- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
18-Mar-2025
Total Views | 6
1
मुंबई : ( Maharashtra Cultural Bhavan to be built in Mumbai Ashish Shelar ) महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक भवन आणि वस्तू संग्रहालय मुंबईत उभारणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. १८ मार्च रोजी विधानसभेत केली. वांद्रे कुर्ला संकुलात साडेतीन ऐकर हून अधिक जागेवर ही भव्य वास्तू उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याविषयी निवेदन करताना मंत्री शेलार म्हणाले, महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या वारशाचे जतन व संवर्धन करणे हे राज्य शासनाचे आद्य कर्तव्य आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय एक भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असणे अभिप्रेत आहे.
राज्य सांस्कृतिक केंद्रामध्ये भव्य ऑडिटोरियम, कला दालने व रिसर्च सेंटर इत्यादी बाबी नियोजित आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी राज्य सांस्कृतिक केंद्र हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण असेल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून हे केंद्र कार्यरत राहील.
राज्य वस्तू संग्रहालयामार्फत प्राचीन भारतीय वारशाचे जतन करून पुढील पिढ्यांना ते दाखवण्याचे महत्वाचे काम आहे. विविध उत्खनने आणि शोध कार्यक्रमातून उजेडात आलेल्या कलाकृती, महत्वाच्या ऐतिहासिक वास्तू, शस्त्रे आणि विणकाम, कपडे आणि पोशाख, शिल्पे आणि कलावस्तू, कलाकृती, शिलालेख, ताम्रपट, प्राचीन मध्ययुगीन रचनात्मक अवशेष आणि थोर कलाकारांच्या दुर्मिळ चित्रकृती जतन करणे साध्य होईल.
वांद्रे कुर्ला संकुलात जागा
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेची मांडणी एकाच छताखाली आणण्यासाठी राज्यस्तरीय सांस्कृतिक भवनाची आणि राज्य वस्तुसंग्रहालयाची राज्याच्या राजधानीत आवश्यकता आहे. त्यानुषंगाने, 'एमएमआरडीए' वांद्रे कुर्ला संकुल अधिसूचीत क्षेत्रात समाविष्ट असलेला मौजे वांद्रे, सर्वे नंबर ३४१ न.भु.क्र. ६२९ (पै) येथील १४४१८ चौरस मीटर हा भूखंड महसूल विभागाकडून सांस्कृतिक कार्य विभागाला विनामूल्य हस्तांतरीत करण्यात येईल आणि त्या ठिकाणी भव्य असे राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्यात येईल, असे आशिष शेलार यांनी सांगितले.