हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अन्यथा...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात कडाडले
18-Mar-2025
Total Views | 15
मुंबई : मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला हवी. अन्यथा त्यांनी केलेले हे कृत्य एका देशद्रोही औरंगजेबाचे समर्थन करते. याचा अर्थ तेसुद्धा देशद्रोही असून त्यांच्यावरसुद्धा आम्ही देशद्रोहाचा खटला दाखल करावा का? असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी विधानसभेत उपस्थित केला.
नागपूरमधील हिंसाचार आणि हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात चांगलेच संतापले. ते म्हणाले की, "हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात. औरंगजेब हा देशद्रोही होता. त्याने धर्मवीर संभाजी महाराजांचा छळ केला. त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीभ छाटली का? की, डोळे काढले? तुम्ही कुणाची तुलना कुणाशी करताहात? छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाशी आणि औरंगजेबाची तुलना मुख्यमंत्र्यांशी करताहात? तुमचं चाललंय काय? त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला हवी. अन्यथा त्यांनी केलेले हे कृत्य एका देशद्रोही औरंगजेबाचे समर्थन करते. याचा अर्थ तेसुद्धा देशद्रोही असून त्यांच्यावरसुद्धा आम्ही देशद्रोहाचा खटला दाखल करावा का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "हर्षवर्धन सपकाळ यांना बोलताना तारतम्य बाळगून बोलायला सांगा. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने या सगळ्या खुणा पुसून टाकायला हव्या होत्या. पण मतांच्या लाचारीसाठी तुम्ही ते ठेवले आणि आज महाराष्ट्राला कलंक लागला. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे राज्य असून त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. इथून पुढे औरंग्याचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.