औरंग्याची कबर हटवा अन्यथा 'कारसेवा!'

विहिंप, बजरंग दलासह हिंदु संघटना एकवटल्या; मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सुपुर्द

    17-Mar-2025
Total Views |

VHP Protest against Aurangzeb Kabar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Protest against Aurangzeb Kabar) 
क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटवावी या प्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने सोमवार, दि. १७ मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. दरम्यान कोकण प्रांतातील मुंबई, ठाणे, भिवंडी, कर्जत, नवी मुंबई, रायगड आदी २१ ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यासाठीचे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून देण्यात आले. औरंग्याची कबर लवकरात लवकर हटवा अन्यथा कारसेवा करू असा इशाराही कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आला.

हे वाचलंत का? : बांगलादेश विश्व हिंदू परिषदेचे महासचिव कपिल कृष्ण मंडल यांना अटक


मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी प्रांत मंत्री मोहन सालेकर, बजरंग दल प्रांत सहसंयोजक गौतम रावरीया, जिल्हा संयोजक जयकिशन प्रजापती, जिल्हा अध्यक्ष ब्रजेश वेद आणि एडव्होकेट यादव यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकार्यांना सुपूर्द केले.


VHP Protest against Aurangzeb Kabar

त्यानंतर माध्यमांशी बोलताना मोहन सालेकर म्हणाले, "औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता, स्वराज्याची धुळदाण त्याने केली. आमच्या मायभगिनींची अब्रु लुटली. छत्रपती संभाजीराजांना यातना देऊन त्यांचे प्राण घेतले, हजारो हिंदूंचे धर्मांतरण केले, अशा क्रुरकर्म्याची कबर महाराष्ट्रात असणे हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच ही कबर काढून टाकायला हवी होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही."

निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी शासनाला विनंती केली की, महाराष्ट्राच्या माथ्यावरील हा कलंक तातडीने पुसून टाकावा. सध्याचे शासन हे शिवरायांच्या विचारांने काम करणारे आहे, त्यामुळे ते याची दखल घेतील असा विश्वास आहे. बजरंग दलाचे प्रांत सह संयोजक गौतम रावरीया म्हणाले की, शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा हिंदू समाज चलो खुलताबादचा नारा बुलंद करेल. या कार्यक्रमाला शेकडो बजरंगी हजर होते.


VHP Protest in Thane Aurangzeb Kabar

ही कबर म्हणजे गुलामगिरीचे चिन्ह
ठाणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विहिंप, बजरंग दलासह अन्य हिंदु संघटनानी भगवे ध्वज फडकवत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरून त्याठिकाणी त्याची कबर उभारण्यात आली. ही कबर म्हणजे गुलामगिरीचे चिन्ह आहे, तेव्हा ती कबर तेथुन हटवून तेथील सुरक्षा देखील काढण्यात यावी. अशी मागणी करून आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे सुपुर्द केले. या आंदोलनात बजरंग दल प्रांत संयोजक रणजीत जाधव, शिवशंभु विचारमंच कोकण प्रांत संयोजक अभय जगताप, ठाणे जिल्हा बजरंग दल संयोजक विजय पांडे, शिव संस्कृती प्रतिष्ठानचे दत्ता घाडगे, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका स्वाती भोसले, विहिंप ठाणे शहर उपाध्यक्ष माधुरी ओक, ठाणे जिल्हा मातृशक्ती संघटनेच्या माधुरी महाजन, रजनी जैन आदीसह शेकडोच्या संख्येने स्वयंसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


CM Devendra Fadnavis on Aurangzeb Kabar

औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही!
काहीही झाले तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी येथे 'श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) परिसरा'च्या लोकार्पण प्रसंगी दिली. ते म्हणाले, "या देशात छत्रपती शिवरायांचे महिमामंडन होईल औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होणार नाही. औरंग्याची कबर कशाला ही गोष्ट ठीक आहे. परंतू, एएसआयने त्याला संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारों लोकांना मारले त्याच्या कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागणे हे दुर्दैव आहे. पण काहीही झाले तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो."


VHP Protest Against Aurangzeb Kabar (Azad Maidan)

कुठल्याही परकीयांचे नामोनिशान स्वतंत्र भारतात असू नये!
आझाद मैदान, मुंबई येथे झालेल्या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर, विभाग मंत्री (मुंबई शहर) राजीव चौबे, रमेश पुरोहित उपस्थित होते. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर श्रीराज नायर म्हणाले की, "हिंदू द्वेष्टा स्वतःच्याच बंधू बापाचा खून करणारा या देशाशी, इथल्या संस्कृतीशी, परंपरांशी कुठलीही आत्मीयता नसणारा व आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांची छळून हत्या करणाऱ्या औरंग्याची कबर या भारतात असणे म्हणजे एक प्रकारे त्यांनी केलेल्या अन्यायांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे. कुठल्याही परकीयांचे नामोनिशान या स्वतंत्र भारतात असू नये. लवकरात लवकर ही औरंग्याची कबर खणून काढावी व त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देऊ नये अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगर हा नारा देत कार सेवा करेल."