आगामी ३६५ दिवसांत १२०० कार्यक्रम होणार : सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार
17-Mar-2025
Total Views |
ठाणे: ( The art of workers Ashish Shelar ) “श्रमिकांची कला वृद्धिंगत होऊन पुढील पिढीपर्यंत नेली पाहिजे. आज ‘चॅट जीपीटी’चा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते; पण सृजनाची ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. या श्रमिकांच्या कलेला घामाचा सुगंध असतो,” असे गौरवोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी काढले.
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलांचा, श्रमिकांचा दोन दिवसांचा ‘कला महोत्सव’ महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागाच्यावतीने ठाणे येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर खा. नरेश म्हस्के, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले, सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक सुरेंद्र वैद्य, उल्हास कार्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी श्रमिक व श्रमिकांच्या कलाविकासासाठी योगदान देणार्या सहा गुणिजनांचा शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मंत्री शेलार म्हणाले की, “लुप्त होत चाललेल्या लोककलांना पुनरुज्जीवन करणे, अन्य कलांना मानाचे स्थान देणे, देशासमोर आपले राज्य संपन्न म्हणून समोर ठेवणे, या उद्देशाने सांस्कृतिक विभाग प्रामाणिकपणे काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाची जबाबदारी मला दिली आहे.
गेल्या ८० ते ८५ दिवसांत या विभागाच्या माध्यमातून आम्ही १७० कार्यक्रम केले. संस्कृती संवर्धनाचे, प्रचाराचे, प्रसाराचे, कलावंतांना संधी आणि स्थान देण्याचे काम या कार्यक्रमातून करीत आहोत. आगामी आर्थिक वर्षात ३६५ दिवसांत १ हजार, २०० कार्यक्रमांची रचना केली,” अशी माहिती शेलार यांनी यावेळी दिली. “महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून संगीत, नाटक, लोककला, लोकवाद्य, कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमातून संपन्न महाराष्ट्र राज्याचे दर्शन देशात सातत्याने होत असते. ठाण्यात होणारा श्रमिकांचा कला महोत्सव हा विशेष आहे.
श्रमिकांच्या कलाकृतीला उपजत गुणी वृत्तीला श्रमिकाच्या कामांची, मेहनतीची जोड आहे. म्हणून या कार्यक्रमाचा सुगंध वेगळा आहे. विदेशातील कित्येक डॉलर्स खर्च केले, तरी श्रमिक कलावंतांची कला निर्माण होऊ शकत नाही,” शेलार म्हणाले.
१०० हून अधिक श्रमिक कलावंत कला सादर करणार
दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या श्रमिक कलावंतांच्या कला सादरीकरणाने श्रमिकांचा कला महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात कचरा वेचक, सफाई सेविका, घरकाम करणार्या महिलांसह तृतीयपंथी, तमाशा कलावंत, गोंधळी, संबळ वादक, अंध दिव्यांग, पोतराज, वासुदेव, कोळी बांधव, तारपा कलावंत असे 100 हून अधिक श्रमिक कलावंत या कलामहोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.