हिंदू धर्मद्वेष्ट्या क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटवा
-‘विहिंप’ आणि ‘बजरंग दला’चा आक्रमक पवित्रा
- वेळ पडल्यास कारसेवा करण्याचा दिला इशारा
18-Mar-2025
Total Views | 8
नाशिक: ( remove the grave of the cruel Hindu haters Aurangzeb ) आपल्या संपूर्ण कार्यकाळात हिंदू धर्माचा द्वेष करणारा आणि हिंदूंसाठी पवित्र असलेल्या मंदिरांना जमीनदोस्त करणार्या हिंदू धर्मद्वेष्ट्या क्रूरकर्मा औरंग्याची छत्रपती संभाजीनगर येथील कबर त्वरित हटविण्यासाठी ‘विहिंप’ आणि ‘बजरंग दला’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवार, दि. 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ‘विश्व हिंदू परिषद’ आणि ‘बजरंग दला’च्या पदाधिकार्यांकडून यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे, नाशिकच्या विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले असून कबर त्वरित हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, वेळ पडल्यास कारसेवा करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
बाबरचा वंशज क्रूरकर्मा औरंग्याचा मृत्यू अहिल्यानगर येथे झालेला असूनही त्याची कबर छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात आली. याच औरंग्याने संपूर्ण भारतभर उच्छाद मांडत शीख गुरु तेगबहादूरसिंह यांचीही हत्या करण्याचे पाप केले, तर केवळ मुस्लीम धर्म स्वीकारत नाही, म्हणून शीख गुरू गोविंदसिंह यांच्या दोन बाल साहेबजाद्यांना भिंतीमध्ये जिवंतपणी गाडण्यात आले, तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करत क्रूरपणाचा कळस गाठत त्यांची हत्या केली.
याबरोबरच हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या काशी विश्वेश्वराचे मंदिर, मथुरेतील सुंदर मंदिर, सोरटी सोमनाथाचे मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि जेजुरीच्या खंडोबाच्या गडावरही याने हल्ला केला. हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचत क्रूर कत्तल केली. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण करण्याचे पातक करणार्या क्रूरकर्मा व आततायी औरंग्याचे कुठलेही स्मारक अथवा कबर स्वतंत्र भारतात गुलामीचे आणि यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळेच कबर पूर्णपणे नाहीशी करून परकीयांचे कुठलेही नामोनिशाण नष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. ही कबर पूर्णपणे हटविण्यात यावी, अन्यथा ‘विश्व हिंदू परिषद’, ‘बजरंग दल’ आणि हिंदू समाज छत्रपती संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करत औरंग्याची कबर उद्ध्वस्त करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात ‘बजरंग दल’ महानगर संयोजक श्रीकांत क्षत्रिय, ‘विश्व हिंदू परिषद’ विभागमंत्री अनिल चांदवडकर, नाशिक जिल्हामंत्री योगेश बहाळकर, सहमंत्री अमृत सदावर्ते, पंकजराज अटल, सागर वाघ, विशाल शर्मा, कृष्णा साखला, गौरव गवळी, सौरभ पाटील, केदार जोशी, मोहित चौधरी, सचिन ढोले, प्रशांत लोणारी, ऋषिकेश काळे, सुमित पाटोळे, सौरभ पाटील, नयन घरटे, मोहन चौधरी यांच्यासह शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले.
औरंग्याच्या उदात्तीकरणाची गरज नाही
बाबरचा वंशज औरंग्या मुघल शासक होता. त्याचा भारताशी काहीही संबंध नाही. बाहेरून आलेल्या मुघलांनी हिंदूंचा छळ केला. भारताशी काहीही संबंध नसलेल्या या औरंग्याची कबर आपल्या महाराष्ट्रात कशाला ठेवायची. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदूंचा छळ केलेल्या औरंग्याची कबर कशाला पाहिजे. औरंग्याचे उदात्तीकरण करण्याची काहीही गरज नाही.
- श्रीकांत क्षत्रिय, संयोजक, बजरंग दल, नाशिक शहर जिल्हा
औरंग्याची कबर हटविण्यासाठी प्रयत्न गरजेचे
कुठल्याही सभ्य समाजाच्या विकासासाठी व आपल्यासाठी मार्गदर्शक प्रतीके संबंधित राज्यांमध्ये असतात. जर या महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंग्याची कबर ठेवली, तर समाज त्याला आदर्श मानून इतर समाजाबद्दल घृणा, हिंसकता, क्रूरता, द्वेष वाढण्याची शक्यता अधिक असते. आपल्या वडिलांना कैद करणार्या आणि आपल्या भावाचे शिर सजवून आपल्या बापाला भेट देणारा औरंग्या भारतातल्या कोणत्याच समाजासाठी आदर्श राहू शकत नाही. पुढच्या पिढीचा विचार करून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन औरंग्याची कबर हटविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
- योगेश बहाळकर, जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद, नाशिक जिल्हा