भारतीय हॉकी संघ सध्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतो. अशाच विजेत्या भारतीय हॉकीपटूंचा सन्मान सोहळा नुकताच ’हॉकी इंडिया’च्यावतीने नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी १९७५ साली सर्वप्रथम हॉकी विश्वचषकावर नाव कोरणार्या भारतीय हॉकी संघालाही यथोचित गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने भारतीय हॉकीविश्वाचा क्रीडावेध घेणारा हा लेख...
क्वालालंपूरमधील मेर्डेका फुटबॉल स्टेडियम येथील दि. १ ते दि. १५ मार्च १९७५ रोजीचा, भारतीय हॉकीचा तो ऐतिहासिक पंधरवडा. काही दशकांहून अधिक काळापूर्वी भारतीय हॉकी संघाने, याच दि. १५ मार्च १९७५ रोजी आपल्या एकमेव विश्वचषक विजयाची पताका फडकावली होती. हॉकीप्रेमींसाठी हा एक गौरवशाली अध्याय होता.
हॉकी इंडियाने शनिवार, दि. १५ मार्च २०२५ रोजी राजधानी दिल्ली येथे, त्यांचा ‘सातवा वार्षिक पुरस्कार’ सोहळा साजरा केला. २०२४ सालासाठी नामांकित व्यक्तींची निवड त्यात करण्यात आली. यावर्षीच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व होते, ते म्हणजे भारताच्या १९७५ सालच्या हॉकी विश्वचषक विजयाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्ताचे. हे देशाचे आजपर्यंतचे पहिले आणि एकमेव विजेतेपद आहे. सुमारे १२ कोटी रुपयांच्या विक्रमी बक्षिसांची रक्कम, ही या वर्षीच्या समारंभाची विशेष उल्लेखनीय बाब. हॉकी इंडिया पुरस्कारांच्या इतिहासातील ही सर्वोच्च रक्कम आहे.
महत्त्वाचे म्हणजे, २०२५ मध्ये भारतीय हॉकीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. भारत दि. ७ नोव्हेंबर १९२५ रोजी ‘आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन’ (एफआयएच)शी संलग्न झाला. म्हणजेच ‘एफआयएच’ची स्थापना झाल्यानंतर फक्त एका वर्षातच भारत संलग्न झाला. हे मैलाचे वर्ष भारताच्या समृद्ध हॉकी वारशाचे आणि खेळावरील त्याच्या कायमस्वरूपी प्रभावाचे वैशिष्ट्य सांगणारे आहे.
२०२४ साली ‘आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी’ जिंकणार्या पुरुष आणि महिला संघांसह, भारताच्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघाचाही सन्मान पुरस्कार सोहळ्यादरम्या करण्यात आला. यावेळी ज्युनियर आशिया कप विजेत्या पुरुष आणि महिला संघांलाही सन्मानित करण्यात आले. ‘हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार २०२४’ ही हॉकीशी संबंधित सर्वांसाठीच एक प्रेरणादायी संध्याकाळ ठरली कारण, आठ श्रेणींमधील एकूण ३२ खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. हॉकी इंडियाच्या सातव्या ‘वार्षिक पुरस्कार २०२४’मधील पुरस्कारांची संपूर्ण यादी आपण आता पाहू :
- हॉकी इंडिया बलबीर सिंग पुरस्कार २०२४ : पुरुष खेळाडू : हरमनप्रीत सिंग
- हॉकी इंडिया २०२४ बलबीर सिंग पुरस्कार : महिला खेळाडू : सविता पुनिया
- हॉकी इंडिया २०२४ फॉरवर्ड ऑफ द इयर धनराज पिल्ले पुरस्कार : अभिषेक नैन
- हॉकी इंडिया २०२४ मिडफिल्डरसाठी अजित पाल सिंग पुरस्कार : हार्दिक
- हॉकी इंडिया २०२४ मिडफिल्डरसाठी परगत सिंग पुरस्कार : अमित रोहिदास
- हॉकी इंडिया २०२४ आगामी पुरुष अंडर २१ प्लेअर ऑफ द इयरसाठी जुगराज सिंग पुरस्कार : अराईजीत सिंग हुंडल
- हॉकी इंडिया २०२४ आगामी महिला अंडर २१ प्लेअर ऑफ द इयरसाठी असुंता लाक्रा पुरस्कार : दीपिका
हॉकी इंडियाने १९७५च्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्यांना, ‘हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ आणि रोख ५० लाख रुपये देऊन गौरवले. या अविस्मरणीय संध्याकाळी भारतीय हॉकीमधील काही मोठ्या घटना झाल्या, त्यात १२ कोटी रुपयांचे विक्रमी बक्षीसही होते. संध्याकाळच्या सर्वोच्च सन्मानांमध्ये सविता आणि हरमनप्रीत सिंग यांना महिला आणि पुरुष गटात, अनुक्रमे २०२४ सालच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘हॉकी इंडिया बलबीर सिंग सीनियर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्याची सुरुवात, पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कांस्यपदकाच्या विजयाचा सन्मान करून झाली. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या सदस्यांना, स्कार्फ आणि प्रत्येकी १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले, तर पर्यायी खेळाडूंना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि साहाय्यक कर्मचार्यांना,त्यांच्या योगदानाबद्दल प्रत्येकी ७.५ लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. दुसर्या श्रेणीत आठ राज्यांना हॉकीला प्रोत्साहन देण्यात आणि १४व्या हॉकी इंडिया राष्ट्रीय अजिंक्यपद २०२४मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी, सन्मानित करण्यात आले. हॉकी हरियाणा, हॉकी झारखंड, हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा, हॉकी मध्य प्रदेश, हॉकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश हॉकी आणि हॉकी पंजाब यांनी, स्पर्धेच्या विविध श्रेणींमध्ये पदके जिंकली आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांनाही प्रत्येकी दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
दरम्यान भारतातील पहिल्या राज्यव्यापी शालेय हॉकी लीग-तामिळनाडू स्कूल हॉकी लीगद्वारे, तळागाळातील हॉकीमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी तामिळनाडूच्या हॉकी युनिटचा २०२४चा ‘सर्वोत्कृष्ट सदस्य युनिट’ म्हणून सन्मान करण्यात आला. या उपक्रमात आठ जिल्हे, ३०६ शाळा, ५ हजार, ५००हून अधिक खेळाडू, ५००हून अधिक सामने आणि ४५हून अधिक स्थळे होती. यामुळे हॉकीसाठी एक उल्लेखनीय पाऊल पुढे गेले. भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांना प्रोत्साहन म्हणून, अनुक्रमे २.२८ कोटी रुपये आणि १.४१ कोटी रुपये मिळाले. यामध्ये प्रत्येक खेळाडूला ५० हजार रुपये आणि प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी, प्रत्येक सपोर्ट स्टाफ सदस्याला २५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
वैयक्तिक कामगिरी पुरस्कारांमध्ये, हरमनप्रीत सिंग याला ‘एफआयएच हॉकी स्टार पुरस्कार’, २०२४ साली ‘एफआयएच पुरुष खेळाडू २०२४’ जिंकल्याबद्दल, दहा लाख रुपये आणि चीनमधील हुलुनबुईर शहरात झालेल्या ‘पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४’ मध्ये, प्लअर ऑफ द टूर्नामेंटसाठी अतिरिक्त एक लाख रुपये देऊन, सन्मानित करण्यात आले.
पीआर श्रीजेशला २०२४चा ‘एफआयएच पुरुष गोलकीपर ऑफ द इयर’ म्हणून निवडल्याबद्दल, पाच लाख रुपये मिळाले. राजगीर येथील बिहार ‘महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४’मध्ये लीडिंग गोलस्कोअरर आणि टूर्नामेंटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून, कामगिरी केल्याबद्दल दीपिकाला प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. तसेच, ओमानमधील मस्कत येथील ‘ज्युनियर महिला आशिया कप २०२४’मध्ये लीडिंग गोलस्कोअरर म्हणून कामगिरी केल्याबद्दल ,आणखी एक लाख रुपये देण्यात आले. मस्कत येथे झालेल्या ‘ज्युनियर पुरुष आशिया कप २०२४’मध्ये, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अराईजित सिंग हुंडल यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
२०२४ सालच्या माईलस्टोन पुरस्कारांमध्ये, आंतरराष्ट्रीय हॉकीमधील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. बॉबी सिंग धामी, रुताजा दादासो पिसाळ आणि साक्षी राणा यांना त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यात गोल केल्याबद्दल, प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. १०० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केल्याबद्दल, जर्मनप्रीत सिंग आणि शमशेर सिंग यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले; तर १५० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केल्याबद्दल विवेक सागर प्रसाद आणि सुमित यांना प्रत्येकी १.५ लाख रुपये देण्यात आले. २०० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केल्याबद्दल अमित रोहिदास यांना दोन लाख रुपये आणि २५० आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केल्याबद्दल सुशीला चानू यांना २.५ लाख रुपये देण्यात आले.
चीनमधील हुलुनबुईर शहरात झालेल्या ‘पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४’ आणि बिहारमधील राजगीर येथे झालेल्या ‘महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४’च्या विजेत्या संघांना, प्रत्येकी प्रति खेळाडू तीन लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफसाठी १.५ लाख रुपये बक्षीस देण्यात आले. दरम्यान, ‘ज्युनियर पुरुष आशिया कप २०२४’ आणि ‘ज्युनियर महिला आशिया कप २०२५’च्या विजेत्या संघांना, प्रत्येक खेळाडूसाठी दोन लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफसाठी एक लाख रुपये बक्षीस देण्यात आले.
दरम्यान, ‘हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार २०२४’च्या अंतिम श्रेणीची सुरुवात, रिपुदमन शर्मा यांनी २०२४च्या ‘अम्पायर मॅनेजर ऑफ द इयर’साठी हॉकी इंडिया प्रेसिडेन्ट अॅवॉर्ड जिंकून केली, त्यांना २.५ लाख रुपये मिळाले. अनिल कुमार पीके यांना २०२४च्या ‘टेक्निकल ऑफिसर ऑफ द इयर’साठी, ‘हॉकी इंडिया प्रेसिडेन्ट अॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनाही २.५ लाख रुपये पारितोषिक मिळाले. २०२४च्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘हॉकी इंडिया प्रेसिडेन्ट अॅवॉर्ड’ बेईटन कप, हॉकी टूर्नामेंटला देण्यात आला, ज्याला पाच लाख रुपये मिळाले. याव्यतिरिक्त, २०२४च्या अमूल्य योगदानासाठी ‘हॉकी इंडिया जमनलाल शर्मा अॅवॉर्ड’, ‘हिरो हॉकी इंडिया लीग २०२४-२५’चे अधिकृत प्रसारक असलेल्या प्रसार भारतीला, भारत आणि जागतिक स्तरावर लीगचा विस्तार करण्यात त्यांच्या भूमिकेबद्दल प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात सविता हिने २०२४चा ‘गोलकीपर ऑफ द इयर’साठीचा, प्रतिष्ठित ‘हॉकी इंडिया बलजित सिंग पुरस्कार’ जिंकला. तिला ट्रॉफीसह पाच लाख रुपये मिळाले. भारतीय महिला हॉकी संघाची एक महत्त्वाची सदस्य असलेली सविता हिने, या यशात मोलाचा वाटा उचलला आहे आणि हा तिचा दुसरा ‘गोलकीपर ऑफ द इयर’ किताब होता. जगातील सर्वोत्तम फर्स्ट-रशरपैकी एक म्हणून ओळखले जाणारे अमित रोहिदास यांनी, २०२४चा ‘डिफेन्डर ऑफ द इयर’साठी ‘हॉकी इंडिया परगत सिंग पुरस्कार’ जिंकला. त्याला पाच लाख रुपये मिळाले. हार्दिक सिंगने यापूर्वी वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू आणि वर्षातील सर्वोत्तम मिडफिल्डर दोन्ही पुरस्कार जिंकले होते. त्याला हॉकी इंडियाचा २०२४चा मिडफिल्डर म्हणून ‘अजित पाल सिंग पुरस्कार’ मिळाला आणि पाच लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले.
दरम्यान, भारताच्या फॉरवर्ड लाईनमधील एक महत्त्वाचा खेळाडू असलेल्या, अभिषेकने हॉकी इंडियाच्या धनराज पिल्ले या वर्षातील ‘फॉरवर्ड पुरस्कार’ कायम ठेवला. त्याला पाच लाख रुपये आणि पारितोषिकदेखील मिळाली. ज्युनियर आणि सिनियर दोन्ही संघांतील महत्वाचे खेळाडू दीपिका आणि अरिजीत सिंग हुंडल यांनी, अनुक्रमे २०२४च्या आगामी खेळाडू (महिला अंडर-२१)साठी ‘हॉकी इंडिया असुंता लाक्रा पुरस्कार’ आणि २०२४च्या आगामी खेळाडू (पुरुष अंडर-२१) साठीचा ‘हॉकी इंडिया जुगराज सिंग पुरस्कार’ जिंकला. त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि सन्मानचिन्ह मिळाले. आगामी पुरुष खेळाडू म्हणून अरिजीतचा हा सलग दुसरा पुरस्कार होता.
अलीकडेच ३००वी आंतरराष्ट्रीय कॅप मिळवणार्या आणि भारतीय महिला हॉकी संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणार्या सविताला, २०२४चा सर्वोत्तम खेळाडू (महिला) ‘हॉकी इंडिया बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार’ मिळाला. दरम्यान, पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक आणि इतर अनेक संस्मरणीय विजय मिळवून देणार्या, सध्याच्या भारतीय पुरुष संघाच्या कर्णधाराने त्यांचा दुसरा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार जिंकला. २०२१ साली चौथ्या वार्षिक पुरस्कारांमध्ये, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही खेळाडूंना २५ लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली.
एका महत्त्वाच्या क्षणी, १९७५ सालच्या विश्वचषक विजेत्या संघाला ‘हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार २०२४’ने सन्मानित करण्यात आले. ज्याचे रोख रकमेचे ५० लाख रुपये होते. या प्रसंगी उपस्थित असलेल्या दिग्गज खेळाडूंमध्ये लेस्ली फर्नांडिस, ओंकार सिंग, अशोक दिवाण, बीपी गोविंदा, कालिया पीई, ब्रिगेडियर एचजेएस चिमनी, व्हीजे फिलिप्स (स्पर्धेत आघाडीचे गोल करणारे), अशोक कुमार, अस्लम शेर खान आणि ब्रिगेडियर हरचरण सिंग यांचा समावेश होता.
संघाचे कर्णधार अजितपाल सिंग यांच्यावतीने, अशोक कुमार यांनी पुरस्कार स्वीकारला. तर या महत्त्वपूर्ण प्रसंगी चंचल रंधावा (स्वर्गीय सुरजित सिंग यांच्या पत्नी), नवीन पवार (स्वर्गीय शिवाजी पवार यांचे पुत्र), सतपाल सिंग (स्वर्गीय मोहिंदर सिंग यांचे भाऊ), मनजीत कौर (स्वर्गीय वरिंदर सिंग यांच्या पत्नी) आणि शीला किंडो (स्वर्गीय मायकल किंडो यांच्या पत्नी) उपस्थित होत्या.
हॉकी इंडियाच्या सातव्या वार्षिक पुरस्कार २०२४चे प्रमुख विजेते:
-
- पाच लाख रुपये - हॉकी इंडिया सर्वोत्तम गोलकीपर बलजित सिंग पुरस्कार. विजेता: सविता
- पाच लाख रुपये - हॉकी इंडिया परगत सिंग पुरस्कार, डिफेंडर ऑफ द इयर विजेता: अमित रोहिदास
- पाच लाख रुपये - हॉकी इंडिया अजित पाल सिंग पुरस्कार - मिडफिल्डर ऑफ द इयर विजेता : हार्दिक सिंग
- पाच लाख रुपये - हॉकी इंडिया धनराज पिल्ले पुरस्कार, फॉरवर्ड ऑफ द इयर विजेता: अभिषेक
- दहा लाख रुपये - हॉकी इंडिया असुंता लाक्रा पुरस्कार, आगामी वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (महिला - २१ वर्षांखालील) विजेता: दीपिका
- दहा लाख रुपये - हॉकी इंडिया आगामी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठी जुगराज सिंग पुरस्कार (पुरुष - २१ वर्षांखालील) विजेता : अराईजित सिंग हुंडल
- २५ लाख रुपये - हॉकी इंडिया बलबीर सिंग सीनियर पुरस्कार (महिला) विजेता: सविता
- २५ लाख रुपये - हॉकी इंडिया बलबीर सिंग सीनियर पुरस्कार (पुरुष) विजेता: हरमनप्रीत सिंग
- ५० लाख रुपये - हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार विजेता : १९७५ विश्वचषक विजेता संघ
भारताला हॉकी विश्वविजेतेपद मिळून आता बरीच वर्षे झाली आहेत. वेगवेगळ्या खेळात असंख्य ऑलिम्पिक पदके असूनही, हॉकीमध्ये मात्र भारताचा हा एकमेव विश्वचषकी विजय आहे. हा विश्वचषकाचा एकमेव सोहळा, आपण अधूनमधून सारखा साजरा करत आलो आहोत. त्याबद्दल कोणाचीच हरकत नसावी; पण हा एकाचा आकडा आपल्याला वाढता ठेवता आला पाहिजे. ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर, या विश्वचषकाचा आकडा किमान ऑलिम्पिकएवढा तरी आपल्याला गाठता आला पाहिजे. किमान आकडा वाढवत तो कमाल करता आला, तर मग या सोहळ्याचा वेगळाच आनंद आपल्याला आणि आपल्या आधीच्या व नंतरच्या पिढ्यांना उपभोगता येईल. क्वालालंपूरमधील त्या मेर्डेका फुटबॉल स्टेडियमची पुनरावृत्ती आपण कधी करणार? या प्रश्नाला उत्तर लवकर मिळायला हवे.
इति।
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
९४२२०३१७०४