
Sunita Williams Return : ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेमतेम आठवड्याभराचा मुक्काम पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले. आता अखेर त्यांच्या परतीचा मुहूर्त ठरला असून ते दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार दि. १९ मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत. नासासह स्पेसएक्स आणि अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून आता या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. सुरुवातीला दोघेही बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघणार होते. मात्र ‘स्पेस एक्स’बरोबर चर्चा केल्यानंतर आणि फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर आज, मंगळवारीच दोघांच्या परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, ‘नासा’ने जाहीर केलंय. पृथ्वीपासून दूर अंतराळात जवळपास नऊ महिने राहिल्यानंतर सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांचा हा परतीचा प्रवास सुरु झालाय, त्यांची ही परतीची मोहिम नेमकी कशी असणार आहे? याविषयी सविस्तर माहिती घेऊयात...
नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळवीर या दोघांनी गेल्या वर्षी ५ जून केप कॅनावेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. ते आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी, आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (ISS) गेले होते. तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले. त्यांचा अंतराळातील मुक्काम लांबणीवर गेला. यानंतर अमेरिकेत सत्तांतर झाले. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर त्यांनी सुनीता विल्यम्स आणि त्यांच्य़ा सहकाऱ्याला अंतराळातून परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही जबाबदारी इलॉन मस्क यांच्याकडे सोपवली. मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या यानातून त्यांना परत आणण्यात येणार आहे. त्यांना परत आणण्यासाठी नासासह स्पेसएक्सकडून मिशन क्रू -10 राबवण्यात येणार होते. फेब्रुवारी महिन्यात १२ तारखेला त्यांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले.
आणि त्यानंतर बरोबर एक महिन्याने म्हणजेच बुधवारी १२ मार्च रोजी फ्लोरिडा येथील स्पेस सेंटरवरून ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे स्पेस एक्सचा क्रू 10 म्हणजे अंतराळवीरांचं दहावं पथक स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावेल, असं सांगण्यात आलं होतं. नासा-स्पेसएक्स क्रू-10 मोहिमेला घेऊन जाणारे यान बुधवारी उड्डाण करणार होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ही मोहिम पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर १४ मार्च रोजी स्पेसएक्स ने ४ अंतराळवीरांसोबत क्रू - 10 अंतराळात पाठवले. हे यान १६ मार्च रोजी दुपारी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झालं. क्रू-१० वरील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काही वेळ संशोधन करतील. विल्यम्स व विल्मोर यांनी केलेलं संशोधन व माहिती ताब्यात घेतील. त्यानंतर १९ मार्च रोजी विल्यम्स व विल्मोर या दोघांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील, असे नियोजन ठरले होते. मात्र ‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’च्या तंत्रज्ञांच्या एकत्रित बैठकीत झालेल्या चर्चेनंतर तसेच फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर आज, मंगळवारीच दोघांच्या परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, ‘नासा’ने जाहीर केले.
यानंतर आता 'ड्रॅगन' या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परती प्रवास सुरू झालाय. १८ मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार १० वाजून ३५ मिनिटांनी हे अंतराळयान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनहून वेगळं अर्थात अनडॉक केलं जाईल. ड्रॅगन या अंतराळयानाचं अनडॉकिंग अनेक गोष्टींवर अवलंबून होतं. यामध्ये अंतराळयान आणि रिकव्हरी टीमची तयारी, हवामान, समुद्राची परिस्थिती आणि इतरही अनेक कारणीभूत ठरणारे घटक समाविष्ट आहेत. नासा आणि स्पेसएक्स हे क्रू-9 च्या परत येण्याच्या वेळेलाच स्प्लॅशडाउन स्थानाची जागा निश्चित करतील. ‘नासा’चे अंतराळवीर निक हेग आणि रशियाच्या ‘रॉसकॉसमॉस’चे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेदेखील सुनीता आणि बुच यांच्यासह परतीचा प्रवास करणार आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासाचं भारतीय प्रमाणवेळेनुसार वेळापत्रक कसं आहे ते जाणून घेऊयात
- १८ मार्च रोजी सकाळी ८.१५ मिनिटांनी – हॅच क्लोज म्हणजेच यानाचा दरवाजा बंद केला जाईल. या क्षणापासून ‘नासा’च्या संकेतस्थळावर परतीच्या प्रवासाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
- १८ मार्च रोजी सकाळी १०.३५ मिनिटांनी - अनडॉकिंग म्हणजेच आयएसएस अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून यान वेगळे होईल.
- १९ मार्च रोजी २.४१ मिनिटांनी – डीऑर्बिट बर्न म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणात यानाचा प्रवेश होईल.
- १९ मार्च रोजी सकाळी ३.२७ मिनिटांनी – स्प्लॅशडाउन म्हणजेच यान समुद्रात उतरेल.त्यानंतर रिकव्हरी टीम्स या कॅप्सूल्समधून अंतराळवीरांना बाहेर काढतील. अर्थात या सगळ्या गोष्टी तांत्रिक बाबींवर आणि हवामानावर अवलंबून असतील.
- १९ मार्च रोजी सकाळी ५ वाजता - पृथ्वीवर परतण्यासंदर्भात पत्रकार परिषद होईल.
नासाने असं सांगितले आहे की, हवामानाचा अंदाज घेऊनच स्प्लॅशडाऊनची जागा ठरवली जाईल. भारतीय वेळेनुसार, १९ मार्चला सुनीता विल्यम्स परतणार आहेत. त्यानुसार, अंतराळात सुनीता विल्यम्स यांनी एकूण २८६ दिवस घालवलेले असतील. या दौऱ्यासह अंतराळातील एकाच प्रवासामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये सर्वाधिक वेळ घालवणारी तिसरी महिला अंतराळवीर ठरणार आहे.
एकीकडे संपूर्ण जग सुनीता विल्यम्सच्या सुरक्षित परतीची वाट पाहत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना लिहिलेल्या पत्रातून १.४ अब्ज भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या एक्स सोशल मीडिया अकाऊंटवरून या संदर्भातील पत्र शेअर केले आहे. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नासाचे माजी अंतराळवीर माइक मंसिमिनो यांच्याकडून सुनीता यांच्यापर्यंत पोहचवले होते. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जरी तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी, तुम्ही आमच्या हृदयाच्या जवळ आहात, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात मॅसिमिनो यांना भेटले आणि विनंती केली की, त्यांचे आणि भारतीयांचे हे पत्र सुनीता विल्यम्स यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांच्या सुरक्षित पुनरागमनाच्या शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी भारताच्या गौरवशाली कन्येशी असलेल्या खोल नात्याला पुन्हा एकदा दुजोरा दिला. यावर सुनीता यांनी त्यांच्या या हावभावाने प्रभावित होऊन पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याचा प्रतिसाद माइक मॅसिमिनो यांच्याकडून मिळाल्याचा मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
अमेरिकन प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ५ वाजून ५७ मिनिटांनी सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर पाऊल ठेवतील आणि ही संपूर्ण मोहिम, हे क्षण सारं जग Live Telecast च्या माध्यमातून पाहू शकणार आहे. या सगळ्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.