पेट्रोल पंपांवरील अस्वच्छ स्वच्छतागृहांवर कारवाई करा! आमदार चित्रा वाघ यांची मागणी
महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्या
19-Mar-2025
Total Views | 19
मुंबई : मुंबईसह राज्यातील महिलांसाठी मोफत, सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावी यासह हॉटेल्स ढाबे आणि पेट्रोल पंपांवरील अस्वच्छ स्वच्छतागृहांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी आमदार चित्रा वाघ यांनी बुधवार, १९ मार्च रोजी विधानपरिषदेत केली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "स्वच्छतागृहांचा प्रश्न हा महिलांचा बरेच वर्षे दुर्लक्षित, प्रलंबित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आजही कामानिमित्त किंवा इतर कारणाने बऱ्याच महिला घराबाहेर प्रवास करतात. त्यावेळी त्यांना स्वच्छतागृहांच्या या प्रश्नाला सामोरे जावे लागते."
"मुंबईत १ हजार ८२० महिलांसाठी फक्त १ सार्वजनिक शौचालय उपलब्ध आहे. शौचालयांची अपुरी संख्या, अस्वच्छता आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातूनच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे आजार निर्माण होतात. मुंबईतील वस्ती शौचालयांची दुरवस्था, असुरक्षितता आणि देखभालीच्या मोठ्या खर्चामुळे अनेक संस्था ती चालविण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे त्यांचा खर्च कसा कमी होईल, यासाठी शासनाने प्रयत्न करावे. तसेच वस्ती शौचालयांची सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांची नियमित गस्त राहणे आवश्यक आहे," अशी मागणी त्यांनी केली.
चित्रा वाघ यांच्या मागण्या कोणत्या?
"शासनाने पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांचा सर्वे करावा. हॉटेल्स, ढाबे आणि पेट्रोल पंपांवरील अस्वच्छ स्वच्छतागृहांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करावे. वस्ती शौचालयांचे वीज आणि पाण्याचे देयक मुंबई महापालिकेने भरावे अथवा त्यात सवलत मिळावी. गर्दुल्ल्यांच्या त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवावी. राज्यभर QR कोड तक्रार प्रणाली सुरू करून तक्रारींवर त्वरित कारवाई करावी. राज्यभर नियमित स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता स्कॉड्स’ भरारी पथके नियुक्त करावेत. महिलांना मुतारींची सोय मोफत असावी," अशा मागण्या यावेळी चित्रा वाघ यांनी सभागृहात केल्या. दरम्यान, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महिलांसाठी मोफत आणि सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.