भारतमाला : विकासाचे लख्ख प्रतिबिंब

    17-Mar-2025
Total Views | 9

editorial on india
 
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्‍या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
 
'भारतमाला’ प्रकल्पात लक्षणीय प्रगती होत असून, या योजनेंतर्गत देण्यात आलेल्या एकूण २६ हजार, ४२५ किमीपैकी १९ हजार, ८२६ किमीचे महामार्ग पूर्ण झाले आहेत,” असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. केंद्र सरकारने २०१७ साली ‘भारतमाला’ प्रकल्प सुरु केला. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, तसेच वाहतूक सुरळीत करून महामार्ग अधिक सुरक्षित करणे, हे याचे उद्दिष्ट. हायस्पीड कॉरिडोरच्या बांधकामामुळे, मुख्य आर्थिक केंद्रांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होत आहे. विविध औद्योगिक केंद्रे, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन (एनएमपी) नोड्स, मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी), बंदरे आणि विमानतळे हायस्पीड रोड नेटवर्कने जोडले जात आहेत. फेब्रुवारीपर्यंत एकूण ६ हजार, ६६९ किमी हायस्पीड ग्रीनफिल्ड कॉरिडोर उभारण्यात आले आहेत, तर ४ हजार, ६१० किमी पूर्ण झाले आहेत. महामार्ग उभारताना प्रत्येक टप्प्यावर, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. एकूण २६ हजार, ४२५ किमी रस्त्यांपैकी, १९ हजार, ८२६ किमी रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
 
देशाच्या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात, भारताने गाठलेला हा महत्त्वाचा टप्पा आहे. भारतमाला’ प्रकल्पाचे उद्दिष्ट देशभरात महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांचे एक मोठे जाळे उभारणे हे असून, ७५ टक्के काम पूर्ण होणे, हे वाढलेली कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाच्या दिशेने भारताने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे द्योतक आहे. सुधारित रस्त्यांचा देशाच्या अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होतो. कार्यक्षम महामार्ग वाहतुकीचा वेळ आणि त्यासाठीचा खर्चही कमी करतात. त्यामुळे ते व्यापाराला चालना मिळते. बंदरे, औद्योगिक केंद्रे आणि कृषी क्षेत्रांमध्ये वस्तूंच्या वाहतुकीसाठी ते विशेषतः महत्त्वाचे आहेत. ‘भारतमाला’ प्रकल्प दुर्गम आणि वंचित क्षेत्रांमध्ये राबवला जात आहे. त्यामुळे या भागाला प्रमुख शहरे आणि बाजारपेठांशी जोडले जात आहे. तसेच यामुळे शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळताना दिसून येत आहे. प्रादेशिक असमानताही लक्षणीयरित्या कमी होत आहे.
 
पायाभूत सुविधांची होणारी उभारणी ही स्वतःच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारी ठरत असून, त्यामुळे देशभरातील लाखो लोकांसाठी रोजगार उपलब्ध होत आहे. देशातील गरिबी कमी होण्यास त्याची मदत होत असून, विशेषतः ग्रामीण भागात राहणीमान सुधारत आहे. चांगले रस्ते कायमच पर्यटनाला प्रोत्साहन देणारे ठरतात. पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या प्रदेशांमध्ये, अर्थव्यवस्थेच्या वाढीत ते लक्षणीय योगदान देत आहेत.‘भारतमाला’ प्रकल्पातील लक्षणीय प्रगती, देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारची वचनबद्धता दर्शवणारी ठरली आहे. आर्थिक वाढ, प्रादेशिक विकास आणि कनेक्टिव्हिटीमध्ये सकारात्मक योगदान यामुळे मिळत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, भारताच्या लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार असून, एकूण आर्थिक विकासात त्याचे भरीव योगदान मिळेल, हे नक्की.
 
रस्ते म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भाग असून, त्यांचा होत असलेला विस्तार म्हणजे देशाच्या प्रगतीचे स्पष्ट द्योतक आहे. रस्त्यांचे जाळे चांगले असणे म्हणजे केवळ वाहतूक सुलभ होणे नव्हे, तर त्याचा परिणाम आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांवर होतो. उद्योगांच्या वस्तू, कच्चा माल आणि शेती उत्पादनांची वाहतूक रस्त्यांवर आधारित असते. चांगल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेळ कमी होतो. त्यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होतो आणि अर्थकारणाला चालना मिळते. सुव्यवस्थित रस्त्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवनही सुलभ होते. रुग्णालय, शाळा आणि कामाच्या ठिकाणांपर्यंत त्यांना सहज पोहोचता येते. यामुळे जीवनमानात लक्षणीय अशी सुधारणा होते. रस्त्यांच्या माध्यमातून दुर्गम भागांच्या विकासाला चालना मिळत आहे, हे महत्त्वाचे आहे.
 
ग्रामीण भागांमध्ये रस्ते बांधल्याने, त्या भागातील जनतेला शहरांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे रोजगार व विकासाच्या संधी वाढत आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे निर्यात आणि आयात अधिक सुलभ होते. रस्त्यांचा विस्तार हा विकासावर अनेक अर्थांनी परिणाम करणारा ठरतो. रस्त्यांच्या माध्यमातून बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश मिळतो. स्थानिक वस्त्र उद्योग, कृषी उत्पादन आणि लघुउद्योगांना त्याचा थेट फायदा होतो. चांगल्या दर्जाचे रस्ते, तंत्रज्ञानाच्या विकासालाही चालना देतात. स्मार्ट रस्ते, वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि पर्यावरणीय फायदे यांसारख्या नवकल्पनांना चालना मिळते. अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी, रस्त्यांचा विकास अत्यावश्यक असाच. रस्त्यांच्या चांगल्या परिस्थितीमुळे सर्व स्तरांवर आर्थिक स्थैर्य साधता येते. म्हणूनच, रस्ते विस्तार, देखभाल आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित केलेले दिसून येते.
 
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने रस्ते विकास क्षेत्रात खूप मोठी क्रांती केली आहे. विशेषतः २०१४ सालानंतर त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले असून, देशातील रस्ते बांधणी आणि विकासाचा एक नवा अध्यायच लिहिला आहे. गडकरी यांच्या काळात, भारतात रस्ते विकासाचे काम वेगाने झाले असून, त्यांचा उद्देश देशभरात आधुनिक रस्ते उभे करणे हा आहे. ‘भारतमाला’ प्रकल्प हा त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा असा प्रकल्प असून, त्यामुळे देशातील विविध प्रदेशांमध्ये रस्त्यांचे जाळे वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. गडकरी यांनी रस्ते बांधणीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर, गडकरी यांच्या मंत्रालयाने, जलमार्ग विकास आणि हवाई वाहतूक वाढवण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. रस्ते विकासामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत.
 
भारतात आज ज्या वेगाने पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, त्यांचा वेग थक्क करणार असाच आहे. त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येतात. वाहतुकीचा वेळ आणि इंधन खर्चात लक्षणीय घट झाली आहे. त्याशिवाय औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढीला चालना मिळालेली दिसून येते. स्थानिकांना यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विशेषतः ईशान्य भारत, जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाखसारख्या संवेदनशील भागात रस्ते जाळे विस्तारले गेले आहे, त्याचा फायदा होताना दिसून येतो. ‘भारतमाला’ प्रकल्प हा नव्या भारताच्या बांधणीचा मजबूत पाया असून, ‘रस्ते आहेत तर प्रगती आहे’ याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. रस्ते हे प्रगतीचे, विकासाचे आणि समावेशाचे प्रतीक असून, त्यांचा होत असलेला विस्तार व विकास हे अनेक क्षेत्रातील प्रगतीस हातभार लावत आहेत. रस्ते म्हणजे केवळ भौतिक गरज नाही, तर त्याच्या मार्गे विकास सहजसाध्य होतो. रस्ते क्षेत्रातील सुधारणांमुळे एक उज्ज्वल भविष्य घडवता येणे शक्य झाले असून, येणार्‍या काळात नव्या भारताचे स्वप्न साकार झालेले म्हणूनच दिसून येईल. ‘भारतमाला’ हे त्याचे लख्ख प्रतिबिंब आहे, इतकेच.
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..