मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Supriya Sule on Aurangzeb Kabar) राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही सोमवारी कबर हटवण्यावरून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळतंय. "जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांना घेऊ द्या. बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय असतात. प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असून यात कोणीही ढवळाढवळ करू नये", असे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे.
हे वाचलंत का? : औरंग्याला विरोध पण कबरीला समर्थन; महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझी हात जोडून सरकारला विनंती आहे की, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचा आहे. या सगळ्या गोष्टींना इतिहासकार आहेत. इतिहासात जरूर रमा पण त्याचं राजकारण करू नका. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांना घेऊ द्या. तसंच बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय असतात. प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असून यात कोणीही ढवळाढवळी करू नये."
पुढे त्या सरकारला आवाहन करत असंही म्हणाल्या की, या विषयात न अडकता, तज्ज्ञांना यावर निर्णय घेऊ द्या. सरकारने सध्या भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. राज्यात भ्रष्टाचाराचे काय झाले? मोठ्या संख्येने पात्र तरुणांना नोकऱ्या नाहीत. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या सर्व मुद्द्यांवर सरकारने लक्ष केंद्रित केले पाहिजे.