भारतीय रेल्वेची पहिली सारथी

Total Views | 7
 
asia s first female loco pilot surekha yadav
 
 
 
आशियातील पहिली महिला लोको पायलट आणि हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव यांच्याविषयी....
 
नुकताच आपण जागतिक महिला दिन साजरा केला. महिलांविषयी अनेक बाबींवर चर्चासत्रे आणि सोहळे यादिवशी संपन्न झाले. त्यानुसार लिंग समानता खर्‍या अर्थाने जगणार्‍या महिलाही, आज मोठ्या संख्येने आपल्याला समाजात वावरताना दिसतात. अशाच आशियातील पहिल्या महिला रेल्वेचालक रेखा यादव यांचा प्रवास आज आपण जाणून घेऊया.
 
आज भारतीय महिलांनी त्यांच्या असाधारण कामगिरीने जगाला थक्क केले आहे. आता असे म्हटले जाते की, विमान झेपावण्यापासून ते ट्रेन चालवण्यापर्यंत महिला सर्वकाही करू शकतात. मात्र, या संधींचे प्रवेशद्वार खुले करणार्‍या पहिल्या महिलेला किती संघर्षाला तोंड द्यावे लागले, याची आज फक्त कल्पनाच केली जाऊ शकते. रेल्वे लोको पायलट क्षेत्रात पहिले पाऊल टाकणार्‍या, सुरेखा शंकर यादव या आशियातील पहिल्या महिला रेल्वेचालक आहेत. सुरेखा यांना ही संधी देणार्‍या, मध्य रेल्वेचेही करावे तेवढे कौतुक कमीच.
 
सुरेखा यांचा जन्म दि. २ डिसेंबर १९६५ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतले. सुरेखा यांनी उच्च शिक्षणात ‘व्यावसायिक पदवी’ आणि ‘इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी’मध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. लहानपणापासूनच सुरेखा या अभ्यासात अत्यंत हुशार होत्या. पालकांकडूनही त्यांना शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहन मिळाले. त्यांनी कधीही लोको पायलट होण्याचा विचार केला नव्हता. मात्र, शिक्षण पूर्ण करण्यासाठीचे पालकांचे मिळणारे प्रोत्साहन आणि शाळेतल्या उत्तम शिक्षणाच्या जोरावरच आज सुरेखा या यशाच्या शिखरावर आहेत.
 
बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच सुरेखा यांनी ‘व्यावसायिक पदवी’ आणि ‘इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी’मध्ये डिप्लोमा पूर्ण केला. १९८६ साली भारतीय रेल्वेची साहाय्यक चालकांसाठीची भरती मोहीम सुरू झाली. यावेळी पात्रता निकषांमुळे, कोणत्याही प्रवाहातील डिप्लोमाधारकांना अर्ज करण्याची परवानगी मिळाली आणि सुरेखा यांनी साहाय्यक लोको पायलटच्या परीक्षेसाठी अर्ज केला. महिला ज्या क्षेत्रात कार्यरत नाहीत असे क्षेत्र निवडल्यामुळे, सुरेखा यांना थोडा विरोधही झाला. परंतु, या विरोधाकडे सपशेल कानाडोळा करत, त्यांनी पात्रतेसाठी आवश्यक सर्व चाचण्या पार करण्याचा दृढनिश्चय केला. याच दृढनिश्चयाच्या जोरावरच सुरेखा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यानंतर मुलाखत झाली. तिसर्‍या टप्प्यात ‘मानसोपचार’ आणि ‘अ१’ ही वैद्यकीय चाचणी त्यांनी दिली. अखेरीस पात्रता परीक्षेतील सर्व टप्पे पार करत, १९८८ साली सुरेखा यांनी आशियातील पहिल्या महिला लोको पायलट होत एक इतिहास रचला. त्यानंतर सुरेखा यांना साहाय्यक लोको पायलट म्हणून नियुक्तीही मिळाली.
 
सुरेखा यांच्या कामगिरीमुळे इतर महिलांना या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला. कल्याण येथील प्रशिक्षण शाळेत, सुरेखा यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. सुरेखा यांच्या कारकिर्दीची सुरुवात मालगाडी चालक म्हणून झाली. २००० साली त्यांना ‘मोटर वुमेन’ पदावर बढती मिळाली. त्यानंतर २०११ साली सुरेखा पहिल्या महिला एक्सप्रेस मेल पायलट बनल्या. त्यांनी पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर रेल्वे गाड्या चालवल्या. सुरेखा यांनी सांगितले की, “हा संपूर्ण प्रवास आणि हे यश पालकांच्या पाठिंब्यामुळे, शिक्षणाची आवड आणि आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द यामुळेच शक्य झाले.” सुरेखा सांगतात, “नवनवीन आणि प्रगत तंत्रज्ञान आज रेल्वेमध्ये येत आहे. हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, अत्यंत वेगाने त्यात पारंगत होण्याचा माझा प्रयत्न आहे.“ २०१९ साली त्यांनी भारतातील सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेल्या, ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचेही नेतृत्व केले. ‘वंदे भारत’ चालवणारी पहिली महिला झाल्याने, त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सुरेख यांच्या प्रवासाने हजारो महिलांना प्रेरणा दिली असून, आज भारतीय रेल्वेमध्ये दोन हजारांहून अधिक महिला लोको पायलट कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसर्‍या शपथविधी सोहळ्यात विशेष पाहुण्यांमध्ये सुरेखा यादव यांचेही नाव होते.
 
सुरेखा यादव म्हणतात,“भारतातीलच नव्हे, तर आशियातील पहिली महिला रेल्वेचालक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मध्य रेल्वेचे आभार असे की, मला त्यांनी या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. या क्षेत्रात मी गेली ३७ वर्षे कार्यरत आहे. माझी नेमणूक १९८० मध्ये साहाय्यक चालक म्हणून झाल्यावर मी मालगाडीही चालविली. भारतातील पहिली उपनगरीय रेल्वे चालविण्याचा सन्मानही मला मिळाला. मध्य सध्या मी मुंबई विभागात रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या चालवत आहे. ‘वंदे भारत’ गाडीही मी चालविली आहे. ही ऐतिहासिक संधी दिल्याबद्दल, मी भारतीय रेल्वेची अत्यंत ऋणी आहे. या क्षेत्रात काम करणे तसे खूप अवघड आहे मात्र, जिद्द असली की छोट्या मोठ्या अडचणींवर मात करून, आपण कोणत्याही क्षेत्रात नवा इतिहास घडवू शकतो.” सुरेखा यांच्या उदाहरणावरून इतर महिलांनीही, इतरांच्या सहकार्याने पुढे जाण्याची उमेद मनात कायम ठेवली पाहिजे. आज भारत देशाने महिलांना अनेक संधीची दारे खुली केली आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात महिला धडाडीने पुढे येत आहेत. अशा कार्यातूनच आपले स्वतःचेच नाहीतर, देशाचेही नाव ही उज्ज्वल होईल, अशी भावना सुरेखा यांनी व्यक्त केली. सुरेखा यादव यांच्या भारतीय रेल्वेतील गौरवशाली कार्यकर्तृत्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा त्रिवार सलाम आणि पुढील कार्यासाठी अनेकानेक शुभेच्छा!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..