मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यात रविवार दि. १६ मार्च रोजी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला (leopard death in ratnagiri). चिपळूणमधील घटनेत कुत्र्याला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत झालेल्या झटापटीत इसमाने स्वसंरक्षणासाठी बिबट्याच्या शरीरात भाला घुसवून त्याच्या जीव घेतला (leopard death in ratnagiri). तर रत्गागिरीत लोखंडी तारेच्या फाश्यात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना शिकारीच्या असून वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (leopard death in ratnagiri)
रविवारी मध्यरात्री चिपळूणमधील वारेली गावात आशिष महाजन यांनी घराबाहेर बांधलेला कुत्रा भूंकत होता. महाजन कुत्र्यास बघण्यास आले असता, कुत्र्याशेजारी त्यांना बिबट्या बसलेला दिसून आला. बिबट्या कुत्र्यावर हल्ला करणार असल्याचे पाहून महाजन यांनी कुत्र्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. महाजन यांची पार्श्वभूमी संरक्षण दलाची असल्याने त्यांनी धीटपणे बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्याने महाजन यांच्यावर हल्ला चढवला. स्वसंरक्षणासाठी महाजन यांच्या पत्नीने त्यांना टोकदार भाला दिला. महाजन यांनी हा भाला बिबट्याचा मानेवर मारताच तो बिबट्याच्या छातीपर्यंत घुसला. त्यावेळी बिबट्याचा मृत्यू झाला आणि महाजन गंभीररित्या जखमी झाले. हा बिबट्या मादी जातीचा साधारण दोन वर्षांचा होता. महाजन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या वावराबाबत काही दिवसांपूर्वी महाजन यांनी वन विभागाकडे तक्रार केली होती. त्यावेळी वन विभागाने घटनास्थळी भेटू देऊन बिबट्याच्या वावरावेळी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात याविषयी महाजन यांना जागृत केले होते.
रविवारी सकाळी रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे येथील भगवान पाटील यांच्या आंब्याच्या बागेत कमरेला फासकी अडकलेला बिबट्या दिसून आला. हा बिबट्या फासकी तोडून त्याठिकाणी येऊन बसल्याचे निदर्शनास आले. तो मोठमोठ्याने धापा टाकत असल्याने रत्नागिरी वन विभागाच्या रेस्क्यू टीमने त्याला लागलीच ताब्यात घेतले. मात्र, त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या नर जातीचा होता आणि त्याचे वय साधारण सात वर्षांचे होते. याप्रकरणी वन विभागाने गुन्हा नोंद केला असून फासकी कोणी व कुठे लावली होती याचा तपास वनकर्मचारी करत आहेत.