एलआयसीचा आता आरोग्य विमा क्षेत्रात प्रवेश होणार, ३१ मार्च पर्यंत होणार अधिकृत घोषणा
या वर्षाअखेरपर्यंत हिस्सेदारी खरेदीची प्रक्रिया पूर्ण करणार
18-Mar-2025
Total Views | 9
मुंबई : विमा क्षेत्रातील सर्वात मोठी भारतीय कंपनी असा लौकिक असलेल्या एलआयसीने लवकरच आरोग्य विमा क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. २०२५ या वर्षाअखेरीपर्यंत एलआयसी आपली या क्षेत्रातील एका कंपनीमधील हिस्सेदारी खरेदीची प्रक्रिया पूर्ण करेल असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दार्थ मोहंती यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईतील पवई येथे झालेल्या जागतिक अॅक्युअरी परिषदेत मोहंती यांनी ही माहिती दिली. या माध्यमातून भारतातील आरोग्य विमा क्षेत्र अजून मजबूत होईल असा दावा केला जात आहे.
एलआयसीच्या या योजनेबद्दल सांगताना मोहंती म्हणाले की, एलआयसीच्या याबाबतीतील चर्चा या अंतिम टप्प्यात आहेत. ३१ मार्चच्या अगोदरच याबाबतची पूर्ण योजना जाहीर करण्यात येईल. २०२५ या वर्षाच्या अखेरीपर्यंत एलआयसी आरोग्य विमा क्षेत्रातील एका कंपनीतील हिस्सा विकत घेईल. याबरोबरच त्यांनी हेही सांगीतले की एलआयसीकडून खरेदी करण्यात येणारा हिस्सा हा ५० टक्क्यांपेक्षा कमीच असेल. यामुळे त्या कंपनीची मालकी ही एलआयसी कडे नसेल.
सध्या भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात स्टार हेल्थ इंश्युरन्स, आदित्य बिर्ला हेल्थ इंश्युरन्स, केअर हेल्थ इंश्युरन्स यांसारख्या महत्वाच्या कंपनी कार्यरत आहेत. आता त्यात एलआयसीची भर पडणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०३० पर्यंत भारत विमा क्षेत्रातील जगातील सहावी मोठी बाजारपेठ ठरेल. २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच भारतातील विमा क्षेत्राने २२.९१ टक्क्यांची वाढ अनुभवत ८९, ७२६ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला. या क्षेत्राचे महत्व लक्षात घेऊन तसेच याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी भारत सरकारने २०२५ च्या अर्थसंकल्पात विमा क्षेत्रासाठी १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीस मान्यता दिली आहे.