाचा निधी नातेखिंडीपासून काँक्रिटचा रस्ता करण्याइतपत सीमित नाही. समाधीस्थळ ऐतिहासिक पाऊलखुणा आहेत, त्या टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. प्राधिकरणाने केलेली कामे, निधीचा वापर, कामाचे प्राधान्य या बाबींचा सरकारने एकदा आढावा घ्यावा, आवश्यकता वाटली तर निधी वाढवून द्यावा आणि पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी बोलून पर्यटनाचा निधीही यासाठी उपलब्ध करावा. प्राधिकरणाचा किती निधी कधी उपलब्ध करून देणार, पर्यटन विभागाकडून याकरिता वाढीव निधी देणार का ? प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेऊन मूल्यमापन करणार का ? असे प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केले.
या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार म्हणाले की, रायगड प्राधिकरणाला निधी वळता केला आहे. यंदाच्या बजेटमध्ये निधी आणखी वाढवून देत आहोत. पर्यटनाचा निधी तिकडे हवाय, अशी परिस्थिती नाही. २०१७ पासून टप्प्याटप्प्याने कामांना सुरुवात झाली आहे. सन्माननीय सदस्य प्रविण दरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे कामांच्या पाठपुराव्याची, मूल्यमापनाची गरज आहे. तशी आढावा बैठक सन्माननीय सदस्यांसह लवकरच घेऊ, असे आश्वासनही मंत्री शेलार यांनी दिले.